Marathi Bible Reading | Wednesday 9th March 2022 | First week of the Lent |

 बुधवार   ९  मार्च २०२२ 

(उपवासकाळ १ ला सप्ताह )

✝️ 
“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही." "




रोमची संत फ्रान्सेस 
विधवा (१३८४-१४४०)

✝️
फ्रान्सेस म्हणत असे, “विवाहित स्त्रीने, आपण प्रथम एक गृहिणी आहोत ह्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यात देवाचा शोध घेता यावा म्हणून प्रसंगी आपले प्रार्थनामय जीवन वेदीपाशीच ठेवून प्रथम आपल्या घरातील कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत.”
फ्रान्सेसच्या वैयक्तिक पावित्र्याचे तेज, तिची आत्मा जिंकण्याबाबतची कळकळ आणि गोरगरिबांविषयींची गरज पाहून अनेक घरंदाज रोमन स्त्रिया ऐषाराम झटकून जागरूक बनल्या. त्यांनी एकत्र येऊन १४३३ साली तोर डी स्पेन्ची येथील बेनेडिक्टाईन ऑब्लेट काँग्रेगेशन ही सेवाभावी संस्था उघडली. आजही ही संस्था रोममध्ये आणि इतरत्र कार्यरत आहे. ह्या संस्थेत कठोर व्रतवैकल्ये नव्हती. कडक आचारसंहिता नव्हती परंतु प्रार्थनेविषयी व गोरगरिबांच्या सेवेविषयी निश्चित भूमिका आणि नियम होते.
दुसऱ्यांच्या अंतर्यामातील विचार ओळखणे, सैतानाचे डावपेच समजून घेणे, साक्षात्कार, दृष्टांत, आरोग्यदान आणि संदेश देणे इ. दाने फ्रान्सेस हिला लाभलेली होती. तब्बल २३ वर्षे देवाने तिला आपल्या रक्षक दुताचा शारीरिक दृष्टांत दिला.
आपल्या पतीच्या दुःखद निधनानंतर ती आपल्या संस्थेत पूर्णपणे कार्यरत राहिली. चार वर्षानंतर ९ मार्च १४४० रोजी तिला देवाघरचे बोलावणे आले. इ.स. १६०८ साली तिला संतपदामध्ये समाविष्ट करण्यात आले.
 
 निनवेच्या लोकांनी आपले दुराचरण सोडून पश्चात्ताप करावा आणि देवाबरोबर समेट करावा असा संदेश योनाने निनवेकरांना दिला. निनवेकरांनी  देवाचा संदेश स्वीकारला आणि पश्चात्ताप केला त्यामुळे त्यांचा बचाव झाला.  योना निनवेकरांसाठी देवाचे चिन्ह बनला, असे आजचे पहिले वाचन स्पष्ट  करीत आहे.

आपण सर्वजनण प्रायश्चित काळात आहोत व आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू योनाचे उदाहरण देऊन आपल्याला पश्चात्ताप करण्याचे आवाहन करीत  आहे. चिन्ह म्हणजे देवाचे वैभव प्रकट करण्यासाठी  परमेश्वर अद्भूत घटना घडवून आणित असतो तो क्षण. ख्रिस्तसभा ह्या काळात आपल्या सर्वांना पश्चाताप करण्यास प्रार्थना करण्यास, आणि परिवर्तनशील जीवन जगण्यास आवाहन करीत आहे. आपण आपल्या  जीवनावर चिंतन करु या की पश्चतापाच्या आणि समेटाच्या किती संधी आपण  वाया घालविल्या आहेत ? आपण देवापासून किती वेळा बहकलेलो आहोत ? 
✝️   

पहिले वाचन योना ३ :१-१०
वाचक : योना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“निनवेच्या लोकांनी आपले दुराचरण सोडले"

योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा आदेश आला. तो म्हणाला, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर." योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योनाने शहरातून जाण्यास सुरुवात केली आणि एक दिवसाच्या वाटचालीनंतर दवंडी पिटवून तो म्हणाला, “फक्त चाळीस दिवस, मग निनवे जमीनदोस्त होईल!” तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठांपासून तर कनिष्ठांपर्यंत सर्वजण  पश्चात्तापदर्शक गोणपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोहचली तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चात्ताप दाखविण्यासाठी गोणपाट नेसून तो राखेत बसला. मग त्याने फर्मान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, “हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठींचा हुकूम आहे. कोणीही मनुष्याने, पशूने, गुराढोराने तसे शेरडामेंढराने काहीही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशू ह्यांनी गोणपाटे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे.. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे कदाचित देव अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. " त्यांनी आपले दुराचरण सोडले. ही त्यांची कृती देवाने पाहिली. तेव्हा त्याने अरिष्ट त्यांच्यावर आणीन असे सांगितले होते त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्यांच्यावर आणले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५१:१-२,१०-११,१६-१७
प्रतिसाद :  हे देवा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.

१) हे देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर. 
तुझ्या महान दयेला अनुसरून माझ्या 
अपराधाचे कलंक पुसून टाक. 
मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर. 
माझ्या पापांपासून मला शुद्ध कर.

२ )देवा, माझ्याठायी शुद्ध अंतःकरण 
निर्माण कर मला एक नवीन निष्ठावंत आत्मा दे.
 तुझ्या समोरून मला टाकून देऊ नकोस.
 माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस.

३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. 
'तू' नाहीतर तो मी केला असता.
होमार्पणांचीदेखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा 
हाच माझा यज्ञ होय. नम्र व पश्चात्तापी अंतःकरण 
तू झिडकारणार नाहीस.


जयघोष 
तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा, 
वाइटाच्या मागे लागू नका; 
म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 
परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल

शुभवर्तमान  लूक ११:२९-३२

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."

लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण शलमोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशू आजच्या शुभवर्तमानात लोकांच्या अविश्वासाविषयी आश्चर्य व्यक्त करीत आहे. निनवेच्या लोकांनी योनाने दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवला व त्यांचा बचाव झाला. येशू सांगतो ह्या पिढीला मी चिन्ह आहे, परंतु तुम्ही मनुष्याच्या पुत्रावर, देवपुत्रावर विश्वास ठेवत नाही, येथे सुद्धा तुम्हाला पुरावा पाहिजे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवील त्याचा बचाव होईल. आपला येशूवर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे का? की आपणसुद्धा येशूकडून त्याच्या सामर्थ्याचे, अस्तित्वाचे चिन्ह मागत असतो. आपणांस पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्ती एक देवाचे रहस्य म्हणून आपणापुढे प्रकट केले आहे, निनवेच्या लोकांना फक्त देवपित्याविषयी ज्ञान होते तरी त्यांनी योनाच्या संदेशाचा स्वीकार केला. आपणास जास्त दिले असल्याने आपणाकडून जास्त श्रद्धा, विश्वास ह्याची अपेक्षा करणे साहजिकच आहे. निनवेच्या लोकांप्रमाणे देवावर, त्याच्या संदेशावर श्रद्धा ठेवण्याआड कोणत्या गोष्टी येतात त्यावर मनन करू या.
वैवाहिक जीवन जगत असताना दोघे एकमेकांशी कधीही भांडली नाहीत. त्यांचे जीवन प्रार्थना आणि श्रद्धेच्या भक्कम खडकावर उभारलेले होते. फ्रान्सेस हिला प्रार्थनेमध्ये अवीट गोडी वाटत असे. ऐहिक सुखापासून ती स्वत:ला अलिप्त ठेवीत होती. श्रद्धा आणि वैराग्य अशी दुहेरी देणगी असतानाही फ्रान्सेस हिने आपल्या वैवाहिक जीवनाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. उलट वैवाहिक जीवन फुलविण्याची आणि शुद्धतेने व एकनिष्ठेने जगण्याची प्रेरणा तिला प्रार्थनेमधूनच मिळत असे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, पश्चात्तापी अंतःकरणाने आम्ही तुज समोर येतो, : आम्हावार दया कर, तुझ्या सन्मार्गावरुन चालण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या