मंगळवार ८ मार्च २०२२
(उपवासकाळ १ ला सप्ताह )
✝️
" जसे स्वर्गात तसे पृथ्वावरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो "
देवभक्त संत जॉन
वर्तनसाक्षी (१४९५-१५५०)
चिंतन : हे प्रभो, तुझे काटे माझी गुलाबे आहेत आणि तुझे दुःखसहन माझा गौरव आहे म्हणूनच वेळ असेपर्यंत मी सर्व प्रकारची चांगली कामे अखंडितपणे करीत राहीन. मला तुझी शक्ती दे. - देवभक्त संत जॉन
✝️
परमेश्वर त्याच्या योजना व कार्य त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्णात्वास नेत असतो. परमेश्वराचे वचन फलदायी असते म्हणूनच आपल्या प्रार्थनेत देवाची इच्छा प्रमाण मानावी व त्याच्या इच्छेली प्राधान्य द्यावे.
प्रभू येशू शुभवर्तमानात प्रार्थनेचे महत्त्व आणि अर्थ स्पष्ट करुन आपल्याला प्रार्थना कशी करावी ते शिकवित आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी काय हवे आणि कशाची गरज आहे हे स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रभूच्या प्रार्थनेतील ‘तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.' ह्या वचनांवर आपण चिंतन करीत आहोत.
आपली इच्छा असते की, आपल्या जीवनात सर्वकाही सुरळीत असावे व चांगले ते घडावे. आपल्या जीवनातील देवाची इच्छा जाणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. परमेश्वराचे वचन कधीच विफल होत नाही, त्यासाठी प्रार्थनेद्वारे परमेश्वराबरोबर संवाद साधून त्याची इच्छा जाणण्यासाठी आपले सर्वस्व त्याला समर्पित करायला हवे.
✝️
पहिले वाचन यशया ५५:१०-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझा शब्द माझ्या इच्छा पूर्ण करील."
प्रभू म्हणतो, “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:४-७,,१६-१९
प्रतिसाद : सात्त्विकांचा धावा प्रभू ऐकतो.
१) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा.
त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊ या.
मी प्रभूला शरण गेलो.
त्याने माझे ऐकले.
त्याने माझी सगळी भीती घालविली.
२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते.
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही.
मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला
आणि माझी संकटे हरण केली.
३) वाईट करणारांची आठवणदेखील
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून
प्रभू त्यांना विमुख होतो.
प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते.
त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात.
४) सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो.
तो सर्व संकटांतून त्यांना सोडवतो.
ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो.
ज्यांचे अवसान गळाले आहे अशांचा तो उद्धार करतो.
जयघोष
प्रभू म्हणतो, "आता तरी मनःपूर्वक माझ्याकडे वळा कारण मी कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे."
शुभवर्तमान मत्तय ६:७-१५
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे.
ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा :
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यांना देणे सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हांला सोड. आमची तू परीक्षा पाहू नको आणि आम्हांला वाईटापासून सोडव.
कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू सांगतो की, प्रार्थना करताना तुम्ही फक्त बडबड करू नका तर प्रार्थना म्हणजे देव व आपणातील संवाद आहे, एक नाते आहे हे लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थना करताना आपण किती मोठी प्रार्थना म्हणतो त्यापेक्षा प्रार्थनेमुळे आपल्या मनात निर्माण होणारी श्रद्धा व प्रेमभावना जास्त महत्वाची आहे. प्रार्थना म्हणजे केवळ बडबड नव्हे तर आपले जीवन संपूर्णतः देवाला शरण करणे. येशूने शिकवलेली “आमच्या स्वर्गीय बापा” ही प्रार्थना सर्वोत्तम प्रार्थना आहे. ही प्रार्थना आपणास प्रार्थना कशी करावी व कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी हे शिकविते. ह्या प्रार्थनेची सुरूवात आपण देवाला “स्वर्गीय बाप” असे संबोधून करितो,प्रार्थना करताना आपणसुद्धा प्रथम देवाची स्तुती करायला हवी, तद्नंतर आपण देवराज्य जगात प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करतो व शेवटच्या टप्प्यात आपल्या गरजांसाठी (रोजची भाकर, क्षमा, मोह ववाईटापासून संरक्षण) प्रार्थना करतो. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण हाच क्रम अनुसरला पाहिजे, सर्वकाही देवाच्या हातात आहे ह्या भावनेने आपण नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. मी कश्याप्रकारे प्रार्थना करतो ह्यावर मनन करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे अनुकरण करण्यास मला प्रेरणा व सद्बुद्धी दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या