Marathi Bible Reading | Third Sunday of the Lent | 20 March 2022 |

 रविवार २० मार्च २०२२ 

(उपवासकाळ ३रा रविवार)

पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यासाठी येत आहे; परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक;

✝️ 


✝️

  इस्त्राएली जनतेला फारोच्या गुलामगिरीतून  सोडविण्यासाठी देवाने मोशेला पाचारण केले. देवाच्या वचनावर इस्त्राएली जनतेने पूर्ण विश्वास न ठेवल्यामुळे अनेक अडथळे निर्माण झाले. निर्गम ह्या पुस्तकात मोशेने इस्त्राएली जनतेला पश्चात्तापाचा संदेश दिला.
 पापांमुळे  आपण देवापासून दूर जातो म्हणूनच पापांचा दोष स्वीकारुन त्यापासून मागे वळणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी देवाकडे करुणा, याचना करणे गरजेचे आहे. पश्चात्ताप म्हणजे पापांचा त्याग करुन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने नवजीवन  जगण्यासाठी केलेला मनाचा निर्धार. आपले मानवी जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगून फलद्रूप होण्यासाठी देवाचे दान आहे. उपवास काळात आपण जाणीवपूर्वक आपल्या जीवनावर चिंतन करु या. प्रायश्चित्त, समेट व परोपकार करुन जीवन फलद्रुप बनविण्यासाठी  परमेश्वरासमोर नतमस्तक होऊ या.

✝️   
पहिले वाचन  निर्गम  ३:१-८.१३-१५
वाचक  : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन ३:१-८.१३-१५
“त्याने मला तुम्हांकडे पाठवले आहे." 
मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो याचा कळप चारीत असे. एके दिवशी तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या एका दूताने एका झुडपातून अग्निज्वालेच्याद्वारे त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म होत नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, "मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे? ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो" ते पाहायला मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, "मोशे, मोशे! इकडे जवळ येऊ नकोस. तू आपल्या पायांतले जोडे काढ. कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे." तो पुढे म्हणाला, "मी तुझ्या पित्याचा देव, आब्राहामचा देव, इसहाकचा देव, याकोबचा देव आहे." तेव्हा मोशेने आपले मुख झाकले. कारण देवाकडे दृष्टी करण्यास तो धजला नाही. परमेश्वर म्हणाला, “जे माझे लोक इजिप्त देशात आहेत त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे आणि त्यांच्याकडून वेठीने काम करून घेणाऱ्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यवूसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.”
तेव्हा मोशे देवाला म्हणाला, "पाहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हांकडे पाठवले आहे, असे मी इस्राएल लोकांकडे जाऊन त्यांना सांगितले असता, त्याचे नाव काय? असे मला ते विचारतील तेव्हा मी काय सांगू ?" देव मोशेला म्हणाला, “मी जो आहे तो मी आहे." आणि देव म्हणाला, “तू इस्राएल लोकांना सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे." देवाने मोशेला आणखी सांगितले, "तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यान्पिढ्या माझे स्मरण होईल."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०३:१-४,६-७,८,११
प्रतिसाद :  परमेश्वर कृपाळू व प्रेमस्वरूप आहे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद गा. 
हे माझ्या अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद गा.
 हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद गा.
 त्याचे उपकार विसरू नको.

२ )तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो. 
तो तुझे सर्व रोग बरे करतो. 
तो तुझा जीव नाशापासून वाचवतो. 
तो तुला प्रेम व करुणा यांचा मुकूट घालतो.

३) गांजलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची
 व न्यायत्वाची कृत्ये करतो. 
त्याने आपले मार्ग मोशेला आणि 
आपली कृत्ये इस्रायलच्या वंशजांना कळवली आहेत.

४) परमेश्वर कृपाळू व प्रेमस्वरूप, मंदक्रोध व दयाळू आहे. 
कारण जसे पृथ्वीवर आकाश फार उंच आहे 
तशी त्याची दया, त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे.


