शनिवार १२ मार्च २०२२
(उपवासकाळ १ ला सप्ताह )
✝️
तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
संत थिओफानेस
मठाधिकारी (... ८१७)
✝️
. परमेश्वराने इस्त्राएलला देवाची पवित्र प्रजा बनता यावे म्हणून विधी व नियम पाळण्याची आज्ञा दिली. देवाची पवित्र प्रजा म्हणजेच देव जसा पवित्र आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे व समानतेने वागविणारा आहे त्याप्रमाणे बनणे.
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” देव परिपूर्ण आहे मात्र आपण सर्वजण परिपूर्ण नाहीत, तरी सुद्धा देवाच्या परिपूर्णतेत सहभागी होण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करण्यात आले आहे. प्रभू येशू आपल्या सर्वांना पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल कशी करायची ते आज सांगत आहे. प्रभू म्हणतो, “तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” मानवी स्वभावानुसार वैऱ्यावर प्रीति करणे खूप कठीण आहे. मात्र देव सर्वांवर आपला सूर्य उगवतो व पाऊस पाडतो. चांगले-वाईट आणि नीतिमान अनीतिमान असा भेदभाव देव करीत नाही. देवस्वभावाप्रमाणे वागण्यास आपण शिकले पाहिजे तरच आपण देवाची प्रजा आहोत. स्वत:साठी व स्वकीयांसाठी प्रार्थना करणे सोपे असते. मात्र छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करणे म्हणजे देवाच्या परिपूर्णतेत सहभागी होणे असे आहे.
देवस्वभावानुसार आपल्याला पूर्णत्वाकडे वाटचाल करण्यास कृपा सामर्थ्य मागू या.
✝️
पहिले वाचन अनुवाद २६:१६-१९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील."
मोशेने लोकांना म्हटले, “हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की, मी तुझ्या मार्गानी चालेन. तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे. तुला संगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाली आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९:१-२,४-५, ७-८
प्रतिसाद : जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
१) ज्याचे आचरण शुद्ध आहे,
जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
जे त्याची शिकवण आचरतात,
अगदी मनापासून त्याचा शोध करतात, ते धन्य होत.
२) प्रभू तुझे आदेश आम्ही निष्ठापूर्वक पाळावेत.
म्हणून तू ते आम्हांला देऊन ठेवले आहेत.
तुझ्या नियमांप्रमाणे आचरण राखण्याकडे
माझी प्रवृत्ती असली तर बरे.
३) तुझे न्याय्य संकेत मला समजू लागतील.
तसा मी सरळ मनाने तुला धन्यवाद देईन.
मी तुझे नियम पाळीन, मला कधीच अंतर देऊ नकोस.
जयघोष
जे वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात
धरून ठेवतात आणि धीराने फळ दे जातात, ते धन्य होत.
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा"
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा व आपल्या वैऱ्यांचा द्वेष करा, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसे करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू सांगतो आपल्या वैऱ्यावर प्रीती कर व जे तुमचा छळ करतात त्यासाठी प्रार्थना येशूचे हे बोल आपणांस जरा पचायला जड वाटतात, नाही का? ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्यांच्याशी संवाद साधायला आपणांस किती कठीण वाटते, येथे येशू तर चक्क त्यांच्यावर प्रीती करायला व प्रार्थना करायला सांगतो. येशूची ही शिकवण अंगिकारायला फार कठीण वाटते. येशू आपणांस स्वर्गीय पित्याचे उदाहरण देतो, देवाला आपला पिता म्हणून संबोधणारे आपण सर्व त्याच्यासारखे प्रेमळ व्हावे अशी त्याची इच्छा आहे. येशूने आपल्या मरणापर्यंत सर्वांवर प्रेम केले, त्याला ज्यांनी त्रास दिला, त्याची ज्यांनी निंदा केली अशा सर्वांना त्याने क्षमा केली. आपल्या शत्रूंसाठी, त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना केल्यानंतर जी आंतरिक शांती अनुभवायला मिळते त्याचा अनुभव कधी तुम्ही घेतला आहे का? तसेच क्षमा न केल्यामुळे जी भावनिक कुचंबना होते हे आपण नक्कीच अनुभवले असणार, इतरांना क्षमा करता यावी म्हणून येशूकडे क्षमेचे दान मागूया व आपल्या जीवनातील अश्या सर्व व्यक्तींसाठी प्रार्थना करू या.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या वचनानुसार व आज्ञेनुसार प्रेम व सर्वांगपूर्ण शील जोपासण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या