Marathi Bible Reading | Wednesday 12th January 2022 |1st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

 बुधवार   दि. १२ जानेवारी  २०२२
✝️ 
 "नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले"

✝️



संत बेनेडिक्ट बिस्कोप
मठाधिकारी, वर्तनसाक्षी (६२८-६९०)


“नाना प्रकारच्या रोगानी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले. " 
 परमेश्वराने शमुवेलाला इस्त्राएलचा विशेष संदेष्टा म्हणून नेमले. असे लिहिले आहे की, ‘परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.'  देवाचे सेवाकार्य करताना शमुवेलाने इस्त्राएली जनतेचे मार्गदर्शन केले.

प्रभू येशूने आपल्या शिष्यांची निवड केली. त्यानंतर कफर्णहुमानील सभास्थानात एका अशुद्ध आत्म्याला घालवून लावले. प्रभूने अधिकारयुक्तवाणीने सभास्थानात देवाची सुवार्ता सांगितली. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू प्रथम आपला शिष्य पेत्र ह्याच्या सासूला बरे करितो. त्यानंतर लोकांनी अनेक  दुखणाईत, आजारग्रस्त व भूतग्रस्तांना प्रभू येशूकडे आणले आणि त्याने पुष्कळांना बरे  केले. प्रभू येशूने शिक्षण दिले, आरोग्यदान दिले तसेच त्याने एकांत स्थळी जाऊन| देवाची प्रार्थना देखिल केली. शमुवेल जसा देवाच्या सहवासात होता तसेच प्रभू  येशूच्या जीवनात प्रार्थनेला अग्रस्थान होते. प्रभू येशू आपले सेवाकार्य करीत असताना सतत देवपित्याच्या सहवासात व सहभागितेत असायचा. प्रभू येशूच्या शिकवणुकीचा  व सेवाकार्याचा स्रोत प्रार्थनाच होती.

|प्रार्थनेमुळे विश्वास  बळकट होतो, भीती नष्ट होते आणि धैर्याने कोणत्याही आव्हानाला आपण सामोरे जाऊ  शकतो. आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया प्रार्थनेवर उभारलेला आहे. आपल्याला देवाने दिलेल्या दिवसाची सुरुवात व शेवट आपण त्याला धन्यवाद देऊन त्याच्या सहवासात घालवू या.

✝️   

पहिले वाचन शमुवेल ३:१-१०,१९-२०
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे." 

छोटा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराची सेवा करीत होता. त्या काळी परमेश्वराची वाणी क्वचित ऐकू यायची, त्याचे दृष्टान्तही सहसा होत नसत. एलीची दृष्टी मंद होत चालली होती आणि त्याला दिसत नव्हते. एकदा असे झाले की, तो आपल्या जागेवर झोपला होता. शमुवेल हा मंदिरात देवाचा कोश होता तेथे झोपला होता. देवाचा दीप मालवला जाण्यापूर्वी परमेश्वराने शमुवेलला हाक मारली, "शमुवेल! शमुवेल!" तेव्हा तो म्हणाला, "मी इकडे आहे!" मग तो एलीकडे धावत गेला आणि म्हणाला, "मी येथे आहे. आपण मला बोलावलेत ?" पण तो म्हणाला, "मी नाही बोलावले, परत जा आणि झोप." मग तो गेला आणि जाऊन झोपला. परमेश्वराने पुन्हा हाक मारली, "शमुवेल!" शमुवेल उठला आणि एलीकडे जाऊन म्हणाला, "हा मी आलो, आपण मला बोलावलेत ?" पण तो म्हणाला, "मी नाही बोलावले, बाळ, परत जा आणि झोप." शमुवेलला परमेश्वराची ओळख अद्याप झाली नव्हती. परमेश्वर त्याच्याशी अजून बोलला नव्हता. पुन्हा तिसऱ्या वेळेस परमेश्वराने शमुवेलला हाक मारली, तेव्हा तो उठला आणि एलीकडे जाऊन म्हणाला "मी इथेच आहे. आपण मला बोलावलेत ?" ह्या मुलाला परमेश्वरच बोलावत आहे हे एलीने ओळखले. तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा तुला हाक ऐकू आली तर म्हण, 'हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. "मग शमुवेल आपल्या जागी जाऊन झोपला.
परमेश्वर पुन्हा येऊन उभा राहिला आणि "शमुवेल ! शमुवेल!" अशी त्याने पूर्वीप्रमाणे हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, "बोल, तुझा दास ऐकत आहे."
शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्याबरोबर होता, त्याचा एकही शब्द त्याने खाली पडू दिला नाही. दानापासून ते बैर-शेवापर्यंतच्या सर्व इस्राएल लोकांना कळून चुकले की, शमुवेल परमेश्वराचा संदेष्टा म्हणून नियोजित झाला आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ४०:२,-५, ७-१०
प्रतिसाद :   हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.