दुसरे वाचन  १ करिंथ १०:१-६, १०,१२
वाचक:पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"वाळवंटात मोशेच्या नेतृत्वाखाली एकत्र असलेल्या लोकांचे जीवन हे आमच्या बोघासाठी लिहिले गेले आहे."
बंधुजनहो, मी आपणाला जाणीव करून देतो की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते आणि ते सर्व समुद्रातून पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्याले कारण ते आपणामागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टी आम्हाला उदाहरणादाखल प्राप्त झाल्या यासाठी त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा कुरकुर करू नका. यागोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आम्ही युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 
प्रभू म्हणतो, “पश्चात्ताप करा,
कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."

शुभवर्तमान लूक  १३:१-९

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. "

तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञांत मिसळले होते, त्याच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय ? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्यासारखा नाश होईल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते येरुशलेमात राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हां सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल."त्याने मग हा दाखला सांगितला : "कोणा एकाचे आपल्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यासाठी आला परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यासाठी येत आहे; परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी ? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, "महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: सातत्य आणि नियमितपणा यामुळे माणूस जीवनात बरेच काही प्राप्त करून घेत असतो. मात्र त्या सातत्याला हट्ट व दुराग्रह ह्यांचे ग्रहण लागले की माणूस विकृतीमध्ये मुळावत जातो आणि स्वतःचा नाश करून घेतो.
 १. परमेश्वर सदैव प्रेमळ, करुणामय आणि क्षमाशील असतोः आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या काळापासून परमेश्वर सदैव प्रेमाचे, करुणेचे व क्षमाशीलतेचे दर्शन घडवीत आलेला आहे. तो जो आहे तो आहे. तो कधी बदलत नाही. त्याचा अनुभव आल्यामुळे बदलत जाते ती माणसाच्या मनातील देवाची प्रतिमा. इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामगिरीत खितपत पडलेली असल्याचे पाहून तो कळवळतो. त्यांचा आक्रोश च पाहून तो विव्हळतो. त्यांना सोडविण्यासाठी तो स्वर्गातून खाली उतरतो, मोशेला प्रकट होतो. त्याला आपली योजना समजून सांगतो. प्रेम व क्षमा याबाबतीत परमेश्वराचे जे सातत्य आहे व जो नियमितपणा आहे त्यात आत्तापर्यंत कधीही खंड पडलेला नाही. 
२. मनुष्य सदैव आपले अंतःकरण कठीण करतोः परमेश्वर आपल्या कोमल हळूवार स्पर्शाने मानवाला आपले प्रेम देत असूनही माणूस मात्र त्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष
करतो. मोशे आपल्या लोकांपुढे जाऊन उभा राहायला घाबरत होता कारण त्याला ठाऊक होते की, ते लोक ताठ मानेचे आणि कठीण अंतःकरणाचे लोक होते अरण्यातील प्रवासात देवाने लोकांसाठी कितीतरी महत्कृत्ये केलेली असली तरी ते आपले दुर्मार्ग सोडून देवाकडे वळायला तयार नव्हते. ३. पापामधील सातत्य माणसाला विनाशाच्या दरीत ढकलते : सतत पाप केल्यामुळे बरेच लोक अरण्यातच मरण पावले. ते काही पवित्र भूमीत पोहोचले नाहीत. येशू त्यासाठी पश्चात्तापाचा मार्ग सुचवितो. गालीलकर व शिलोह येथील लोकांचा नाश झाला त्याप्रमाणे किंवा अंजिराच्या निष्फळ झाडाप्रमाणे केवळ कर्मकांडांनी डवरलेले मंदिर उद्धवस्त झाले. परमेश्वर आपल्याला प्रायश्चित्तकाळात पश्चात्तापाची आणखी एक संधी देऊ इच्छितो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात / कुटुंबात कोण कोणत्या बाबतीत सातत्य व नियमितपणा आहे ? मी कोणकोणत्या बाबतीत हट्टी व दुराग्रही आहे ? पापामुळे माझे कोणकोणते नुकसान होत आहे ? त्यासाठी मी कोणकोणत्या बाबतीत पश्चात्ताप करणार आहे ?

प्रार्थना : हे परमेश्वर बापा, तुझ्या इच्छेप्रमाणे पवित्र व सेवाभावी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या