Marathi Bible Reading | Friday 11th March 2022 | First week of the Lent |

 शुक्रवार ११  मार्च २०२२ 

(उपवासकाळ १ ला सप्ताह )

✝️ 
“प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर.'

संत ओरिया 

✝️ 

 यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देवाने समेटाचा  संदेश दिला आहे. विशेषत: सर्व पापांपासून परावृत्त होऊन नीतिने व धर्माने आचरण करणाऱ्यांस देवाचे अभय मिळेल, मात्र दुर्जन त्यांच्या दुष्टाईमुळे मरण  पावतील. देवाचा मार्ग न्याय्य आहे व त्या मार्गावरुन चालण्यास सर्वांना पाचारण करण्यात आले आहे.
शुभवर्तमानात प्रभू येशू देवाच्या आज्ञा समजावून सांगत असताना आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करुन देवाबरोबर व बंधुभगिनीबरोबर समेट करण्यास आवाहन करीत आहे. देव न्यायी आहे व चुकलेल्यांस तो क्षमा करतो, परंतु   त्याआधी पश्चात्तापाची संधी देव माणसाला देत असतो. आपल्या  पापी जीवनाचा आढावा घेत असताना आपण चिंतन करु या की आजच आपल्याला पश्चात्तापाची संधी आहे. वेळ कुणासाठीच थांबत नसते, म्हणूनच  आपण आपल्या जीवनातील परिवर्तनाची संधी वाया घालवू नये. विशेषत:  देवासमोर आपण निर्दोष व नीतिमान असावे म्हणून सर्वांबरोबर, विशेषत:  आपल्या अपराध्यांबरोबर समेट करु या.

✝️   

पहिले वाचन  यहेज्केल  १८:२१-२८
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन जगावे याने मला संतोष होतो."

प्रभू परमेश्वर म्हणतो, तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने • आपले मार्ग सोडून देऊन जगावे याने मला संतोष होतो ना? तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला, व अधार्मिकाच्या सर्व अमंगळ आचाराप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्राएल घराण्या, ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो, दुर्जन आपण केलेल्या दुष्टपणापासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवील. तो आपण केलेली सर्व पापे लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल. मरावयाचा नाही
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १३०:१-८
प्रतिसाद :हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, 
तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?

१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. 
हे प्रभू, माझी वाणी ऐक. 
माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.

२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, 
तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?
 तरी पण लोकांनी तुझे भय धरावे 
म्हणून तुझ्याठायी क्षमा आहे.

३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो,
 माझा जीव अपेक्षा करतो आणि 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो. 
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा 
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

४ )हे इस्राएल, परमेश्वराची आशा धर. 
कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे. 
त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. 
तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.

जयघोष 
प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, 
कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे


शुभवर्तमान मत्तय ५:२०-२६

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
खून करू नको. जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा!' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला
‘अरे मूर्खा!' असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर वादी तुला न्यायधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला सत्य सांगतो. दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: 
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परिवर्तनाविषयी सांगत आहे. चांगले परिवर्तन देवाला संतोषविणारे आहे. आपण आपले पूर्वीचे वाईट जीवन सोडून पुन्हा देवाकडे वळून चांगले जीवन जगण्यास सुरूवात केली तर देव आनंदित होतो. देव परिवर्तीत मानवाचा मोठ्या प्रेमाने पुन्हा स्वीकार करतो. तो आपल्या पूर्वीच्या चुका, अपकार पुन्हा लक्षात आणत नाही. जेव्हा आपल्या परिचयाच्या वक्ती, आपले वाममार्गाला लागलेले बंधू आपल्या वाईट सवयींचा त्याग करून पुन्हा चांगले जीवन जगू लागतात तेव्हा मी त्यांचा देवाप्रमाणे प्रेमाने स्वीकार करतो का? आपण त्याच्या सर्व चुका विसरून जाऊन त्यांना नवीन जीवन जगण्याची संधी देतो का ? अनेक वेळेला आपण अश्या व्यक्तींना त्यांच्या पूर्वायुष्याची आठवण करून त्यांना पुन्हा खाली पाडत असतो.
जर आपला देव सर्व अपराध विसरू शकतो तर आपण का सर्वांच्या चुकांचा व पापांचा हिशोब करीत बसतो ?

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करण्यास व समेट |करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या