१) मी अधीरतेने प्रभूची वाट पहात होतो 
आणि त्याने माझ्याकडे लक्ष दिले, 
त्याने माझा धावा ऐकला. प्रभूवर भाव ठेवणारा 
आणि खोट्या दैवतांची पूजा करणाऱ्या बंडखोर 
लोकांच्या नादी न लागणारा माणूस सुखी.

२ )यज्ञ आणि अर्पणे ही तुला नकोत, 
पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेत.
 होमवली आणि पापवली तुला नकोत. 
ह्यावरून मी म्हणालो की, हा बघ, मी आलोच!

३) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे.
हे देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद वाटतो,
तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.

४) हे प्रभो, महासभेत मी तुझ्या नीतिमत्त्वाचा
 पुरस्कार केला. मी आपले तोंड बंद ठेवले नाही,
 हे तुला माहीत आहे.



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 हे प्रभो, तुझे सर्व आदेश विश्वसनीय आहेत,
ते सदासर्वदा अढळ आहेत.

 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   १:२९-३९

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशूने नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना बरे केले. "

येशू सभास्थानातून निघाल्यावर तो लगेच याकोब आणि योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया ह्यांच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.

त्या सायंकाळी, सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजाऱ्यांस आणि भूतग्रस्तांस त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भुते काढली. त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांस बोलू दिले नाही.

मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करीत आहेत." तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे." मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशूच्या सामाजिक जीवनाची तीन वर्षे प्रार्थनेने आणि लोकांच्या वेगवेगळ्या दुःखात मदत करण्याच्या कार्याने गच्च भरलेली होती. त्याने जे केले तसेच आपणही करावे असे येशूने आपल्याला शिकविले. लोकोपयोगी चांगली कामे करणे हा स्वर्ग मिळविण्यासाठी येशूने दिलेला आवश्यक मंत्र आहे. शेवटचा न्याय होईल, कोण स्वर्गात जाईल आणि कोण स्वर्गात जाणार नाही, ह्याविषयी शेवटचा निर्णय देण्यात येईल. त्यावेळी कोणता निकष वापरण्यात येईल हे सांगताना स्वर्गात जाण्यासाठी दयेची कृत्ये ह्याला दुसरा पर्याय नाही हे येशूने निःसंदिग्धपणे सांगितल्याचे आपण मत्तयच्या २५व्या अध्यायात वाचतो. पण तेवढ्याच कळकळीने येशूने स्वतःच्या उदाहरणाने हेही शिकविले की, चांगली कामे स्वशक्तीने करणे कदापिही शक्य नाही. त्यासाठी परमेश्वराच्या सहाय्याची आपल्याला नितांत गरज आहे. येशूने दुःखणाईतांना, भूतग्रस्तांना व इतर , व्याधींनी ग्रासलेल्या लोकांना बरे करण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी व समुपदेश करण्यासाठी जेवढा वेळ दिला तेवढाच किंबहुना |त्याहीपेक्षा जास्त वेळ त्याने प्रार्थनेसाठी दिला. प्रार्थना करणे हे आपल्या लहरीवर किंवा आपल्याकामाच्या पसाऱ्यावर अवलंबून नसावे. आपल्याला ऑक्सिजनची जेवढी गरज आहे. त्याहीपेक्षा जास्त गरज प्रार्थनेची आहे. अशी मनाची गाठ बांधून आपल्या दर दिवसाच्या वेळापत्रकामध्ये प्रार्थनेसाठी वेळ राखून ठेवण्याची गरज आहे. माझ्या मुंबईतील वास्तव्याच्या वेळी मी पाहात असे की, अनेक कामगार स्त्रिया आणि पुरुष दिवसभरातील प्रवास व कामाचा व्याप ह्यातून मार्ग काढून दुपारच्या कामाच्या ठिकाणच्या अल्प विश्रांतीच्या वेळी जवळपासच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करायचे. त्यांचा आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा व समक्षतेचा अनुभव घेण्यास व जीवन  परिवर्तन करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या