सोमवार १४ मार्च २०२२
(उपवासकाळ २रा सप्ताह )
✝️
क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल.”
संत मॅटिल्डा
राणी (८९५-९६८)
मॅटिल्डाचे वडील तिच्या बालवयातच मरण पावले आणि तिच्या आईने कॉन्व्हेंटचा रस्ता धरला. त्यामुळे मॅटिल्डाचे बालपण व प्राथमिक शिक्षण मध्य जर्मनीतील एरफर्ट येथल्या एका कॉन्व्हेंटमध्ये झाले. अल्पावधीतच तिने आपले सद्गुण आणि कलाकौशल्ये दाखविण्यास सुरूवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी सॅक्सनीचा हेन्री ह्या राजपुत्राबरोबर तिचे लग्न झाले.
पुढे हा हेन्री जर्मनीचा राजा कॉरेंड ह्याचा उत्तराधिकारी बनला. राणी या नात्याने मॅटिल्डा हिने आपले निष्कलंक जीवन व विवेकी राज्यकारभार ह्याचे दर्शन सर्वांना घडविले. गरीब आणि अडल्या-नडल्यांना तिने मोलाचा आधार दिला. परंतु इ. स. ९३६ साली राजा हेन्री मरण पावला आणि मॅटिल्डा राणीच्या डोक्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली.
अशा बिकट परिस्थितीत मात्र ती बिलकूल डगमगली नाही. तिने आपली प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त, दानधर्म यामध्ये वाढ केली. असंख्य इस्पितळे, मठ आणि ख्रिस्तमंदिरे उभारण्यासाठी सढळ हस्ते मदत केली. परंतु तिच्या ह्या दानधर्माला आणि उदारवृत्तीला तिच्या मुलांनी उधळपट्टी म्हणून हिणविले आणि त्यांनी तिला राजमहालाबाहेर हाकलून दिले.
मॅटिल्डा राजवाड्याबाहेर पडली आणि साम्राज्याची चक्रे उलट दिशेने फिरू लागली. सगळीकडे राजपुत्र हेन्री व ओट्टो ह्यांना दुर्दैवाचे परिणाम दिसू लागले. भरभराटीचा काळ संपुष्टात आला. अधोगतीने संपूर्ण राज्यात आपले पसरायला सुरवात केली. सेवक-सेनापती, नोकरचाकर, कामधंदे सोडून गेले. सर्वत्र उदासीनता आणि हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. आपल्या आईच्या रुगने परमेश्वरालाच आपण घराबाहेर हाकलून दिल्याचे त्या राजपुत्रांना टोचू लागले. त्यांनी लागलीच आपल्या आईला परत माघारी बोलाविले. तिच्या आगमनाबरोबर राज्यात पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले. गेलेली सर्व सुबत्ता आणि समृद्धी परत आली. तिचा मोठा मुलगा ओट्टो हा जर्मनीचा सम्राट बनला, दुसरा मुलगा कोलोन शहराचा आर्चबिशप (संत ब्रुनो) बनला. तिची मुलगी गर्बेरा फ्रान्सचा
राजा लुईस चौथा याच्याशी विवाहबद्ध झाली आणि शेवटची मुलगी हेडविंग कॅपेरीयन साम्राज्याचा जनक यू कॅपेर ह्याची माता होय.
संत मॅटिल्डा १४ मार्च ९६८ रोजी मरण पावली.
✝️
आमचा देव प्रभू, दयेचा व क्षमेचा सागर आहे, असे संदेष्ट दानीएल आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे. परमेश्वर दयाळू व प्रेमळ आहे मात्र त्याच्यावर प्रेम करणाऱ्यास व त्याच्या आज्ञा पाळण्याऱ्यास तो उंचावितो. दानीएलने जशी प्रार्थना केली तशीच आपण सुद्धा देव आज्ञा पाळावी व सर्वांसाठी प्रार्थना करावी म्हणून याचना करु या.
आपल्याला मिळालेले दान आपण इतरांच्या भल्यासाठी व गरजवंतांसाठी तसेच देवाच्या गौरवासाठी उदारपणे दिले पाहिजे. देणाऱ्याला देव दहापटीने देत असतो.
