Marathi Bible Reading | Thursday 13th January 2022 |1st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

 गुरुवार    दि. १३ जानेवारी  २०२२
✝️ 
 "माझी इच्छा आहे, शुद्ध हो."

✝️




पोयतिअर्सचे संत हिलरी
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (३१५-३६७)
चिंतन : दुष्प्रवृत्तीचे अनावश्यक आकर्षण टाळून ज्या व्यक्ती लहान बालकासमान साधेपणाचे जीवन जगतात त्यांनाच देवाच्या राज्यात प्रवेश मिळतो. - संत हिलरी

पूर्विच्या काळी अति संसर्गजन्य कुष्ठरोग हा महाभयंकर आजार  पापांचा दुष्परिणाम समजला जात असे. कुष्ठरोग्यांची वसाहत गावाबाहेर असायची. सामाजिक आणि धार्मिक बंधनात अडकून हलाखीचे केविळवाणे जगणे कुष्ठरोग्यांच्या वाट्याला येत असे. समाजमनावर असलेला हा भयंकर पगडा येशूच्याकाळी धार्मिक नेत्यांनी नियमांच्या बंधनात अडकवून कुष्ठरोग्यांचे जिणे भयंकर बनविले होते.
प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात सामाजिक आणि धार्मिक नियमांच्या पलिकडे जाऊन हा कायदा जणू मोडून काढतो. विशेषत: त्याच्याजवळ श्रद्धेने आणि आशेने आलेल्या कुष्ठरोगी माणसाला तो स्वत: स्पर्श करुन बरे करतो.  इतकेच नव्हे तर धार्मिक बंधने लादलेल्या याजकांपुढे त्याला जाण्यास सांगतो. अशुद्धता व अस्पृश्यता यावर मात करणारा प्रभू येशू जगाचा तारणारा व मुक्तीदाता परमेश्वर आहे. कुष्ठरोग्याला मुक्ती देत असतानाच प्रभूने सामाजिक व धार्मिक बंधनात अडकून पडलेल्याची सुटका केली..
 प्रभू येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याची आपल्या जीवनातील इच्छा समजून घ्यायला हवी. सर्वस्वी शरण जाऊन त्याला आपले जीवन समर्पित करायला हवे.

✝️   

पहिले वाचन शमुवेल ४:१-११
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"इस्त्राएली लोकांचा पराभव झाला आणि परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत करण्यात आला. "
इस्राएली लोक पलिष्ट्यांबरोबर लढण्यास बाहेर पडले, त्यांनी एबन-एजर येथे तळ दिला आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ट्यांनी इस्राएलसमोर फळी उभारली आणि युद्धास तोंड लागले. तेव्हा पलिष्ट्यांनी इस्राएली लोकांचा धुव्वा उडवला आणि त्यांचे सुमारे चार हजार लोक रणांगणावर ठार मारले गेले. लोक छावणीत परतले तेव्हा इस्राएलचे वडीलजन म्हणाले, “परमेश्वराने आज आम्हाला पलिष्ट्यांसमोर का पराभूत केले? आपण परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आणू या. तो आपल्यामध्ये आला तर आपल्याला शत्रूंचा कचाट्यातून सोडवील." तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून करुबारुढ अशा सेनाधीश परमेश्वराच्या कराराचा कोश आणविला. एलीचे दोन मुलगे हफनी आणि फिनहास हे देवाच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत येताच सर्व इस्राएले मोठयाने गर्जना करुन पृथ्वी दणाणून टाकली. या गर्जनांचा आवाज ऐकून पलिष्टी म्हणाले, “इब्रीच्या छावणीत हा मोठ्या गर्जनाचा आवाज कसला चालला असावा ?" तेव्हा परमेश्वराचा कोश छावणीत आल्याचे त्यांना कळले. मग पलिष्टी भयभीत होऊन म्हणू लागले, “छावणीत देव आला आहे” आणि ते म्हणू लागले, “आता आमचे काय होईल ! पूर्वी असे कधी घडले नाही. हाय, हाय, आता आमचे काय होईल! ह्या पराक्रमी देवांच्या तावडीतून आपल्याला कोण सोडवील? ह्याच देवाने रानात मिसरी लोकांना तऱ्हेतऱ्हेच्या पीडांनी पीडले होते. तरी पण पलिष्ट्यांनो, हिमंत धरा, मर्द व्हा, इब्री तुमचे गुलाम झाले आहेत तसे तुम्ही त्यांचे गुलाम होऊ नका, मर्द व्हा आणि लढा.
मग पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव होऊन ते प्रत्येकजण आपापल्या तंबूकडे पळून गेले. त्या वेळेस भयंकर कत्तल झाली आणि इस्रायलचे तीस हजार पायदळ मृत्युमुखी पडले. परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे हफनी व फिनहास हे दोघेही पुत्र मारले गेले.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ४४:१०-११,१४-१५, २४-२५
प्रतिसाद :    हे प्रभो, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर.

