Marathi Bible Reading | Thursday 10th March 2022 | First week of the Lent |

 गुरुवार  १०  मार्च २०२२ 

(उपवासकाळ १ ला सप्ताह )

✝️ 
तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.



चाळीस रक्तसाक्षी
(...३२०)

✝️

तुर्कस्थानमधील आर्मेनिया ह्या ठिकाणच्या सेबेस्टे येथील चाळीस सैनिक ३२० साली रक्तसाक्षी बनले. कप्पाडोसियाचा राज्यपाल आग्री कोलॉस ह्याने सेबेस्टे येथील लोकांना मूर्तीला नैवेद्य दाखविण्याचा आदेश दिला. त्यावेळी ह्या ४० सैनिकांनी इतरांपासून अलिप्त राहून आपली ख्रिस्ती श्रद्धा अबाधित ठेवण्याच्या हेतूने एकजुटीने राहण्याचे ठरविले. ते वेगवेगळ्या देशांतून आलेले होते. त्यांनी मूर्तीपूजेला नकार दिला. यावरून ते ख्रिस्ती आहेत असा निष्कर्ष काढून त्यांना सेबेस्टे येथल्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले परंतु कुठल्याही शिक्षेच्या भीतीपोटी ते आपली श्रद्धा सोडून देण्यास तयार नव्हते.
प्रारंभी राज्यपालाने त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांचा अमानुष छळ करण्याचा व तुरूंगात टाकण्याचा आदेश देण्यात आला. तुरूंगात असताना त्यांना प्रभू येशूचे दर्शन झाले. त्याने त्यांना जिद्द व चिकाटीने पुढे जाण्यास धीर दिला.
त्यावर्षी कडाक्याची थंडी पडलेली होती. एका उघड्या तलावात बर्फाच्छादित भूभागावर त्यांना उघडे नागडे झोपविण्याचा व मृत्यूपर्यंत त्या थंडीत कुडकुडत राहण्याचा हुकूम सोडण्यात आला. त्या जीवघेण्या थंडीत त्यांना क्षणभर मोहात पाडण्यासाठी तलावा शेजारी एक भला मोठा विस्तव पेटविण्यात आला होता. ह्या शिक्षेचे त्या चाळीस सैनिकांकडून आनंदाने स्वागत झाले. कोणी शिपाई येऊन आपले कपडे उतरविल ह्याची त्यांनी वाट पाहिली नाही. ते स्वत:हून उघड्या नागड्या अवस्थेत व बर्फाच्छादित तलावात गेले व पाण्यावर तरंगू लागले. "एका छळवादी रात्रीच्या गर्भात सार्वकालिक सुखाचा उष:काल दडलेला आहे” असे म्हणत त्यांनी एकमेकांचे सांत्वन केले. त्यांनी एकत्रितपणे देवाची स्तुती आराधना केली आणि अशी प्रार्थना केली: “हे परमेश्वरा आम्ही चाळीसजण एकत्रितपणे या संघर्षात उतरलेलो आहोत. आम्हा चाळीसही जणांना तुझ्या वेदनेचा मुकूट बहाल कर. ह्या पवित्र आकड्याचा अवमान होईल व ही संख्या कमी होईल असे आमच्या हातून काही घडू देऊ नकोस."
ज्या सैनिकांनी या चाळीस सैनिकांवर पहारा ठेवला होता त्यांनी स्वर्गातून ३९ देवदूत येताना व आपणा सोबत गौरवशाली मुकूट आणताना पाहिले. दरम्यानच्या काळात एकजण सरपटत विस्तवाच्या अग्नीजवळ आलेला होता. त्याला थोडावेळ ऊब मिळाली. परंतु लवकरच त्याला अपराधीपणाची भावना टोचू लागली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या सैनिकांपैकी एकाने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली आणि त्या मृत सैनिकाच्या जागेवर त्याने शिक्षा भोगायला सुरूवात केली. पुन्हा एकदा रक्तसाक्ष्यांची संख्या ४० पर्यंत गेली. सर्वजण एकनिष्ठेने अखेरचा श्वास घेत होते.या चाळीस सैनिकांमध्ये एक सैनिक बराच वेळ जिवंत होता. जेव्हा अधिकारी आला तेव्हा त्याला हा सैनिक जिवंत असलेला आढळला. त्याने आपला विश्वास सोडून दिल्यास त्याला वाचविण्यात येईल असे आमिष त्याला दाखविण्यात आले. परंतु त्यावेळी त्याची आई त्याच्या शेजारी उभी राहिली. त्यामुळे त्या सैनिकांमध्ये नवीन बळ संचारले. त्याने पुन्हा एकदा ख्रिस्ती धर्माचा जयजयकार केला. त्यामुळे त्याला इतर ३९ जणांसह चित्तेमध्ये टाकण्यात आले.
✝️   

पहिले वाचन  एस्तेर  १४:१,३-५, १२-१४ 
वाचक : एस्तेर या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"हे प्रभो, तुझ्याविना मला दुसरा कुठलाच आधार नाही."

