Marathi Bible Reading | Monday 07th March 2022 | First week of the Lent |

 सोमवार  ७  मार्च २०२२ 

(उपवासकाळ १ ला सप्ताह )

✝️ 
"मी तुम्हांला सत्य सांगतो ज्याअर्थी तुम्ही कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे."
संत परपेच्युआ व फेलसीटी 
रक्तसाक्षी (२०३)
✝️

  मोशेद्वारे दहा आज्ञांचा पुनरुच्चार केलेला आपण आजच्या वाचनात पाहतो देवप्रीति  आणि परस्पर प्रीतिच्या आज्ञा पाळण्यानेच मानवाला नीतिमत्व प्राप्त होणार  असल्याचे स्पष्टीकरण देण्यात  आले  आहे.
 शेवटच्या न्यायाच्या दिवशी घडणाऱ्या घटनेचा वृत्तांत| देण्यात आला आहे. देवाच्या आज्ञा पाळणारे ते आशिर्वादित आणि देवाविरुद्ध  वागणारे ते शापित ठरविले जातील. प्रभू येशू स्पष्टपणे  सांगत आहे की, 'ज्या अर्थी ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकासाठी केले त्या अर्थी ते मला केले.' भूकेल्यांस अन्न, तान्हेल्यास पाणी, उघड्यांस वस्त्र,  निराश्रितांस आश्रय, आजाऱ्यांना व बंदिवानाना भेट देणे अशा अनेक प्रकारे  आपण देव प्रीतिची आज्ञा पाळू शकतो. देवाचे प्रतिरुप असलेली प्रत्येक व्यक्ती आपला बंधु व भगिनी आहे, म्हणूनच त्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. आजच्या चंगळवादी युगात आपल्याला गरजवंतांचा विसर पडलेला असताना  प्रभू येशू जणू सांगत आहे की सर्व गरजवंतांमध्ये तुम्ही माझा चेहरा पाहा. संत  मदर तेरेजांनी सुद्धा प्रत्येकामध्ये ख्रिस्ताचा चेहरा पाहिला व त्यांची सर्वतोपरी  सेवा केली.

गरजवंतांमध्ये आपण ख्रिस्त पहावा, जाणावा, ओळखावा आणि त्याची सेवा  करण्यासाठी पुढाकार घेता यावा म्हणून आज अंतर्मुख बनून प्रभूकडे विनयशील व परोपकारी हृदय मागू या.

✝️   

पहिले वाचन लेवीय १९:१-२,११-१८
वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर." 

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएलच्या सर्व मंडळींस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. माझ्या नावाची शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.
आपल्या शेजाऱ्यांवर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको, मजुराची मजुरी रात्रीचा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको.
बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नको, ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे.
न्यायनिवाडा करताना अन्याय करू नको. गरिवाकडे तुच्छतेने पाहू नको आणि सामर्थ्यापुढे नमू नको, आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर. आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर उठू नको, मी परमेश्वर आहे.
आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको. आपल्या शेजाऱ्याची अवश्य कानउघाडणी कर, नाही तर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १९:८-१०,१५
प्रतिसाद :  प्रभो, तुझी वचने आम्हाला आत्मा व जीवन आहेत.
१) प्रभूचे नियम योग्य आहेत. 
ते हृदयाला आनंदित करतात. 
प्रभूची आज्ञा सुस्पष्ट असते. 
तिच्यामुळे ज्ञानचक्षू तेजस्वी होतात.

२) प्रभूप्रणित धर्म विशुद्ध असतो. 
तो कायम टिकणारा असतो. 
प्रभूचे आदेश यथान्याय असतात.
 ते संपूर्णत: सरळ असतात.

३) प्रभूची वाणी परिशुद्ध आहे. 
ती अनंतकाळपर्यंत तयार असते. 
प्रभूचे निर्णय खरे आहेत. 
ते सर्वच्या सर्व न्याय्य आहेत.

४) प्रभो, तू माझा आधार आणि मुक्तिदाता आहेस, 
माझ्या मुखातून जे शब्द निघतात 
आणि माझ्या मनात जे विचार उठतात, 
ते सर्वच्या सर्व तुला आवडोत.


जयघोष 

प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ, 
कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही, 
तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे, 
यात मला संतोष आहे

शुभवर्तमान  मत्तय  २५:३१-४६

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “ज्याअर्थी तुम्ही ह्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले त्या अर्थी ते माझ्यासाठी केले आहे." 

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,"जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले. परका होतो तेव्हा मला घरात घेतले. उघडा होतो तेव्हा तुम्ही वस्त्र दिले. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला. बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, “प्रभूजी,आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले ? केव्हा तान्हेला पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला सत्य सांगतो ज्याअर्थी तुम्ही कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यानाही तो म्हणेल, अहो, शापग्रस्तहो माझ्यापुढून निघा. सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही. उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला सत्य सांगतो की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील."


प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजच्या शुभवर्तमानात आपण शेवटच्या न्यायाविषयी ऐकतो. येथे आपणांस फक्त देव शेवटी आपला कसा न्याय करील ह्याविषयी सांगितले नाही तर हा दाखला एक नैतिक शिकवण आहे, आपण इतरांबरोबर कसे वर्तन करावे ह्याविषयी आपणास बोध केला आहे. ख्रिस्ती म्हणून फक्त निष्क्रियपणे येशूच्या परत येण्याची वाट पहात न बसता चांगले कार्य करण्याचे आपणांस आवाहन केले आहे. शेवटच्या न्यायप्रसंगी सार्वकालिक जीवनास पात्र व्हायचे असेल तर काय केले पाहिजे ते आजचे शुभवर्तमान आपणांस सांगत आहे. येशू पुन्हा एकदा आपणांस इतरांवर प्रेम करण्याचे आवाहन करीत आहे. इतरांबद्दल फक्त चांगली धारणा मनात असून चालणार नाही तर त्या भावनेला कृतीची जोड द्यायला येशू सांगत आहे. येशूबरोबर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे का? नसेल तर माझ्या जीवनात, जीवन शैलीत काय बदल केला पाहिजे ह्यावर मनन करू या.

प्रार्थना :हे प्रभू येशू, सर्व गरजवंतांमध्ये तुला निरखून पाहण्यास व तुझ्या
सेवेचा अनुभव घेण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या