Marathi Bible Reading | Wednesday 16th March 2022 | 2nd Week of Lent |

बुधवार  १६  मार्च २०२२ 

(उपवासकाळ २रा सप्ताह )

✝️ 

"मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही तर सेवा करावयास आला आहे."





संत हेरीबर्ट
कोलोनचे महागुरू (९७०-१०२१)

✝️ 

यिर्मया संदेष्ट्याविरूध्द कट रचणाऱ्यांसाठी यिर्मया मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे, . आपला अपराध  करणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करणे हा सर्वात चांगला मार्ग होय. स्वार्थासाठी जेव्हा आपण प्रार्थना व विनवणी करतो तेव्हा प्रभू म्हणतो, 'तुम्ही  काय मागता हे तुम्हास समजत नाही.' आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूकडे  जब्दीच्या मुलांच्या आईने केलेली मागणी अयोग्य होती. 
✝️   

पहिले वाचन यिर्मया   १८:१८ - २० 
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"चला, आपण त्याच्यावर आरोप ठेवूया."

लोक म्हणाले, “ह्या यिर्मयाचा काटा आता काढलाच पाहिजे. आपल्याकडे धर्मशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी पुरोहित आहेत, सल्लामसलत देण्यासाठी विद्वान आहेत आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी प्रवक्तेही आहेत. तर मग त्याच्यावर आपण आरोप ठेवूया. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. " हे प्रभू माझ्याकडे तू लक्ष दे. माझे विरोधक काय म्हणताहेत ते ऐक. बऱ्याची फेड वाइटाने व्हावी काय? त्यांनी माझा जीव घेण्यासाठी कसा खड्डा तयार केला आहे. त्यांच्यावरील तुझ्या कोपाचे निवारण व्हावे म्हणून मीच त्यांच्यासाठी तुझ्याजवळ मध्यस्थी केली होती ह्याची आठवण कर.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३१:५-६,१४-१६
प्रतिसाद : प्रभो, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर.

१) माझ्यासाठी त्यांनी गुपचूप पसरलेल्या 
जाळ्यातून मला सोडव. कारण 
तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस.
मी आपला आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.
हे प्रभू, सत्यस्वरूप देवा,
तूच माझा उद्धार करणार आहेस.

२) अनेकांची कुजबुज माझ्या कानावर येत आहे 
भोवती भीतीचे वातावरण आहे. 
ते माझ्याविरुद्ध खलबत करत आहेत.
माझा जीव घ्यायचा त्यांनी बेत केला आहे.

३) प्रभो, मी तर तुझ्यावर भरवसा ठेवून आहे.
मी म्हणतो, "तूच माझा देव, माझे बरेवाईट
तुझ्याच हातात आहे. माझा पिच्छा पुरविणारे
व माझे शत्रू, ह्याच्या हातून मला सोडव."

जयघोष    
हे प्रभो, तुझे शब्द, आत्मा आणि जीवन आहेत. 
तुझे शब्द सार्वकालिक जीवन देणारे आहेत.

शुभवर्तमामत्तय २०:१७-२८

वाचक : मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "ते त्याला मरणदंड ठरवतील."

येशू वर येरुशलेमास जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, "पाहा, आपण वर येरुशलेमास जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करायला, फटके मारायला व क्रुसावर खिळायला त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल."
तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागणी केली. त्याने तिला विचारले "तुला काय पाहिजे ?" ती त्याला म्हणाली, "तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा." येशू म्हणाला, "तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय ?" ते त्याला म्हणाले, "पिता येईल." त्याने त्यांना म्हटले, "माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे." ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही; तर जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करायला आला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: यिर्मया संदेष्टा हा इस्रायली लोकांची कान उघडणी करीत होता, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत होता. जी व्यक्ती स्पष्टपणे बोलून आपल्या चुका आपणास दाखवते अशा व्यक्तींचा आपणास राग येतो. यिर्मयाच्या स्पष्टवक्तेपणामुळे इस्रायली लोक त्याचा काटा काढण्याचा विचार करतात. अनेक वेळेला जे लोक सत्य नाकारून फक्त गोड बोलतात त्यांचा समाजात स्वीकार केला जातो, याउलट सत्य स्थिती सांगणाऱ्या व्यक्तीचा समाजात द्वेष केला जोता. आपल्या जीवनातसुद्धा ज्या व्यक्ती स्पष्टपणे आपल्याला आपल्या अवगुणांची जाणीव करून देतात त्यांच्यापासून आपण दूर रहायचा प्रयत्न करतो. अश्या व्यक्तींना आपण आपल्या गटात, समूहात सामील करून घेत नाही. तर खरे पाहिले तर इस्रायली लोकांनी जर यिर्मयाचे ऐकले असते तर त्यांचा बचाव झाला असता, अशाचप्रकारे जर आपण आपली केवळ कोरडी स्तुती न करता योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्तींचे ऐकले तर आपण सुद्धा जीवनातील अनेक अनावश्यक त्रासांपासून वाचू शकतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुजठायी समर्पित जीवन जगण्यास व नम्रतेने तुझी सेवा करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या