सोमवार २१  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ३रा सप्ताह )

✝️ 

"कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. '

संत निकोलस डी फ्लू
- वर्तनसाक्षी (१४१७-१४८७)

स्वित्झर्लंडमधील फोट कॅन्टन नावाच्या एका तळ्याशेजारी वसलेल्या खानदानी घराण्यामध्ये निकोलस डी फ्लू ह्यांचा जन्म झाला. भिक्षुक होण्याआधी सैन्यात असताना नागरी आणि वैवाहिक जीवनात त्यांनी खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श घालून दिला.
तरुणपणी तो काही काळ सैन्यात होता. आपल्या देशासाठी लढत असताना तो कॅप्टन पदापर्यंत जाऊन पोहोचला. पुढे त्याचे डॉरेथी नावाच्या एका राजघराण्यातील सुंदर युवतीशी लग्न झाले. त्यांच्या संसारवेलीवर तब्बल दहा फुले उमलली. एक जबाबदार नागरिक या नात्याने निकोलस ह्यांनी आपल्या देशाच्या नागरी व राजकीय जीवनात सक्रीय सहभाग घेतला. कौन्सिलर, मॅजिस्ट्रेट अशी अत्यंत वजनदार पदे त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळली. हे सर्व करीत असताना ते रात्र रात्र प्रार्थनेत घालवित असत. इ. स. १४६७ साली वयाच्या ५० व्या वर्षी त्याला अतिपवित्र त्रैक्याचा एक विलोभनीय दृष्टांत घडला. त्यानुसार त्यांनी आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली आणि सर्वसंगपरित्याग करून संपूर्णतः स्वतःस देवधर्माला वाहून घेतले. आपल्या पत्नीची संमती मिळविल्यानंतर आणि कुटुंबाची चोख व्यवस्था केल्यानंतरच ते रांम्फर्ट येथील पर्वतरांगामध्ये निघून गेले. तिथल्या लोकांनी त्यांच्यावरील प्रेमाखातर एक लहानसे प्रार्थनागृह आणि निवास स्थान बांधले. येथे असताना त्यांनी आपल्या जीवनातील २० वर्षे एकांतात व प्रार्थनेमध्ये घालविली. असे म्हणतात की ह्या २० वर्षात त्यांनी अन्न पाण्याला बिलकूल स्पर्श केला नाही. ते केवळ पवित्र ख्रिस्तरीरावर (कम्युनिअन) जगत असत. हे पाहणारे अनेक साक्षीदारही त्यांच्या काळात उपस्थित होते.
त्यांच्या ह्या एकांतवासाच्या काळात त्यांना ब्रदर क्लॉस ह्या नावाने संबोधिले जाई. त्यांची कीर्ती स्वित्झर्लंडच्या सीमेपलिकडे जाऊन पोहोचली. समाजातील श्रेष्ठ, कनिष्ठ असे सर्व थरातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि आपणावर प्रार्थना करून घेण्यासाठी येत असत.
इ. स. १४८१ साली स्वित्झरर्लंडमध्ये फूट पडल्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झालेली असताना ब्रदर क्लॉस ह्यांना तिथे बोलाविण्यात आले. तेथे त्यांनी आपल्या दूरदृष्टीने उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. अशा प्रकारे त्यांनी आजच्या संयुक्त स्वित्झरर्लंडचा पाया घातला.
इ. स. १६६९ साली त्यांना धन्यवादित ही पदवी देण्यात आली व ५ मे १९४८ रोजी पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना संतपदाचा मुकूट प्रदान केला.
चिंतन : संत निकोलस डी फ्लू ह्यांची प्रार्थना “हे माझ्या प्रभू आणि माझ्या देवा, तुझ्यापासून जे मला दूर नेते ते मजपासून दूर ने. जे मला तुझ्याजवळ आणते त्याचे मला दान दे. माझे सर्वस्व घे आणि तूच मला संपूर्णपणे व्यापून टाक."
✝️   

पहिले वाचन २ राजे ५:१-१५ 
वाचक :राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला."

