Marathi Bible Reading | Friday 18th March 2022 | 2nd Week of Lent |

शुक्रवार १८  मार्च २०२२ 

(उपवासकाळ २रा सप्ताह )

✝️ 

“जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;"



जेरूसलेमचे संत सिरील 
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३१३-३८०)

✝️ 

महागुरू सिरील वयाच्या ३५ व्या वर्षी येरूशलेमचे पेट्रिआर्क झाले. त्यांची ३६ वर्षांची कारकीर्द खरोखर वादळी ठरली. ह्या ३६ वर्षांपैकी तब्बल १७ वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी स्वभावावरील श्रद्धेचे संरक्षण करण्यासाठी त्यांना हद्दपारीमध्ये दिवस कंठावे लागले. दोन वेळा त्यांना एरियनवादी परिषदांमधून तर एकदा सम्राट वालेन्स ह्यांच्या राजदरबारातून अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून लावण्यात आले.
. बिशप सिरीलच्या कारकीर्दीत मात्र दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. ७ मे ३५१ मध्ये येरूशलेमवरच्या आकाशात एक तेजस्वी क्रुस दृष्टीस पडला. हा क्रूस कालवारी ते ऑलिव्ह पर्वत ह्यांना सांधणारा होता असे त्यांनी स्वत: कॉन्स्टॅन्शिअस ह्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. इ. स. ३६२ साली ज्युलियन नामक फुटीरवाद्याने पवित्र नगरीत शुभवर्तमानाच्या शिकवणुकीविरुद्ध जाणारे एक महान मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. परंतु आगीत व भूकंपात त्याचे सर्व कामगार मरून गेले.
सिरील हे अत्यंत सौम्य हृदयाचे आणि शांतीप्रिय असे बिशप होते. इ.स.३८६ साली मरण पावलेल्या ह्या ख्रिस्तसभेच्या निष्ठावंत सेवकाला इ. स. १८८२ साली धर्मपंडित हा किताब बहाल करण्यात आला.
चिंतन : ख्रिस्ताच्या क्रुसाची आपल्याला शरम वाटता कामा नये, तर आपण विरोधकांच्या जुलमी कारवायांना न भिता क्रुसाचे चिन्ह मानाने हातात, कपाळावर व हृदयावर मिरवावे. सैतान हे चिन्ह पाहून पळून जाईल. त्यामुळेच ही क्रुसाची खूण उठता बसता, खाता पिता, फिरता, झोपता, बोलता चालता, शब्दाने आणि कृतीने आपल्या जीवनात काढीत राहा. संत सिरील
✝️   

पहिले वाचन उत्पत्ती   ३७: ३ -४,१३,१७-२८ 
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे; तर आता चला, आपण त्याला ठार करू."

इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफवर अधिक प्रीती करीत असे. कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याने भाषण करिनासे झाले.यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेम येथे गेले. तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, "तुझे भाऊ शखेम येथे कळप चारीत आहेत. तर चल, मी तुला त्याच्याकडे पाठवतो."
योसेफ आपल्या भावाच्या मागे गेला व ते त्यांना दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले, तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्डयात टाकून देऊ आणि मग सांगू कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले, मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होत ते. " हे रऊबेनच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणला, "आपण त्याला जिवे मारू नये. रक्तपात करू नका; या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका." त्याच्या हातातून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला, योसेफ आपल्या भावापाशी पोहोचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता. त्यात पाणी नव्हते.
        मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तो इश्माएली लोकांचा एक काफिला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादहून इजिप्तकडे जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावांना म्हणाला, आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपविला तर काय लाभ ? चला, आपण त्यांना या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे. आपल्या हाडामांसाचा आहे हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांस वीस रुपयांला विकून टाकले. ते योसेफला इजिप्त देशात घेऊन गेले.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०५:१६-२१
प्रतिसाद :  प्रभूची अद्भुत कृत्ये आठवा.

१) इजिप्त देशावर प्रभूने दुष्काळ आणला. 
त्यांच्या अन्नधान्याचा पुरवठा पार तोडून टाकला.
त्याच्या अगोदर त्याने एक मनुष्य पुढे पाठवला.
तो म्हणजे गुलाम म्हणून विकण्यात आलेला योसेफ ! 

२) त्यांनी त्याचे पाय साखळ्यांनी जखडले, 
गळ्याभोवती लोखंडी कडे अडकवले, 
पुढे योसेफने वर्तवलेले भविष्य खरे ठरले.
प्रभूच्या वचनानुसार त्याचे म्हणणे बरोबर ठरले. 

३) इजिप्तच्या राजाने माणसे पाठवून 
त्याला मुक्त केले. राष्ट्राच्या अधिपतीने 
त्याची सुटका केली.. त्याने त्याला आपल्या
 राज्याचा सत्ताधीश आणि 
आपल्या सर्वस्वावर अधिकारी नेमले.



जयघोष    
प्रभू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.


शुभवर्तमामत्तय २१:३३-४३,४५-४६

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "हा वारस आहे. चला, आपण ह्याला ठार मारू."

येशूने मुख्य याजक आणि लोकांच्या वडीलजनांना म्हटले, "आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यांना लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील, असे म्हणून, त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे; चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?" ते त्याला म्हणाला, "तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल." येशू त्यांस म्हणाला, “जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;" हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो, “देवाचे राज्य तुम्हांपासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल."
मुख्य याजक व परुशी त्याचे दाखले ऐकून, हा आम्हांविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरायला पाहात होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते..

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येकजण माळी आहोत. देवाने आपणा प्रत्येकाला द्राक्षमळा दिला आहे. आपले कुटुंब, आपला समाज, आपले काम, आपले धर्मग्राम हे सर्व ह्या द्राक्षमळ्याचा भाग आहेत. हा द्राक्षमळा फुलविण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी देवाने आपणांस दिल्या आहेत. देवाने आपणांस दिलेल्या सुदृढ शरीर, पैसा, कलागुण, शिक्षण ह्या देणग्यांच्या योग्य वापराने आपणांस आपला द्राक्षमळा फुलवायचा आहे. देवाने आपणांस आपल्या मर्जीप्रमाणे कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. देवाने आपणास स्वातंत्र्य दिले असले तरी आपण मालक नाहीत म्हणून शेवटी आपणांस | देवाला हिशोब द्यावा लागणार आहे. देवाने मला जो द्राक्षमळा दिला आहे तिथे योग्य फळ यावे म्हणून मी काय करणार आहे यावर विचार करू या.


प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुला सर्वस्वी तारणारा म्हणून स्वीकारण्यात व तुजठायी खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या