एस्तेर राणीने मृत्यूच्या भयाने प्रभूचा आसरा घेतला आणि इस्राएलचा देव प्रभू परमेश्वर याच्याकडे प्रार्थना केली; ती म्हणाली, "हे माझ्या प्रभू परमेश्वरा, तूच आमचा राजा आहेस. एकाकी असलेल्या मला मदत कर. तुझ्याविना मला दुसरा कुठलाच आधार नाही. माझे जीवन तळहातावर ठेवून मी जगत आहे. हे प्रभो, मला माझ्या बालपणापासूनच माझ्या जातबांधवांपासून हे शिक्षण मिळाले आहे. सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएलला त्याच्या सर्व पूर्वजांमधून माझ्या वाडवडिलांना आपल्या सार्वकालिक प्रजेच्या रूपाने आपले वारस केले आहे. त्यांच्याबरोबर जो करार केला होता तो तू पूर्ण करीत आला आहेस."
हे प्रभो, आमची आठवण ठेव. संकटकाळी आमच्यावर दयादृष्टी ठेव. सर्वोच्च आणि सर्वाधिकारसंपन्न ईश्वरा, मला धैर्य प्रदान कर. मी सिंहाच्या सामोरा जात आहे. माझ्या मुखात योग्य शब्द ठेव आणि त्याच्या हृदयात आमच्या शत्रूविषयी द्वेष उत्पन्न कर की, ज्यामुळे आमचा शत्रू आपल्या समर्थकांच्या बरोबर नष्ट होईल.
हे प्रभो, आपल्या हाताने आमचे संरक्षण कर आणि मला सहायता दे. हे प्रभू, तू सर्व काही जाणून आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १३८:१-३,७-८
प्रतिसाद : प्रभो, मी तुझा धावा केला, तो तू ऐकलास. 

१ )हे प्रभो, मी अंतःकरणाने तुझे आभार मानीत आहे. 
कारण माझा धावा तू ऐकला आहेस. 
देवदूतांसमोर मी तुझी स्तुती गाईन. 
तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझा सन्मान करीन.

२) तुझे अपुर्व प्रेम आणि सत्यप्रतिज्ञतेमुळे 
मी तुला धन्यवाद देत आहे. 
ज्या दिवशी मी तुझा धावा केला, 
त्याच दिवशी तू तो ऐकलास व 
मला आत्मबळ प्रदान केलेस.

३) आपला हात पुढे करून तू मला वाचवलेस. 
तुझा हात माझे रक्षण करीत असतो. 
हे प्रभो, तुझे प्रेम अनंतकाळ आहे..
आपल्या सृष्टीचे रक्षण करण्याची कृपा कर.



जयघोष 

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.


शुभवर्तमान मत्तय ७:७-१२

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ७:७-१२ 

“जो कोणी मागतो त्याला मिळते."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्याठायी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.
ह्या करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशू आपणास सांगतो, “मागा म्हणजे मिळेल”. येशू येथे आपणास आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाची प्रचिती करून देतो. आपला स्वर्गीय बाप इतका प्रेम की जे आपण त्याच्याकडे मागतो त्यापेक्षा उत्तम असे तो आपणांस देत असतो. देव हा मुळातच चांगला असल्यामुळे तो जे काही आपणांस देतो किंवा जे काही आपल्या जीवनात घडते ते चांगलेच असते कारण देव हा प्रेमळ बाप आहे आणि कोणताच बाप आपल्या मुलांना वाईट गोष्टी देत नाही. आपल्या पित्याप्रमाणे आपण सुद्धा आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे काही मागते मग ती वस्तुरूपी मदत असेल किंवा आपल्या वेळेची मदत मागत असेल तेव्हा आपणसुद्धा त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. कारण देव जसा आपणांस देतो तसे आपणसुद्धा इतरांना द्यायला शिकले पाहिजे. मी इतरांना त्यांच्या गरजेच्या प्रसंगी मदत करतो का, की मी फक्त इतरांनी मला मदत करावी अशी अपेक्षा बाळगतो ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्हास दिलेल्या प्रार्थनेच्या आश्वासनाबद्दल व , प्रोत्साहनाबद्दल तुला मनापासून धन्यवाद, तुझा जीवनदायी सुवर्ण नियम पाळण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या