Marathi Bible Reading | Wednesday 30th March 2022 | 4th Week of Lent |

बुधवार ३०  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ४था  सप्ताह )

जो माझे वचन ऐकतो, व विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. "



संत जॉन क्लिमॅकूस
•मठाधिकारी, वर्तनसाक्षी (५२५-६०६)

✝️ 

 जॉन क्लिमॅकूस ह्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीत “द लँडर टू पॅराडाईस” (पारादिसकडे जाणारा महामार्ग) हे पुस्तक अजरामर ठरलेले आहे. संत जॉन क्लिमॅकूस ह्यांच्या आडनावावरून ह्या पुस्तकाला आध्यात्मिकतेचा उच्चांक (क्लायमॅक्स) असे संबोधिले जाते. ही त्यांची साहित्यनिर्मिती अनेक भाषांमधून भाषांतरीत करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत प्रसिद्ध असलेला हा आध्यात्मिक वास्तूपाठ प्रभू येशूख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ३० प्रकरणे भाविकांपुढे सादर करतो. दुर्गुणांचा परित्याग कसा करावा व सद्गुणांचा अंगिकार कसा करावा ह्याविषयी तो मार्गदर्शक ठरलेला आहे. हे सद्गुण - दुर्गुण समजून सांगताना दैनंदिन जीवनातील व ख्रिस्तसभेच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग व दाखले लेखकाने रंगवून वर्णन केलेले आहेत.
जॉन क्लिमॅकूस हे ३० मार्च ६०५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी मरण पावले. 

चिंतन : आपल्या प्रार्थनेसाठी मोठमोठ्या शब्दांची जंत्री जमविण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या बालकाचे बोबडे बोलही परमेश्वर पित्याला स्पष्टपणे समजू शकतात. संत जॉन क्लिमिकूस
                                -------------------------
परमेश्वर जो दयाळू व प्रेमळ आहे तो सर्वाचे सांत्वन करील. बाळाचा विसर आईला पडेल तरी परमेश्वराला आपला विसर पडणार नाही अशी शाश्वती यशया देत आहे.

 परमेश्वर प्रेमळ आहे व तो बीनशर्त आपल्यावर प्रेम करतो. आपण जरी त्याच्या प्रेमापासून बहकलो व त्याच्या आज्ञा पाळण्यास अपूरे पडले तरी प्रभू  परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. जीवनातील दु:ख, संकटे, आजार, अपयश व  निराशा अशा अनेक प्रसंगी आपला धीर खचतो व परमेश्वराचे अस्तित्व जाणवत नाही तरी प्रभू म्हणतो, 'मला तुझा विसर पडणार नाही, कारण मी तुला आपल्या तळहातावर कोरुन ठेविले आहे.' . प्रभू येशू म्हणत आहे, 'जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास  ठेवितो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
 
✝️   

पहिले वाचन यशया  ४९:८-१५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“देशाचा उत्कर्ष व्हावा म्हणून लोकांच्या कराराप्रीत्यर्थ मी तुला नेमतो."
परमेश्वर म्हणतो, प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुनः वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो. तू बंदिस्त असलेल्यांना म्हणावे, बाहेर या; अंधारात आहेत त्यांना म्हणावे, उजेडात या. ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल. त्यांना तहानभूक लागणार नाही. झळई व ऊन यांची बाधा त्यांना होणार नाही, कारण त्याच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याचा झऱ्यांवर तो त्यांना नेईल. मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील. हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत; हे सिनी लोकांच्या देशातून येत आहेत. हे आकाशा, जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर, अहो पर्वतांनो, जयघोष करा! कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पीडलेल्या लोकांवर दया केली आहे.
ह्यावर सियोन म्हणाले, 'परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे.' परंतु परमेश्वर म्हणतो, 'स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय ? कदाचित 'स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १४५: ८-९,१३-१४,१७-१८
प्रतिसाद :  प्रतिसाद प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.

१) प्रभू, प्रेमळ आहे. प्रभू दयानिधी आहे. 
तो मंदक्रोध व प्रेमसागर आहे. प्रभू सर्वांशी चांगला आहे. 
त्याने निर्मिलेल्या सर्वांवर त्याची कृपादृष्टी असते.

२) प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो. 
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
अडखळणाऱ्या सर्वांना प्रभू सावरतो.
 वाकून गेलेल्या सर्वांना ताठ उभे करतो.

३) प्रभूचे सारे करणे न्यायाचे असते. 
त्याची सगळी करणी दयेची असते. 
जे प्रभूचा धावा करतात, 
मनापासून त्याचा धावा करतात, 
त्यांच्या समीप तो असतो.


जयघोष        
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, 
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.



शुभवर्तमा योहान ५:१७-३०

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो."

येशने यहुद्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे." ह्यामुळे तर यहुदी त्याला जिवे मारायची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडीत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे.
ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सत्य तेच सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो तसेच पुत्रही करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो; तुम्हांला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हांला नक्की सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. “मी तुम्हांला नक्की सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे कारण पित्याच्या ठायी जसे स्वत:चे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायी स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरीतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.
“मला स्वतः होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो."

प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: यहूदी लोक जुन्या करारातील एकच देव ह्या संकल्पनेशी परिचित होते व त्यांची ह्या एका देवावर श्रद्धा होती. नवीन करारात येशू देवाचा एक नवा चेहरा प्रकट करतो. स्वर्गीय पित्याने आपल्या पुत्राला आपले जीवन देण्याचे व तारणाचे कार्य पूर्ण करण्यासाठी ह्या जगात पाठविले. येशूच्या बाप्तिस्मा वेळी स्वर्गीय पित्याने येशू हा आपला पुत्र आहे हे प्रकट केले. पिता व येशू समान आहेत, ते एक-दुसऱ्यावर अवलंबून आहेत व ते एकमेकांना पूरक आहेत. जर आपणांस सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपणांस देवावर व येशूवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे त्याने सांगितलेल्या वचनांवर विश्वास ठेवणे व त्यानुसार जीवन जगणे.

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझी वचने व आज्ञा पाळण्यास आणि तुझे प्रेम अनुभवण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या