राखेचा बुधवारनंतरचा
शनिवार
दि.५ मार्च २०२२
✝️
“मी पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे."
✝️
आपल्या जीवनाचे नुतनीकरण करण्यासाठी श्रध्देबरोबरच कृती करण्याची गरज आहे इतरांवर अन्याय न करणे, इतरांना दोष न देणे व सर्वातोपरी गरजवंतांस सहाय्य करणे हे खऱ्या पश्चात्तापी आणि श्रद्धावान माणसाचे आद्यकर्तव्य आहे. यशयाच्या पुस्तकात म्हटले आहे की अशा माणसाच्या जीवनात परमेश्वर मार्गदर्शक बनून त्याला प्रकाशात आणील. विशेष रितीने जीवनाचे नुतनीकरण करण्यासाठी परमेश्वर प्रत्येकाला बोलावित असतो. प्रभू येशूने जकात नाक्यावर कर जमा करणाऱ्या लेवीला पाचारण केले आहे . प्रभू त्याला म्हणाला, 'माझ्या मागे ये,' आणि तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला.
येशू जीवनात आल्यावर माणूस सर्वस्व सोडून देऊन त्याला अनुसरतो. माणसाच्या हृदयाचे परिवर्तन होते व तो देवाच्या उदारतेबद्दल आनंद व्यक्त करतो. त्याच्या आनंदात तो सर्वांना सहभागी करून घेतो. त्याचा भूतकाळ विसरून तो लोकांची पर्वा न करता देवाला प्राधान्य देतो. लेवीच्या जीवनाचे परिवर्तन झाले. लोकांनी येशूजवळ कूरकूर केली मात्र येशूने म्हटले, 'मी पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.'
ह्या उपवासकाळात प्रभू येशू आपल्याला पश्चात्तापासाठी आणि परिवर्तनासाठी बोलावित आहे. प्रभू येशूच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याला अनुसरण्याचा निश्चय करुया. त्याग, समर्पण आणि सत्कृत्ये करुन देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊ
✝️
पहिले वाचन यशया ५८:९-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्वतःच्या मार्गाने न जाण्याने तू प्रभूचा आदर करशील."
प्रभू म्हणतो, “जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, दुःखग्रस्त जिवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील. तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुनः बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन: उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्वार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे. परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालव नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्याठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८६:१-६
प्रतिसाद : प्रभो, मला मार्गदर्शन कर.
१) माझ्याकडे लक्ष दे प्रभू, मला उत्तर दे.
मी गरीब व गरजवंत आहे.
माझ्या जिवाला जप कारण मी तुझा भक्त आहे.
तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या दासाचे रक्षण कर.
२) तू माझा देव आहेस. म्हणून माझ्यावर दया कर.
हे स्वामी, सारा दिवसभर मी तुझा धावा करतो.
या तुझ्या दासाच्या मनाला आनंद वाटू दे.
कारण हे स्वामी, माझा जीव तुझ्याकडे लागला आहे.
३) स्वामी, तू किती चांगला आहे.
तू क्षमाशील आहेस.
तुझा धावा करणाऱ्यांना तू दयासागर आहेस.
माझी प्रार्थना ऐक.
हे प्रभू, माझ्या याचनेच्या शब्दांकडे लक्ष दे.
जयघोष
जे अपराध तू माझ्याविरुद्ध केले आहेत, ते तुझ्यातून निघून जाऊ दे आणि तुझ्यामध्ये नवीन आत्मा आणि नवीन शक्ती येवो.
शुभवर्तमान लूक ५:२७-३२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही, तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलोआहे."
येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, "माझ्यामागे ये." तेव्हा तो सर्व काही तेथून सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.
मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले "जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता ?" येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलो आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू सांगतो की, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर रोग्यांना , वैद्याची गरज आहे.” येथे येशू स्वतःला वैद्य व जे पापी, लाचार, एकाकी, निराश अश्या सर्वाना रोगी असे संबोधतो. येशू येथे आपणांस सांगतो की, ह्या सर्व दुर्लक्षित लोकांसाठी मी सदैव उपलब्ध आहे. फक्त पापी, लाचार एकाकी अश्या व्यक्तींनाच येशूची गरज आहे का? अनेक वेळेला आपण “निरोगी” असल्यासारखे वागतो, शुभवर्तमानातील शास्त्री-परूश्यांप्रमाणे आपण इतरांवर बोट दाखवत असतो. माझे वागणे अगदी योग्य आहे व इतरांचे वागणे हे चुकीचे आहे अशी आपली धारणा असते. इतरांची निंदा करणे, एखाद्याविषयी अफवा पसरवणे, एखाद्याने केलेल्या चुकीविषयी इतरांना सांगणे असे वर्तन आपल्या आध्यात्मिक रोगीपणाचे लक्षण आहे. आपल्याला आपल्या कमीपणाची जाणीव होणे फार गरजेचे आहे. मी सुद्धा चुकतो ही जाणीव मनात ठेवून इतरांना योग्य वागणूक देण्याचा निश्चय करू या. व येशूची गरज मला नेहमीच आहे, माझ्या कोणत्या “आजारी” सवयींना येशूकडून इलाजाची गरज आहे यावर मनन करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, पश्चात्तापी अंत:करणाने आम्ही तुझ्याजवळ येतो. आमचे जीवन परिवर्तन कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या