Marathi Bible Reading | First Sunday of the Lent | 06 March 2022 |

 रविवार ६ मार्च २०२२ 

(उपवासकाळ १ ला रविवार)

✝️ 
“अरण्यात येशूची परीक्षा " 
“परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे."

✝️

 अनुवाद २६:४-१०, स्तोत्र ९१:१-२, १०-१५,
रोमकरांस १०:८-१३. लुक ४:१-१३
प्रभू येशू खरा देव आणि खरा मनुष्य होता म्हणूनच सैतानाने  पसरलेल्या मोहजाळात न अडकता त्याने आत्मविश्वासाने त्या परीक्षेला तोंड  दिले. आपण ह्या जगात आव्हानात्मक जीवन जगत असताना येणाऱ्या  अडचणी, मोह व दुष्ट शक्तींबरोबर सामना कसा करावा ह्याचे उत्तम उदाहरण  प्रभू येशू स्वतः आहे. 
उपवास काळातील आजच्या पहिल्या रविवारी आपण  ह्या अनुषंगाने चिंतन करु या.
 आपले स्वतःबद्दलचे स्वतःशी, देवाशी आणि आपल्या बंधु भगीनीशी असलेले नाते घट्ट असायला हवे. आपल्या सशक्तपणाची व अशक्तपणाची जाणीव आपल्याला असायला हवी, म्हणजेच आत्मपरिक्षण करून मी स्वतःला ओळखावे. आपले देवाबरोबरचे नाते कोणत्या प्रकारचे आहे ते तपासावे  आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा परमेश्वराकडे आहे का? आजच्या  शुभवर्तमानात म्हटले आहे, 'परमेश्वर तुझा देव त्याला नमन कर त्याचीच सेवा  कर.' त्याचबरोबर आपल्या बंधु भगिनीबरोबरचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत का? ते पहावे. ह्या सर्व प्रकारच्या आचरणाद्वारे परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे  असेलतर प्रभूच्या वचनानुसार जीवन जगणे गरजेचे आहे. प्रभू म्हणतो, 'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने  जगेल. जगातीलमोहाला व प्रलोभनांना बळी न पडता प्रभू येशू ख्रिस्ताशी  एकनिष्ठ राहून त्याची शिकवण अमलात आणू या. प्रार्थना, उपवास आणि दान धर्म करुन आपले संबंध घट्ट बनवू या. 

✝️   

पहिले वाचन अनुवाद २६:४-१०
वाचक अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"निवडलेल्या लोकांची श्रद्धा'

मोशेने लोकांना म्हटले, "मग याजकाने तुझ्या हातून प्रथम उत्पन्नाची पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर याच्यासमक्ष असे म्हण: माझा मूळपुरूष एक अरामी मनुष्य होता. तो नष्ट होण्याच्या बेतास आला तेव्हा तो आपला लहानसा परिवार घेऊन इजिप्त देशात गेला व तेथे परदेशी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान, सामर्थ्यवान व संख्येने मोठे असे राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे इजिप्तच्या लोकांनी आम्हांला वाईट प्रकारे गांजले व आम्हांवर बिकट दास्य लादले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव पमेश्वर याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळवणूकही पाहिली, तेव्हा परमेश्वराने समर्थ बाहूने व हात उगारून, भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हांला इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आम्हांला या स्थळी आणून पोहोचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला. यास्तव, हे परमेश्वरा, पाहा, जमिनीचा जो प्रथम उपज मला तू दिला आहेस, तो मी तुला आणला आहे. मग तू आपला देव परमेश्वर याच्यासमोर ती पाटी ठेवून त्याला दंडवत घाल.'

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९१:१-२,१०-१५
प्रतिसाद : प्रभो, संकटप्रसंगी तू माझ्याजवळ राहा.

१) जो परात्पराच्या आश्रयी वसतो, 
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. 
तो परमेश्वराला म्हणतो, 
"तू माझा आश्रय तू माझा दुर्ग, 
तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो."

२) कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. 
कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. 
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची 
तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

३) तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये.
म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.
तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील
तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. 

