Marathi Bible Reading |Tuesday 15th March 2022 | 2nd Week of Lent |

मंगळवार १५  मार्च २०२२ 

(उपवासकाळ २रा सप्ताह )

✝️ 

क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल.”



संत लुईजा डी मारिलेक  
- विधवा (१५९१-१६६०)

चिंतन : “मन लावून गरिबांची सेवाचाकरी करा, जसे तुम्ही ख्रिस्ताला वागविले असते तसे त्यांना प्रेमाने व आदराने वागवा.” - संत लुईजा
✝️ 
पापांच्या खोल खड्यात  बुडलेल्या सर्वांना यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात  पश्चात्तापासाठी आवाहन करीत आहे. परमेश्वर म्हणतो, “आपणास धुवा, स्वच्छ  करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका व नीतिच्या मागे  लागा.” पश्चात्ताप करून नम्रतेने देवापुढे शरण आलेल्या माणसाला देव दया  दाखवतो. व जवळ करितो . ह्या प्रायश्चित्त काळात आपण स्वतःला धुवून स्वच्छ करावे म्हणून ख्रिस्तसभा पाचारण करीत आहे.

✝️   

पहिले वाचन  यशया  १:१०,१६ - २० 
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “चांगले करायला शिका. नीतीच्या मागे लागा."

सदोमच्या अधिपतींनो, परमेश्वराची वचने ऐका, गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या! आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करायला शिका. नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या.
परमेश्वर म्हणतो, “चला, या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी बनतील. तुम्ही माझे ऐकावयाला तयार व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही बंड कराल तर तरवार तुम्हांला खाऊन टाकील, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५०:८-९,१६-१७,२१-२३
प्रतिसाद : सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.

१) तुझ्या यज्ञाबद्दल मी तुला दोष देत नाही
 तुझी होमार्पणे सतत माझ्यासमोर असतात. 
तुझ्या घरचा गोन्हा किंवा तुझ्या कळपातले
 बकरे घ्यायची मला गरज नाही.

२) माझ्या आज्ञा जाहीर करून तुला काय करायचे आहे ? 
तुझ्या तोंडी माझा करार कशाला ? 
तुला तर शिस्तीचा तिटकारा आहे.
 मी बोलतो तेव्हा तू तोंड फिरवतोस.

३) या गोष्टी तू केल्यास तरीदेखील मी गप्प बसू काय ?
 तुला वाटते मी तुझ्यासारखाच आहे. 
आभारप्रदर्शनरूपी यज्ञ करणारा माझे गौरव करता. 
सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.


जयघोष               

देवाने जगावर एवढी प्रीती केली की, 
त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; 
•अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो
 त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

शुभवर्तमामत्तय २३:१-१२

वाचक : मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊभा आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे. तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू धार्मिक पुढाऱ्यांच्या ढोंगी वागणुकीवर बोट ठेवत आहे. धार्मिक पुढारी हे जरी धार्मिक कायदे लोकांना शिकवत असले तरी त्याचे वागणे विसंगत होते. त्यांना फक्त मानाने समाजात मिरवणे आवडत असे. इतरांना सल्ला देणे, इतरांचे वागणे कसे मोशेच्या कायद्याच्या विरोधात आहे हे सांगण्यात त्यांना आनंद वाटे पण स्वतः मात्र ह्या कायद्याप्रमाणे वागत नसत, म्हणून येशू अश्या सर्व धार्मिक पुढाऱ्यांना "ढोंगी” असे संबोधतो. धार्मिक पुढारी जरी ढोंगी आचरण करीत असले तरी येशू आपणांस त्यांनी सांगितलेल्या वचनांचे व नियमांचे पालन करावयास सांगत आहे कारण पुढाऱ्यांचे विसंगत वागणे देवाच्या वचनांचे मोल कमी करीत नाहीत, देवाचे नियम व वचने ह्यांचे मोल स्थिर राहते. आजचा हा सल्ला केवळ धार्मिक पुढाऱ्यांसाठीच नाही तर आपणा सर्वांसाठी आहे. आपण स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी मानतो पण आपले वागणे हे येशूच्या शिकवणुकीच्या विरोधी असते. म्हणून आपणसुद्धा एक "ढोंगी ख्रिस्ती” ठरतो. खरा ख्रिस्ताचा अनुयायी होण्यासाठी मला माझ्या कोणत्या ढोंगी सवयी बदलण्याची गरज आहे ह्यावर मनन करू या.

प्रार्थना : हे प्रिय व प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ता, नम्रतेने तुजसमोर शरण येण्यास व  परिवर्तित जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या