क्षमाशीलता आणि उदारता हे दोन्ही गुण आपल्यामध्ये वाढीस लागावे व आपणाला क्षमा करून दान देता यावे म्हणून प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन दानिएल ९:४१ - १०
वाचक : दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन ९:४१ - १०
“आम्ही पाप केले आणि कुटिलतेने वागलो. "
"हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस. आम्ही पाप केले आणि कुटिलतेने वागलो. दुष्टतेचे वर्तन केले. फितूर झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक यांना सांगितले तेसुद्धा आम्ही ऐकले नाही. हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे. यहुदाचे लोक येरुशलेम निवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक, यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावले. त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे. हे प्रभो, आमच्या तोंडास, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडाला काळोखी लागली आहे. आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर याने आपले सेवक जे संदेष्टे यांच्याद्वारे आम्हांपुढे ठेवलेल्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वागण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७९:८-९,११-१३
प्रतिसाद : प्रभो, आमच्या दुष्कृत्यांनुसार आमची परतफेड करू नकोस.
१) आमच्या वाडवडिलांचे अपराध आठवून
आम्हांला शासन करू नकोस.
तुझ्या करुणेची सावली आमच्यावर लवकर पडू दे.
कारण आमची अतिशय दैन्यावस्था झाली आहे.
२) आमच्या उद्धारक देवा, तुझ्या नामाचा महिमा
व्हावा म्हणून आम्हांला मदत कर.
हे आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझे नाव राखले जावे
म्हणून आमची सुटका कर आणि आमच्या पापांची क्षमा कर.
३)आम्हा बंदिजनांचे उसासे तुझ्या कानी पडून देत.
मरणाच्या दाढेत सापडलेल्यांची आपल्या
महासामध्यने सुटका कर.
हे स्वामी, आमच्या शेजारच्या राष्ट्रांनी
केलेल्या तुझ्या नालस्तीची भरपाई
४)सातपटीने त्यांच्या पदरी घाल.
मग तुझ्या कुरणातला जणू कळप
अशी आम्ही तुझी प्रजा,
तुला सदैव धन्यवाद देऊ.
तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत राहू.
जयघोष लूक १५:१८
मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
शुभवर्तमान लूक ६:३६-३८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६:३६-३८
“तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जुन्या करारात देव नेहमी संदेष्ट्यांच्या मार्फत लोकांशी बोलत असे. आपले विधी, नियम तो लोकांना संदेष्ट्यांमार्फत सांगत असे इतकेच नव्हे तर येणाऱ्या संकटांविषयी देव लोकांना संदेष्ट्यांमार्फत ताकीद देत असे. संदेष्टा म्हणजे देवाने निवडलेला, देवाचा अभिषिक्त, देवाच्या वतीने बोलणारा असे असून सुद्धा बहुतेक वेळा जुन्या करारातील लोकांनी संदेष्ट्यांचे वचन न ऐकल्याचे आपण पाहतो. संदेष्ट्यांचे न ऐकल्याने लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागल्याचे आपण जुन्या करारात ऐकतो. आपल्या जीवनात सुद्धा देव नेहमी आपणांस अनेक व्यक्तींच्या माध्यमातून संदेश देत असतो. धर्मगुरू, शिक्षक, आपले आईवडील, आपली पत्नी / पती, मित्र अश्या विविध व्यक्ती ज्या आपल्याला चांगला सल्ला देतात त्या सर्व व्यक्ती जणू देवाने नेमलेले आपल्या जीवनातील संदेष्टे आहेत. मी ह्या सर्व व्यक्तींशी कसा / कशी वागतो/ वागते ? जुन्या करारातील लोकांप्रमाणे मी त्याचा संदेश धुडकावून लावतो / लावते की त्यांनी दिलेल्या संदेशावर मनन करून जीवन जगतो / जगते यावर विचार करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या विपुलतेतून तू आम्हाला अनंत देणग्या देत असतोस. तुझ्यासारखे दयाळू बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या