Marathi Bible Reading | 3rd March 2022 | Thursday After Ash Wednesday

राखेचा बुधवारनंतरचा  गुरुवार 

 दि.३ मार्च २०२२

✝️ 
“दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे.'
संत कैथरीन 
✝️

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराची आज्ञा, विधी व नियम पाळण्यासाठी व त्याच्या मार्गात चालणाऱ्यासाठी आपल्याला आवाहन करण्यात आले आहे. आपले जीवन सर्वस्वी देवावर अवलंबून असावे म्हणून आज आपण चिंतन करु या.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या तारणासाठी सर्वस्वाचा त्याग  केला. आपल्या सर्वाची पापे कालवारी पर्यंत वधस्तंभावर वाहून नेली. वधस्तंभावरीलमरणाद्वारे त्याने आपल्याला मुक्तीचे वरदान मिळवून दिले. प्रभू येशूचे वधस्तंभावरीलबलिदान म्हणजे परमेश्वराच्या मानवावरीलप्रीतिचा तो  महान अविष्कार आहे. प्रभू येशू स्वतः प्रेम, दया, क्षमा, शांती, सेवा आणि त्यागाचे महान उदाहरण आहे. आपण सर्वजण त्या महान बलिदानाचे साक्षीदार आहोत. आपण प्रभूला अनुसरणारे असावे, त्याच्यासारखे दररोजचा वधस्तंभ उचलून घेऊन त्याग करणारे असावे. जीवनातीलसर्व क्लेश, दु:खे, आजार,  निराशा, अपयश आज प्रभूठायी आपण समर्पित करु या.

ह्या उपवास काळात आपण लहान-सहान गोष्टीत त्याग करुन प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी प्रेरणा मागू या. प्रभूला अनुसरण्यासाठी व त्याचे सच्चे अनुयायी बनण्यासाठी वधस्तंभाचा संदेश आचरणात आणू या. 

✝️
पहिले वाचन अनुवाद ३०:१५-२०
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन

"पाहा, आजचा दिवस मी आशीर्वाद आणि शाप म्हणून ठरवतो." मोशेने सर्व लोकांना बोलावले व त्यांना म्हटले, पाहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करील. पण तुझे मन बदलून तू ऐकले नाहीस आणि बहकून अन्य देवाचे भजनपूजन केलेस तर मी तुला आज बजावून सांगतो की, तुझा खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करुन घेण्यास जात आहेस तेथे तू चिरकाल राहणार नाहीस. आकाश आणि पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी सांगतो की, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ्यापुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा. कारण त्यातच तुझे जीवन आहे. त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे असे केल्याने जो देश देण्याविषयी परमेश्वराने तुझे पूर्वज आब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन दिले आहे आणि त्यात तुझी वस्ती होईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :१-४,६
प्रतिसाद : प्रभूवर विश्वास ठेवणारा आनंद पावतो.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, 
पातक्याच्या वाऱ्याला उभा राहात नाही, 
किंवा देवनिंदकाच्या बैठकीत सामील होत नाही 
उलट जो प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, 
त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य!

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते 
यथाकाळी त्याला बहर येतो. त्याची पाने कोमेजत नाहीत 
अशा झाडाजवळ तो असतो. 
तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३)पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही! 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.



जयघोष 
आज आपली हृदये कठीण करू नका.
तर परमेश्वराचा आवाज ऐका.

शुभवर्तमान लूक ९:२२-२५

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. "

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री ह्याच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे."
त्याने सर्वांना म्हटले, "जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने आत्मत्याग करावा व रोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वतःचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आजच्या पहिल्या वाचनात मोशे इस्रायली लोकांना जीवन व मरण, आशीर्वाद व शाप ह्यामधून निवड करण्यास सांगत आहे. परमेश्वराचे आशीर्वाद व जीवन मिळविण्यासाठी म्हणजेच योग्य निवड करण्यासाठी एकाच देवावर प्रेम करून त्याचे नियम पाळण्याचे आवाहन मोशे लोकांना देतो. देवाचे नियम पाळले तर देव आपणास बहुगुणित करील व आपले कल्याण करील ह्यात शंका नाही. जीवन जगत असताना अनेक वेळेला आपणांस निवड करावी लागते. “निवड” ही अत्यंत महत्वाची असते. ह्याच निवडीवर आपले संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. आपण जर जीवनात योग्य गोष्टींची, योग्य  व्यक्तींची निवड केली तर आपण जीवनाचा आनंद उपभोगतो पण जर आपली निवड चुकली तर आपणांस त्याच्या वाईट परिणामास सामोरे जावे लागते. म्हणूनच योग्य निवड करण्याची सुबुद्धी आपणास लाभणे गरजेचे असते आणि ही प्रेरणा  आपणांस देव देत असतो. योग्य निवड कशी करावी यासाठी आजचे पहिले वाचन आपणास बोध करीत आहे. माझ्या जीवनात मी केलेली निवड योग्य आहे का? माझी निवड मला परमेश्वराकडे घेऊन जाते की त्याच्यापासून दूर घेऊन जाते यावर मनन करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, वधस्तंभाला स्वीकारण्यास व त्याग करुन तुला  अनुसरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन. 


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या