Marathi Bible Reading | 4th March 2022 | Friday After Ash Wednesday

राखेचा बुधवारनंतरचा  शुक्रवार  

 दि.४ मार्च २०२२

✝️ 
"तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निरश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, 


संत कासिमीर  
राजपुत्र, वर्तनसाक्षी (१४५८-१४८४)
✝️

“उपवासाचा खरा अर्थ” (यशया)
पूर्वीच्या काळी अंगावर राख फासून व गोणपाट नेसून उपवास केला जाई.  देवाबरोबर जवळीकता न साधता वरवरुन देखावा करणारा उपवास लोक करीत  असत. आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करुन स्वत:ला प्रश्न विचारु या.  माझा उपवास योग्य प्रकारचा आहे का? विशेष रितीने यशया संदेष्ट्याने दिलेल्या  उपवासाच्या संदेशावर मनन चिंतन करु या. आपले दैनंदिन व्यवहार बाजूला ठेवून  प्रार्थनेबरोबरच उपवासाला कृतीची जोड नसेल तर तो खरा उपवास होऊच शकत  नाही. आपले आत्मपरिक्षण करून स्वतःमधील दुष्टतेच्या सर्व बंधनातून आपण प्रथम  मुक्त व्हायला हवे. इतरावर अन्याय न करता अन्यायग्रस्तास साहाय्य करावे.  भुकेल्यांना अन्न, निराश्रितांस आधार, उघड्यांस वस्त्र व गरजवंतास साहाय्य करावे असा सल्ला आपल्याला देण्यात आला आहे. परमेश्वराला तोच उपवास पसंत आहे.

आपण जेव्हा अशा प्रकारे उपवास पाळू तेव्हाच तो खरा उपवास असेल । कारण प्रभू येशू म्हणतो, “मी भूकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाण्यास दिले, तान्हेला  होतो तेव्हा प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो  तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला”(मत्तय २५:३५-३६).


✝️
पहिले वाचन यशया ५८:१-९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय ?"

प्रभू म्हणतो, कंठरव कर, कसर करु नको, आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांना त्याचे अपराध, याकोबच्या घराण्याला त्याची पातके विदित कर. ते तर रोजरोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करतो ते तू का पाहात नाहीस? आम्ही आपल्या जिवाला पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पाहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता, पाहा तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की, तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने मारामारी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जिवाला पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय ? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निरश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला विन्मुख होऊ नये हाच तो उपवास नव्हे का? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल. तुझी जखम लवकर भरेल. तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, मी येथे आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५१:३-४,६,१८-१९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस.

१) तुझ्या दयेला अनुसरून माझ्या 
अपराधाचे कलंक पुसून टाक. 
मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर.

२) माझे अपराध मी जाणून आहे. 
माझे पाप मला सतत टोचत आहे. 
तुझी केवळ अवज्ञा करून मी पाप केले आहे. 
तुझ्या दृष्टीने वाईट ते केले आहे.

३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. 
होमार्पणाचीदेखील तुला आवड नाही. देवा, 
तुला शरण आलेला आत्मा हाच माझा यज्ञ. 
नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.


जयघोष 
माझा आत्मा प्रभूची प्रतीक्षा करतो. मी प्रभूच्या शब्दांवर विसंबून आहे कारण प्रभूच्या ठायी क्षमाशीलता आहे आणि तोच सर्वस्वी मुक्तिदाता आहे.

शुभवर्तमान  मत्तय  ९:१४-१५

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "वर त्याच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील. "

योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाहीत. ह्याचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: सध्या आपण प्रायश्चित्त काळात मार्गक्रमण करीत आहोत, आपण प्रत्येकजण कोणत्या न कोणत्याप्रकारे उपवास करीत असाल. काहीजण मांसाहारी गोष्टींचा त्याग करून, काही जण दारू, सिगारेट अश्या पदार्थांचा त्याग करून, व्हॉट्सअॅप - फेसबुक अश्या साधनांचा त्याग करून उपवास करीत असतील. खरा उपवास म्हणजे नक्की काय ? देवाला पसंत पडणाऱ्या उपवासाविषयी यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे. आपले सर्वच उपवास हे बाह्य स्वरूपाचे असतात ह्या उपवासामुळे आपल्या अंतःकरणात काहीच फरक पडत नाही आणि असा उपवास देवाला अजिबात पसंत नाही. आपण जी उपवासाची बाह्य कृती करतो तिला आपल्या प्रेमळ व कनवाळू अंतःकरणाची साथ लाभली पाहिजे. जेव्हा इतरांबरोबरचे आपले वागणे समंजस व सहनशील असेल तेव्हाच परमेश्वर आपला उपवास व प्रार्थना ह्याकडे लक्ष लावील व आपणास त्याचे योग्य प्रतिफळ देईल. माझा उपवास व प्रार्थना परमेश्वराला संतोषविणाऱ्या आहेत का ह्यावर मनन करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुजवर प्रीति करण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन. 


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या