Marathi Bible Reading | Thursday 17th March 2022 | 2nd Week of Lent |

गुरुवार १७  मार्च २०२२ 

(उपवासकाळ २रा सप्ताह )

✝️ 

"मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर;."

संत पॅट्रीक
महागुरू (३८५-४६१)

✝️ 

यिर्मया संदेष्ट्याद्वारे परमेश्वर म्हणतो,  'प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे  प्रतिफळ देण्यासमी देवप्रीति व त्याचबरोबर परस्पर प्रीतिने  जीवन जगणाऱ्याला परमेश्वर आशीर्वादित करीत असतो.
 देव, त्याचे अस्तित्व आणि नीतिमत्ता ह्याविषयी जे आंधळे झालेले असतात त्यांना इतर माणसांच्या भावनांची कदर  नसते. सामाजिक जबाबदारीची अशांना जाणीव नसते. म्हणूनच प्रभू येशू आज अशा सर्वांना स्वतः कसे जीवन जगायला हवे त्याची आणि सामाजिक बांधीलकीची आठवण करून देत आहे.आपण तुपाशी खात असताना शेजारी कोणी उपाशी असल्यास त्याची गरज भागवावी, अन्यथा त्या श्रीमंत माणसासारखी आपली स्थिती होईल.
 सार्वकालिक जीवनाचे सत्य आणि रहस्य ह्यांचा उलगडा करून दिला आहे. त्यानुसार आपण खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा व कृपा मागू या.
✝️   

पहिले वाचन यिर्मया   १७:५ - १० 
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जो मानवावर भिस्त ठेवतो तो शापित आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो धन्य. 
परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदीकिनारी पसरील. उन्हाची झळई येत असली तरी तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही." हृदय सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १:१-४,६
प्रतिसाद : प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. 

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही. 
पाप्यांच्या वाऱ्याला उभा राहत नाही 
किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, 
तर उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो 
त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते,
 यथाकाळी त्याला बहर येता,
 ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो असतो. 
तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३) पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही!
 वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत..
 सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते; 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


जयघोष    
प्रभू म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."


शुभवर्तमान लूक १६:१९-३१

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तू सुख भरून पावलास आणि लाजर दुःख भरून पावला; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस."
येशू परुश्यांना म्हणाला, कोणीएक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस पडलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून आब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा आब्राहाम, माझ्यावर दया करुन लाजरला पाठव, त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. आब्राहाम म्हणाला, "मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे
तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे." मग तो म्हणाला, “तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कारण मला पाच भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी." पण आब्राहामने त्याला म्हटले, “त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत; त्याचे त्यांनी ऐकावे." तो म्हणाला, "हे बापा आब्राहाम, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील." तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजच्या शुभवर्तमानात आपण श्रीमंत मनुष्य व गरीब लाजरस ह्यांचा दाखला ऐकतो. मरणानंतर दोघांचे भाग्य बदलते, आयुष्यभर दुःख भोगणारा लाजरस स्वर्गात जातो तर पृथ्वीवरील आयुख्य मजेत घालवणारा श्रीमंत मनुष्य नरकात जातो. जर आपण हा दाखला व्यवस्थित वाचला तर आपणांस हे समजते की, श्रीमंत मनुष्य केवळ त्याच्या श्रीमंतीमुळे नरकात गेला नाही तर गरीब, गरजवंत लाजरसकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो नरकात जातो. येशूचे कार्य हे मुख्यतः गरिबांना केंद्रित करणारे होते. येशूने जेव्हा आपल्या कार्याचा प्रारंभ केला तेव्हा तो म्हणाला, “दीनांस शुभवार्ता सांगण्यास मला अभिषेक केला आहे.” तसेच डोंगरावरील प्रवचनात येशू म्हणतो, “जे गरीब ते धन्य.” जे ह्या पृथ्वीवर दुःख, त्रास, वेदना सहन करीत आहेत त्याचा हा त्रास फुकट जाणार नाही असे येशू आपणांस सांगत आहे. शेवटी, देवाने आपणांस दिलेल्या संपत्तीचा वापर आपण कसा केला यावर देव आपला न्याय करणार आहे. श्रीमंत मनुष्याच्या भावाप्रमाणे आपणांस सुद्धा ह्यासंबंधी इशारा दिला गेला आहे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, विश्वासात दृढ राहून परोपकारी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा लाभो, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या