४) त्याचे प्रेम माझ्यावर आहे, म्हणून 
मी तुला मुक्त करीन. 
त्याला माझ्या नामाची जाणीव आहे 
म्हणून मी त्याला निर्भय ठेवीन. 
तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन.
 संकटसमयी मी त्याच्याजवळ असेन 
आणि मी त्याचा गौरव करीन,

दुसरे वाचन  पौलचे रोमकरांस १०:८-१३
वाचक: पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन १०:८-१३

"ख्रिस्ती माणसाची श्रद्धा."
नीतिमत्व काय म्हणते ?
ते वचन तुझ्याजवळ आहे. तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवीत आहो ते हेच होय, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, "त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फनीत होणार नाही." यहुदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही. कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो.

शुभवर्तमान लूक  ४:१-१३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“आत्म्याने येशूला रानात नेले, तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. "

येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्याला भाकर हो असे सांग." येशूने त्याला उत्तर दिले, "मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे लिहिले आहे." मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, "ह्यांवरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, माझ्यावर सोपवून दिले आहे व माझ्या मनाला येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल."

येशूने त्याला उत्तर दिले, “परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे." नंतर त्याने त्याला येरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून उडी टाक. कारण तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील," असे शास्त्रात लिहिले आहे.

पुढे येशूने त्याला उत्तर दिले, “परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस, असे सांगितले आहे." मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: प्रायश्चित्तकाळ दोन प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून साजरा केला जाईल. बाप्तिस्म्याची तयारी करीत असलेल्या उमेदवारांना अधिक गांभीर्याने तयारी करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे त्यांना आपल्या बाप्तिस्म्याच्या वचनांचे नूतनीकरण करण्यास प्रवृत्त करणे. कालांतराने चर्चमध्ये प्रौढांचा बाप्तिस्मा मागे पडला व बाळांना बाप्तिस्मा दिला जाऊ लागला. त्यामुळे प्रायश्चित्तकाळाचा पहिला हेतू मागे पडला आणि दुसरा हेतू अधिक प्रमाणात उजेडात आला. आजही पुनरुत्थानाच्या जागरणविधीत बाप्तिस्म्याच्या अभिवचनांचे नूतनीकरण केले जाते व भाविकांवर पवित्र पाणी शिपडले जाते. त्याचीच पूर्वतयारी म्हणून सहा रविवारी विशिष्ट विषय डोळ्यांसमोर शास्त्रवाचनांद्वारे ख्रिस्तसभा आपल्याला मार्गदर्शन करते. आजच्या वाचनांचा विषय आहे आपल्या श्रद्धेची कबुली देणे. तिन्ही वाचनांमध्ये ही कबुली विविध पातळींवर दिली जाते. 
१. सणावाराच्या प्रसंगी : आपल्याकडे जसे शेतीच्या हंगामाचे विविध सण असतात तसे इस्राएलमध्ये प्रथम उत्पन्न अर्पण करण्याचा सण होता. त्या सणाच्या वेळी परमेश्वराने आपल्या पूर्वजांसाठी केलेल्या उपकारांची आठवण करून परमेश्वरावरील श्रद्धा कबूल केली जाई हे आपल्याला पहिल्या वाचनातून समजते. 
२. सार्वजनिक उपासनेच्या वेळीः संत पौल रोमकरांस मार्गदर्शन करताना आपल्या जिथे ते आपली श्रद्धा कबूल करण्यास व आपल्या अंतःकरणात त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. त्यातच त्यांचे तारण दडलेले आहे असे त्याचे म्हणणे आहे. 
३. वैयक्तिक मोहप्रसंगी : वैयक्तिक मोहाच्या वेळी आपल्या श्रद्धेची कबुली कशी द्यावी ह्याचा आदर्श येशूला झालेल्या मोहांमधून ख्रिस्तसभा आपल्यासमोर उभा करते. अशा मोहाच्या प्रसंगी सैतानाचा धिक्कार करता यावा म्हणून सातत्याने बायबलचे वाचन सुरू असणे आवश्यक आहे. असे येशूने सैतानाला दिलेल्या उत्तरावरून दिसून येते. 
आत्मपरीक्षण : विविध प्रसंगी व विविध पातळीवर मी माझ्या श्रद्धेची कबुली कशाप्रकारे देतो ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सैतानाच्या मोहाला बळी न पडता तुझ्या प्रकाशात चालण्यास मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या