अरामच्या राजाचा सेनापती नामान हा एक प्रतिष्ठित गृहस्थ असून आपल्या स्वामीजवळ त्याचे मोठे वजन असे. कारण त्याच्यामुळेच परमेश्वराने अराम्यांना युद्धात विजयी केले होते. तसाच तो मोठा पराक्रमी वीर होता. परंतु त्याला कोड निघाले होते. एकदा अरामी टोळ्यांनी इस्राएली प्रदेशात छापा घालून एक लहान मुलगी कैद करून आणली होती. ती नामानच्या बायकोची दासी झाली होती. ती आपल्या स्वामिनीला म्हणाली, “आमच्या स्वामींनी शोमरोनातल्या संदेष्ट्याची गाठ घेतली तर बरे होईल तो यांचे कोड बरे करील." तेव्हा नामानने राजाकडे जाऊन सांगितले की, "इस्राएली प्रदेशातील ती मुलगी असे म्हणत आहे." "जा तर मग," अरामचा राजा म्हणाला, "मी इस्राएलच्या राजाला खलिता देतो." तेव्हा दहा किक्कार रौप्यमुद्रा, सहा हजार सुवर्णमुद्रा (मोहरा) व दहा पोषाख घेऊन नामान निघाला. त्याने इस्राएलच्या राजाला खलिता सादर केला. त्यात लिहिले होते, "या पत्रासोबत मी आपणाकडे आमचे मानकरी नामान यांना पाठवत आहे. त्याचे कोड आपण घालवावे." मग असे झाले की, पत्र वाचताच इस्राएलच्या राजाने त्रागाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, "या कोड फुटलेल्या माणसाला बरे करण्याकरिता या गृहस्थाने माझ्याकडे पाठवले आहे; पण मी जीवन आणि मरण देणारा देव का आहे? पहा ना, माझ्याशी भांडायला हा काही तरी निमित्त पहात आहे."
इस्राएलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली, हे देवभक्त अलिशाने ऐकले तेव्हा त्यने राजाला निरोप पाठवला, "आपण कशाला आपली वस्त्रे फाडलीत? त्याला येऊ द्या ना माझ्याकडे म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला समजेल." तेव्हा नामान आपले घोडे व रथ घेऊन अलिशाच्या दारी येऊन उभा रहिला. मग अलिशाने एक जासूद पाठवून त्याला सांगितले, यादॅनवर जाऊन सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्ववत होऊन तु शुद्ध होशील. पण नामान रागावून निघाला आणि म्हणाला, "मला वाटले होते, तो मला भेटायला बाहेर येईल. जवळ उभे राहून आपल्या परमेश्वराचा धावा करील. रोगट जागेवरून हात फिरवून माझे कोड घालवील. दिमिष्कातल्या अवाना आणि पडपर या नद्या इस्राएलातल्या साऱ्या जलाशयांपेक्षा सरस नाहीत का? त्यात स्नान करुन मला शुद्ध नाही का होता येणार?" मग तो मागे फिरला व रागाच्या भरात चालता झाला. तेव्हा त्याचे हुजरे जवळ येऊन म्हणाले, "पिताजी, या संदेष्ट्याने एखादा जालीम उपाय सुचवला असता तर आपण तो केला नसता काय? तर तो म्हणतो, स्नान करा आणि शुद्ध व्हा, त्यात काय आहे?" तेव्हा त्या देवभक्ताच्या सांगण्याप्रमाणे यादेंनवर जाऊन त्याने सात वेळा बुडी मारली; त्याबरोबर त्याची अंगकांती लहान मुलासारखी निर्मळ झाली. नंतर नामान आपल्या सर्व लवाजम्यासह त्या देवभक्ताकडे
जाण्यास मागे फिरला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ४१: २, ३:४२:३, ४
प्रतिसाद :  मला देवाचे दर्शन कधी घडेल ? 

१) हे देवा, पाण्याच्या प्रवाहासाठी 
एखादी हरिणी धापा टाकते 
तसाच माझा जीव तुझ्यासाठी 
धापा टाकीत आहे.

२) माझा जीव देवाकरिता, 
जिवंत देवाकरिता तान्हेला
झाला आहे; मला देवाचे दर्शन कधी घडेल ?

 ३ तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर; 
ते मला •मार्गदर्शन करोत. 
तुझ्या पवित्र डोंगरावर 
तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.

४ ) मग मी देवाच्या वेदीजवळ, 
देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन. 
हे देवा, माझ्या देवा,
वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.


जयघोष                                    योहान ८:१२
प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे. 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."



शुभवर्तमान लूक  ४:२४-३०

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशूला एलिया आणि अलिशाप्रमाणे फक्त यहुद्यांसाठी पाठवले नव्हते. "
येशू नाझरेथ गावी आला आणि सभास्थानातील लोकांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या काळी इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यातील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्याच्यातील कुणीही शुद्ध झाला नाही, तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला." हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजच्या पहिल्या वाचनात आपण नामान ह्या सेनापतीला अलिशा संदेष्ट्याच्या मार्फत देवाकडून आरोग्य प्राप्त झाल्याचे ऐकतो. ह्या उताऱ्यातील काही व्यक्तींच्या देवावरील विश्वासाचे आपण विश्लेषण करू या. सर्वप्रथम नामानच्या बायकोची दासी असलेली लहान मुलगी, ह्या लहान मुलीचा विश्वास खरंच दांडगा होता. तिला खात्री होती की अलिशा संदेष्ट्याच्या मार्फत देव नक्कीच तिच्या मालकाला बरे करील. तद्नंतर आपण नामान ह्या सेनापतीच्या श्रद्धेवर नजर टाकूया, तो इस्रायली नव्हता, तो खऱ्या देवाची उपासना करीत नसे पण केवळ आपण बरे व्हावे ह्या उद्देशाने त्याने त्या दासीच्या सांगण्यानुसार अलिशा संदेष्ट्याला भेटायचे ठरवले. सुरुवातीला त्याचा अहंकार आड आला, त्याला वाटत होते मी एवढा मोठा सेनापती मी का ह्या यार्देन नदीत स्नान करू ? हा संदेष्टा स्वतःला एवढा मोठा समजतो तो मला भेटायला सुद्धा आला नाही! पण नंतर नामान ह्याने आपला अहंकार बाजूला सारून अलिशा संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे केले व त्यास आरोग्य प्राप्त झाले. शेवटी आपण इस्रायलच्या राजाकडे लक्ष लावूया, राजा स्वतः मान्य करतो की, तो देव नाही, तो एक साधा मानव आहे. आपल्या जीवनात सुद्धा जेव्हा आपणांस नामान प्रमाणे नम्र होऊन काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा आपली काय धारणा असते त्यावर मनन करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या निवडलेल्या सेवकांचा योग्य तो सन्मान करण्यास व त्यांना स्वीकारण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️