मंगळवार २९ मार्च २०२२
(उपवासकाळ ४था सप्ताह )
"तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ?"
संत जोनास व बारचिसिऊस
-रक्तसाक्षी (३२७)
✝️
पवित्र स्थानावर परमेश्वराच्या कृपेचा झरा अखंडितपणे वाहत असतो. तो झरा सर्वांना निरोगी बनवून जीवन फलदायी बनवतो.
शुभवर्तमानातील बेथेस्दा तळ्यातील झरा त्यात योग्य वेळी उतरणाऱ्या माणसांना आरोग्य प्रदान करीत होता. मात्र ३८ वर्षे अंथरुणावर पडलेला पंगु मनुष्य त्या तळ्यात उतरु शकत नव्हता. पंगु माणूस तळ्यात उतरलाच नाही केवळ प्रभू येशूच्या शब्दाच्या सामर्थ्याने तो निरोगी व सशक्त झाला. परमेश्वर स्वतःच जीवन देणारा कृपेचा झरा आहे. प्रभू येशू स्वतःच जीवनाचे पाणी आहे म्हणूनच प्रभूच्या वचनावर आपला विश्वास दृढ गरजेचे आहे.
आपले सर्व शारीरिक व्याधी, मानसिक वेदना, कौटुंबिक अडचणी व समस्या घेऊन आज आपण अखंडपणे वाहणाऱ्या कृपेच्या झऱ्याजवळ जाऊ या. विश्वासाने त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन शरण जाऊ या..
✝️
पहिले वाचन याहेजकेलं ४७:१-९,१२
वाचक :यहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा वाहात होता, जेथे जेथे ही नदी वाहात गेली तेथील सर्व काही जगले."
देवदुताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत आहे; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, ते पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत आहे.
मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरुन जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, "मानवपुत्रा, तू हे पाहिले ना?"मग त्याने मला नदीच्या तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर पुष्कळ झाडे असलेली मो पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अरबांत उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्राला मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यामध्ये जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यामध्ये मासे विपुल होतील; कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहातील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्याच्या फळांचा बहर खुंटणार नाही प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षाची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४६: २-३,५-६,८-९
प्रतिसाद : सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे.
१) देव आमचा आश्रयदाता व सामर्थ्यदाता आहे.
तो संकटकाळी साह्य करण्यास सदा सिद्ध असतो;
पृथ्वी गडगडली, पर्वत कोसळून समुद्रात
खोलवर बुडाले तरी आम्ही भिणार नाही.
२) जिचे पाट देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र
निवासस्थानाला आनंदित करतात अशी एक नदी आहे.
त्या नगरीस देव आहे, ती हादरणार नाही;
तांबडे फुटते न फुटते तोच देव तिला मदत करील.
३) सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे;
याकोवचा देवा आमचा उंच बुरूज आहे.
प्रभूने काय केले आहे, ते येऊन पाहा:
त्याने पृथ्वीची कशी धूळधाण केली आहे.
जयघोष ओमास ५:१४
तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा;
वाइटाच्या मागे लागू नका,
म्हणजे तुम्हीं म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर,
सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल.
शुभवर्तमान योहान ५:१-३,५-१६
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“लागलीच तो माणूस बरा झाला."
यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमला गेला. यरुशलेममध्ये मेंढरेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ?" त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, "महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो." येशू त्याला म्हणाला, "ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग." लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बाथ होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, "आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही." त्याने त्यांना उत्तर दिले, "ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून चालू लाग," त्यांनी त्याला सांगितले, "आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे ?" तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, "पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नको; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल." त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करीत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूने एकाकी पडलेल्या पक्षघाती माणसाकडे आपले लक्ष लावले, त्याला समाजाने टाकून दिले आहे, त्याच्या जवळचे कोणीही त्याच्यासोबत नाही हे येशूने ओळखले व त्याला त्याची दया आली व येशूने ह्या दुर्लक्षित, बहिष्कृत पक्षघाती माणसाला बरे केले. पक्षघाती माणसाने ज्याप्रमाणे "माझा कोणी माणूस नाही" अशी आपली व्यथा येशूपुढे प्रकट केली त्याचप्रमाणे अनेक लोक आज आपणापुढे सुद्धा त्यांच्या एकाकी, लाचार जीवनाविषयी सांगत असतील. अश्या एकाकी, दुर्लक्षित माणसांना आपण कशी वागणूक देतो. मला त्यांचे काय, समाजसेवा करायला मला वेळ नाही इत्यादी कारणे देऊन आपण हातवर करतो. येशू आज आपणांस अशा लोकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन करीत आहे. तसेच जेव्हा जीवनात आपण एकाकी असतो तेव्हा येशू आपणांस सांगत आहे की, मी कधीच कोणाकडे दुर्लक्ष करीत नाही. मी नेहमीच त्यांच्या मदतीला धावून येतो.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तूच जीवन व पुनरुत्थान आहेस. तुझ्यावरील विश्वासात वाढण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या