रविवार १३ मार्च २०२२
(उपवासकाळ २रा रविवार)
त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले
✝️
"हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका."
✝️
आब्राहामाने देवावर पूर्ण विश्वास ठेवला आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे आब्राहाम वागला म्हणूनच देवाने आब्राहामाबरोबर केलेला करार पाळला. तो देवाला पूर्णपणे शरण गेला.
प्रभू येशूच्या रूपांतरावेळी वाणी झाली की, 'हा माझा पुत्र, निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका.' प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आचरण करणाऱ्या आम्हा प्रत्येकाला प्रभू येशू त्याच्या वैभवात सहभागी करणार आहे. स्नानसंस्काराद्वारे आपण देवाची मुले बनलो आहोत. ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण प्रभू येशूच्या स्वर्गीय भोजनात सहभागी झालो आहोत, म्हणूनच आपले सर्वांचे नागरिकत्व स्वर्गात आहे.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती १५:५-१२.१७-१८
वाचक उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वर श्रध्दावंत मनुष्य आब्राहाम याच्याशी करार करातो"
परमेश्वराने आब्राहामला बाहेर आणून म्हटले “आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजवतील तर मोज." मग त्याने त्याला सांगितले, "इतकी तुझी संतती होईल." आब्राहामने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि आब्राहामचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणला. तो त्याला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. तुला या देशाचे वतन द्यावे म्हणून खास्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे." तो म्हणाला, “प्रभो, देवा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?" देवाने त्याला सांगितले, “तीन वर्षाची एक कालवड, तीन वर्षाची एक शेळी, तीन वर्षाचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू अशी घे." त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याचे दोनदोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने चिरले नाहीत. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली. त्यांना आब्राहामने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास आब्राहामाला गाढ झोप लागली तेव्हा घोर भीतीने, निबिड अंधकाराने त्याला व्यापले. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पसरला. तेव्हा धुमसती आगटी व आगीचा जाळ हा त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसला. त्या दिवशी परमेश्वराने आब्राहामशी करार करुन सांगितले "इजिप्तच्या नदीपासून ते महानदी फरात येथवरचा मुलूख मी तुझ्या संततीला देतो."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २८:१,७-९,१३-१४
प्रतिसाद : प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे.
१) परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे;
मी कोणाची भीती बाळगू?
परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे:
मी कोणाचे भय धरू ?
२) मी तुझा धावा करीत आहे,
हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर,
माझी याचना ऐक तुझ्याबद्दल
माझे हृदय म्हणाले, “त्याचे दर्शन घे"
३) प्रभो, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे;
तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस.
आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस;
तू माझे साहाय्य होत आला आहेस.
४) या जीवलोकीच परमेश्वराची दया माझ्यावर होईल.
अशी माझी श्रद्धा आहे.
परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो;
हिंमत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर!
दुसरे वाचन २ फिलीप्पै ३:१७, ४:१
वाचक: पौलचे फिलीप्पैकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त आमचे दीन शरीर स्वतःच्या गौरवयुक्त शरीरासारखे करील."
बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जर चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही दुःखाने सांगतो की, पुष्कळजण ख्रिस्ताच्या क्रुसाचे वैरी आहेत असे चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते.(आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहात आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. यास्तव प्रियजनहो, तुम्हांकडे माझे लक्ष लागून राहिले आहेत. तुम्ही माझा आनंदव मुकूट आहा. माझ्या प्रिय बंधूनो, तुम्ही प्रभूमध्ये असेच स्थिर राहा.)
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली, "हा माझा प्रिय आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
शुभवर्तमान लूक ९:२८-३६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर झाले."
पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि मोशे व एलिया हे दोघेजण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन येरुशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते. पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्रने येशूला म्हटले, “गुरुजी आपण येथेच असावे हे बरे; आम्ही तीन मंडप करू; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक." हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून वाणी झाली "हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका." ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रायश्चित्तकाळ हा परिवर्तनाचा काळ आहे असे आपल्याला बरेचदा सांगितले जाते. आजच्या वाचनात परिवर्तनाचे तीन पैलू उलगडून सांगण्यात आलेले आहेत :
१. परिवर्तन म्हणजे परमेश्वराशी असलेल्या कराराचे नूतनीकरण : आजचे पहिले वाचन आपल्याला परमेश्वर व आब्राहाम ह्यांच्यात झालेल्या कराराची माहिती देते. असा करार करताना पक्षी चिरून त्यांचे तुकडे दोन ओळीत मांडले जात. करार करणारे दोन्ही पक्ष ह्या दोन ओळींच्या मधून चालत जात. ह्याचा अर्थ जर दोघांपैकी एका पक्षाने जर करार मोडला तर त्याची गत ह्या मेलेल्या पक्ष्यांप्रमाणे होईल असा संदेश दिला जाईल. करार मोडणाऱ्या व्यक्तीला मरणदंडाची शिक्षा दिली जाईल. आब्राहाम त्या तुकड्यांच्या दोन ओळांतून चालत गेला त्यानंतर एक पेटती आगटी (परमेश्वर) त्यामधून चालत गेली. माणूस परमेश्वराबरोबर केलेला करार वारंवार मोडीत असतो. प्रायश्चित्तकाळात ह्या कराराने नूतनीकरण
करण्यासाठी त्याला आवाहन केले जात.
२. परिवर्तन म्हणजे परिपूर्ण बदल : फिलिप्पै येथल्या ख्रिस्तमंडळीमध्ये असा एक गट होता। की जो शुभवर्तमानाशी विसंगत असे जीवन जगत होता. प्रत्येक बाबतीत ते जागतिक, भौतिक व शारीरिक दृष्टीकोणातून विचार करीत. संत पौल / त्यांना स्वर्गीय, आध्यात्मिक व पारमार्थिक दृष्टीने विचार करण्याचे आवाहन करतो. अशाने त्यांचे शरीर (व्यक्तिमत्व) येशूच्या गौरवशाली शरीरासारखे (आध्यात्मिक उंची असलेले) बनले अशी हमी देतो.
३. परिवर्तन म्हणजे रूपांतर : बंद पडलेले घड्याळ केवळ बाहेरून त्याचे काटे बदलले म्हणजे काम करू लागते असे नाही त्यासाठी ते आतून दुरुस्त करावे लागते. शिष्यांनी एक शिक्षक, अद्भुत चमत्कारकर्ता, भुताखेतांवर अधिकार असलेला माणूस अशी येशूची प्रतिमा पाहिलेली होती. मात्र त्याच्या रूपांतराच्या वेळी तो साक्षात् देवाचा पुत्र आहे ह्याचे स्पष्ट दर्शन त्यांना घडले. आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपण देवाची लेकरे आहोत असे जाहीर केले जाते. परिवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा देवाची वाणी ऐकून रूपांतराचा अनुभव त्यासाठी प्रार्थनेच्या पर्वतावर चढावे लागते. तीच घेणे
आत्मपरीक्षण : ह्या प्रायश्चित्तकाळात मी कोणकोणत्या बाबतीत अगदी मनापासून बदल करण्याचे योजिले आहे? त्यासाठी कोणती ठोस कृतीयोजना मी आखलेली आहे ? त्यात प्रार्थना व बायबल वाचन ह्यांना कितपत स्थान आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझी वाणी ऐकण्यास व देवाची प्रिय मुले बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या