१) आम्हांला फजीत केले आहे,
तरी आता तू आम्हांला टाकले आहे, 
आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस. 
तू आम्हांला शत्रूंना पाठ दाखवायला लावले, 
आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.

२) तू आम्हांला आमच्या शेजाऱ्यांच्या निंदेचा विषय केले, 
आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा 
आणि नालस्तीचा विषय केले. 
राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे 
तू आम्हांला केले आहे, आम्हांला पाहून 
लोकांनी आमची चेष्टा करावी असे तू केले आहेस. तू

३) हे प्रभो, जागा हो, का झोपलास ? 
ऊठ, आमचा कायमचा त्याग करु नकोस! 
आणि आमचे दुःख आणि आमचा छळ का विसरतोस ?
तू आपले मुख का लपवतोस


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
तुझ्या आदेशांचे मार्ग मला समजावून दे, 
म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.

 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   १:४०-४५

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला."

एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला बरे करायला आपण समर्थ आहा." तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, बरा हो,” तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगून नको. प्रमाण पटावे म्हणून जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले आर्पण कर." पण त्याने तेथे जाऊन घोषणा करुन त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: शुभवर्तमानातील महारोगी आपल्या आजाराला कंटाळला होता. त्यातून मुक्त होण्यासाठी तो धडपडत होता. येशूच्या कार्याविषयीच्या बातम्या ऐकल्यावर त्याला आशेचा किरण दिसला. लगेच तो येशूकडे जातो, येशूसमोर विनम्रपणे गुडघे टेकतो व आजारमुक्त होण्यासाठी येशूची मनधरणी करतो, आणि येशू त्याची पीडा दूर करतो. एखाद्या माणसाला कधीकधी वाटते की, आपल्या जीवनात सगळेच काही ठीक नाही व त्यामुळे आपल्यातील मनःशांतीला उतरती कळा लागलेली आहे. अशी जाणीव होऊन तो अस्वस्थ होतो. कदाचित तो म्हणतो की, आपल्याजवळ पैशाची कमी नाही, देवाने आपल्याला गोड पत्नी आणि चांगली मुले दिली आहेत. आपण दुसऱ्यांना नेहमी मदत करतो म्हणून लोक आपली प्रशंसा करतात. पण ज्याप्रमाणे आपण पायात घातलेली बुटं बाहेरून किती ही आकर्षक वाटली तरी आतमध्ये खिळे आपल्या पायांना बोचत असतील तर त्या बुटांचा • काडीमात्र उपयोग नाही, आपल्या पायांचे संरक्षण करण्याऐवजी आपल्या पायांना ती जखमी करीत आहेत असे आपल्याला वाटते, नेमके तसेच आपले बाहेरचे वैभव इतरांना कितीही आकर्षक वाटले. आपले बाहेरचे अंग सुंदर दिसण्यासाठी कितीही मौल्यवान प्रसाधनांचा आपण उपयोग केला तरी आपल्या बाह्य वैभवाला किंवा आपल्या अंगकांतीला आपल्या दृष्टीने काही किंमत राहात नाही. म्हणून आपल्या जीवनात जे हानीकारक आहे ते आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी येशूच्या जवळ राहाण्यासाठी धडपड करायला हवी.

प्रार्थना :हे प्रभू येशू, जीवनातील सर्व गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे व योजनेप्रमाणे स्वीकारुन तुला शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या