मंगळवार २२ मार्च २०२२
(उपवासकाळ ३रा सप्ताह )
✝️
संत मारिया जोसेफा येशूचा हृदया
(१८४२-१९१२)
क्षमादान हे देवाचे दान आहे व त्यामुळे देवावरोवर आपला समेट घडून येत असतो. क्षमा केल्याने क्षमा मिळते व त्यामुळे बंधुभगिनीबरोबर सुद्धा समेट होतो.
क्षमेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रभू येशूने कृतघ्न चाकराचा दृष्टांत सांगितला आहे. राजाने लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याचे देणे सोडून दिले, मात्र त्या कर्जदाराने शंभर रुपये देणे असलेल्या दासाला तुरुंगात टाकले. राजा त्या कर्जदाराला म्हणतो, "मी जशी तुझ्यावर दया केली तशी तू हि आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?" आपण देवाच्या दयेला आणि क्षमेला पात्र होण्यासाठी अगणित वेळा इतरांवर दया आणि क्षमा करण्यास तयार असायला हवे.
आपण आज स्वतःच्या जीवनात देवाने असंख्य वेळा आपल्याला क्षमा केल्याची आठवण करु या. देवाने आपल्यावर दया करुन कृपेचे वरदान | दिल्याचे क्षण आठवू या. देव दयाळू व क्षमाशील आहे तसेच आपणसुद्धा असावे म्हणून अंतर्मुख बनून क्षमेच्या दानावर चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन दानिएल ३:२५,३४-४३
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आमचे पश्चात्तापी हृदय आणि विनम्र मन स्वीकार."
अजऱ्या आगीच्या मध्यभागी उभा राहून उंच स्वरात प्रार्थना करू लागला : तू आपल्या नावाला स्मरून आमचा सदासर्वदा त्याग करू नकोस; आम्हांसाठी आपले वचन रद्द करू नकोस; आपला मित्र आब्राहाम, आपला सेवक इसहाक तसेच आपले भक्तगण इस्रायलचे यांचे स्मरण कर व आपली कृपादृष्टी आमच्यापासून फिरवू नकोस; तूच असे वचन दिले होतेस की, आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे व समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुमचे वंशज संख्येने वाढतील. हे प्रभो, संख्येच्या दृष्टीने आम्ही सर्व राष्ट्रात लहान झाले आहोत आणि आमच्या पापांमुळे सर्व पृथ्वीवर आमचा अपमान होत आहे. आता तर राजा नाही, संदेष्टा नाही, नेता नाही अर्पण नाही, यज्ञ नाही, बळी नाही आणि धूपदानपण नाही; अशी एकही जागा नाही की, जेथे तुझी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तुला अर्पण करता येईल. आमचे पश्चात्तापी हृदय आणि विनम्र मन मेंढ्या आणि बैल तसेच हजारो पुष्ट बकऱ्या ह्यांच्या बलीप्रमाणे तुला मान्य होवो; आज तुझ्यासाठी हेच आमचे बलिदान असो, आम्हांला पूर्णपणे तुझ्या मार्गावर चालव, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच निराशा होत नाही. आता आम्ही असा दृढ निश्चय करतो की, आम्ही तुझ्या मार्गाने चालू, तुझ्यावर श्रद्धा ठेवू आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले असू. आमची निराशा करू नकोस, तर आमच्याबद्दल आमची सहनशीलता तशीच महान दया प्रदर्शित कर. हे प्रभो आपल्या अपूर्व कार्याद्वारे आमचे रक्षण कर आणि आपले नाव सन्मानित कर!
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २४: ४-९
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या वात्सल्याचे स्मरण कर.
१) प्रभो, तुझे मार्ग मला दाखव.
तुझ्या वाटा मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
मला वळण लाव.
कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.
२) प्रभो, तुझे वात्सल्य आणि तुझे अढळ प्रेम
यांचे स्मरण कर. ते पूर्वापार चालत आले आहे.
माझ्या तारुण्यातील पापांची व अपराधांची
आठवण करू नकोस. प्रभो, तुझे अढळ प्रेम
आणि तुझे चांगुलपण लक्षात घेऊन माझी आठवण ठेव.
३) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे.
तो पाप्यांना सन्मार्गाने जायला शिकवतो.
नम्रजनांना न्यायपरायणता दाखवतो.
आपला मार्ग गरिबांना प्रकट करतो.
जयघोष योहान ११:२५
प्रभू म्हणतो, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येक जण, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
शुभवर्तमान मत्तय १८:२१-३५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १८:२१-३५
“जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही."
पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय ?" येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही तर सातांच्या सत्तर वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे शंभर शेकेल येणे होते. तेव्हा तो त्याला पकडून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुंरुगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू आपणास क्षमा करण्याविषयी उपदेश देत आहे. साताच्या सत्तर | वेळा म्हणजे अगणित वेळा क्षमा करण्याचे तो आपणांस आवाहन करीत आहे. ह्या दाखल्यातील तीन व्यक्तींच्या वागण्यावर आपण विचार करूया. पहिला कर्जदार, तो राजाकडे क्षमायाचना करतो राजा दयाळू व क्षमाशील असल्यामुळे तो ह्या कर्जदाराला सर्व माफ करतो. पण हा पहिला कर्जदार आपल्या सोबतीच्या बांधवांबरोबर दुष्टतेने वर्तन करतो. हा पहिला कर्जदार म्हणजे आपण आहोत व राजा म्हणजे आपला स्वर्गीय पिता आहे. स्वर्गीय पिता आपणांस अनेक देणग्या फुकट देत असतो, अनेक वेळेला आपण जेव्हा चुकतो व देवाकडे क्षमेची याचना करतो तेव्हा देव आपणांस क्षमा करीत असतो, आपण नेहमीच देवाच्या ऋणात / कर्जात जीवन जगत असतो. पण जेव्हा |आपले कुटुंबातील लोक, मित्र, शेजारी आपल्याकडून काही मागतात, आपल्याकडून क्षमेची अपेक्षा करतात तेव्हा आपण देवाने आपणांस दाखवलेल्या दयेचा व क्षमेचा अनुभव आपल्या ह्या बांधवांना देत नाही. जशी देव आपणांस क्षमा करतो तशीच क्षमा आपण आपल्या बांधवांना करावी अशी देवाची इच्छा आहे, जर आपण असे केले नाही तर आपणसुद्धा त्या दुष्ट दासाप्रमाणे शिक्षेस पात्र ठरणार आहोत.
प्रार्थना : हे प्रभू येशू, क्षमा करण्यास व क्षमा मिळविण्यास आम्हाला धैर्य व सामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️