Marathi Bible Reading | Monday 28th March 2022 | 4th Week of Lent |

सोमवार २८  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ४था  सप्ताह )

येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे, 




संत सिक्स्ट्स तिसरे

परमगुरू (४४०)

✝️ 

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याद्वारे देवाने इस्त्राएल जनतेला नवीन जीवनदायी आशेचा संदेश दिला आहे. प्रभू येशूच्या येण्याने  नवजीवनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.  एका मुलाचा बाप येशूकडे आला. तो माणूस अंमलदार म्हणजे राजदरबारातील प्रतिष्ठीत अधिकार. त्या अंमलदाराला कदाचित येशूविषयी माहिती असावी कारण विश्वासाने तो येशूकडे आला होता, म्हणूनच त्याच्या विश्वासामुळे येशूने त्याच्या मुलाला बरे केले.
विश्वासाने विश्वास वाढत असतो आणि नम्रता धारण केल्याने  माणसाला मोठेपणा प्राप्त होत असते. आपण आपल्या विश्वासावर चिंतन करु  या. 
✝️   

पहिले वाचन यशया  ६५:१७-२१
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"शोकाचा व आकांताचा शब्द पुन: ऐकू येणार नाही.”

प्रभू म्हणतो, “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा; पाहा, मी येरुशलेम उल्हासमय, त्याचे लोक आनंदमय करतो. मी येरुशलेमविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन; त्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही. यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक त्यात जन्माला येणार नाही, जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा त्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षाचा होऊन मरेल, देवाच्या शापाने मरणारा पापीही शंभर वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यात राहतील; द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ३०: २,४-६,११-१३
प्रतिसाद :  प्रभो, मी तुझा महिमा गातो

१) प्रभो, मी तुझा महिमा गातो,
 कारण तू मला वर आणले आहेस; 
अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस.
 हे प्रभो, तू अधोलोकातून मला वर आणलेस, 
मी गर्तेत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस.

२) अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा, 
त्याच्या पावित्र्याचे स्मरण करून धन्यवाद द्या. 
त्याचा कोप केवळ क्षणभर; 
पण प्रसन्नता मात्र आयुष्यभर सायंकाळी दुःखाश्रू घर करतात, 
पण सकाळी आनंदाचा गजर होतो.

३) प्रभूने माझे ऐकले व माझ्यावर दया केली. 
प्रभू माझा सहाय्यकर्ता झाला. 
तू माझ्या शोकाचे रूपांतर करून मला 
आनंदाने नाचायला लावले आहेस.
 हे प्रभो, माझ्या देवा, मी सदैव तुला धन्यवाद देईन


जयघोष       
   परमेश्वर म्हणतो, आता तरी मनःपूर्वक माझ्याकडे वळा, 
कारण मी कृपाळू व दयासागर आहे.




शुभवर्तमा योहान ४:४३-५४

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ४:४३-५४

"जा, तुझा मुलगा वाचला आहे."

येशू शोमरोनहून गालिलात निघून गेला. कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला; कारण येरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते..
नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कर्फणहूम येथे आजारी होता. येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा; कारण तो मरणाच्या पंथाला लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही." तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभुजी, माझे मूल मरण्यापूर्वी तुम्ही खाली येण्याची कृपा करा." येशू त्याला म्हणाला, जा; तुमचा मुलगा वाचला आहे." तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, "आपला मुलगा वाचला आहे." ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले; त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला." ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे, “त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय.”
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशू जेव्हा पुन्हा गालीलात आला तेव्हा, ज्या अंमलदाराचा मुलगा आजारी होता त्याने येशूकडे फक्त एका वाक्यात विनवणी केली. आणि येशूने ती विनवणी एकताच त्याच्या मुलाला बरे केले. येशूने जे सांगितले, “जा तुमचा मुलगा वाचला आहे.” ह्यावर अंमलदाराने विश्वास ठेवला. ह्या अंमलदाराने येशूकडे लांबलचक प्रार्थना केली नाही, त्याने केलेल्या एका वाक्याच्या प्रार्थनेला येशूने तात्काळ उत्तर दिले. कारण येशूला त्याच्याठायी भक्कम विश्वास दिसला. आपण भरपूर प्रार्थना करतो, मोठमोठ्या प्रार्थनासभांना जातो, अनेक नोव्हेने करतो पण आपली एक तक्रार असते ती म्हणजे देव माझी प्रार्थना ऐकत नाही. देव माझी प्रार्थना का ऐकत नाही? मी प्रार्थना करताना खऱ्या विश्वासाने व अंतःकरणातून प्रार्थना करतो का? की इतरांनी मला पहावे म्हणून मी प्रार्थना करतो ? अंमलदाराला येशूने जे सांगितले, त्यावर श्रद्धा ठेवली व येशूच्या सामर्थ्याचा त्याला अनुभव आला. प्रार्थना करताना देव आपणांस जे काही सांगत आहे त्यावर मी लक्ष देतो का की मीच फक्त बोलत असतो ह्यावर मनन करू या.

प्रार्थना :हे प्रभू येशू, आमच्यातील अहंकार व अविश्वास काढून टाक आणि विश्वासाने तुझ्या सन्मार्गावर चालण्यास तुझी कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या