शुभवर्तमान लूक १० : १-९
वाचक : लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊं नका, वाटेनें कोणाला मुजरा करूं नका.
ह्यानंतर प्रभूनें आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणीं तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविलें. तेव्हां त्यानें त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा; लांडग्यांमध्ये कोंकरें तसें तुम्हांस मी पाठवीत आहे, पाहा.पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊं नका, वाटेनें कोणाला मुजरा करूं नका. ज्या कोणत्या घरांत जाल तेथें, ह्या घरास शांति असो, असें प्रथम म्हणा. तेथें कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हांकडे ती परत येईल. त्याच घरांत वस्ती करून ते जें देतील तें खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरें बदलू नका. कोणत्याहि नगरांत तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचें स्वागत केलें तर ते जें तुम्हांस वाढतील तें खा. त्यांत जे दुखणाईत असतील त्यांना बरें करा व त्यांना सांगा की, देवाचें राज्य तुमच्याजवळ आले आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आध्यात्मिक जीवनात आपल्याला शिखर गाठायचे आहे, आकाशाला गवसणी घालायची आहे, शंभरापैकी शंभर गुण मिळवायचे आहेत. ह्यालाच पेरणाऱ्याच्या दाखल्यात “शंभर पट पीक” हे शब्द वापरले आहेत. शेतजमीन चांगली असली तरी शेतकरी जशी त्या जमिनीची काळजी घेईल व त्या जमिनीची मशागत करील तसे कमी अधिक प्रमाणात त्या जमिनीत उत्पादन निघेल. “कमी अधिक उत्पादन" ह्या शब्दांचा वापर यशू करतो. शेतकऱ्याने प्रयत्नांची शिकस्त केली तरच त्याला सर्वाधिक उत्पादनाची अपेक्षा करता येईल. प्रयत्नांची शिकस्त करणे म्हणजेच शेतीला मुबलक पाणीपुरवठा करणे, वेगवेगळी कीटक नाशके, खते वापरणे व निंदण काढणे. त्याचप्रमाणे माणसाला जर देवाचा शब्द अंतःकरणात खोलवर जाऊन एक आदर्शवत जीवन निर्माण करावयाचे असेल तर त्याने चांगल्या माणसांची संगत ठेवणे, पापाकडे नेणाऱ्या गोष्टींपासून दूर राहाणे, चांगल्या पुस्तकाचे वाचन करणे व एकांतात किंवा कुटुंबाबरोबर किंवा पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंतासमोर मनन-चिंतन व प्रार्थनेत पुरेसा वेळ घालविणे गरजेचे आहे.
प्रार्थना : हे प्रभू येश, आम्ही सर्वस्वी तुझ्या सत्यात आम्हाला समर्पित करतो, आम्हाला बंधमुक्त कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !