रविवार २७ मार्च २०२२
(उपवासकाळ ४था रविवार)
तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला.
✝️
"बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
✝️
देवाचे प्रेम, देवाची दया आणि देवाची कृपा किती महान आहे, हे दर्शविण्यासाठी आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने दिलेल्या दृष्टांतावर आपण चिंतन करु या. देव दयाळू आणि क्षमाशील आहे परंतु माणसाने पश्चात्ताप करणे गरजेचे आहे. पश्चात्तापी माणसाबद्दल स्वर्गात आनंद होतो असे आपल्याला सांगितले आहे. आज अनेक माणसे आपल्या स्वकीयांपासून विभक्त होऊन जीवनात खूप काही हरवल्याचा अनुभव घेत आहेत. असहाय्य परिस्थितीत असताना मुलाला बापाची आठवण आली आणि तो शुद्धीवर आला. त्याने पश्चात्ताप करुन मागे फिरण्याचा व आपल्या बापाकडे येण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणालाच त्याचे परिवर्तन| झाले. बाप तर हरवलेल्या मुलाची परतण्याची वाट पाहातच होता. बापाने आनंदाने त्याचे स्वागत केले बापाने तर त्याबद्दल आनंद जल्लोष करीत मेजवानी दिली. पश्चात्ताप, परिवर्तन व समेट ह्याचे सुंदर उदाहरण असलेला हा दाखला सर्वांनाच प्रेरणादायी ठरावा. जीवनात मार्ग चुकलेली, देवापासून बहकलेली व आज्ञा गमावून बसलेल्या सर्वांना आज प्रभू येशू पश्चात्ताप करण्यासाठी आवाहन करीत आहे. ह्या प्रायश्चित्तकाळात आपण देवाकडे परतवळू या. देवाबरोबर व आपल्या बंधु-भगिनींबरोबर समेट करुन देवाला अपेक्षित आनंदी जीवन जगण्यासाठी देवाकडे प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन यहोशवा ५:९-१२
वाचक : यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“वतनभूमीत प्रवेश केल्यानंतर इस्राएली लोक वल्हांडणाचा सण पाळतात."
परमेश्वरा यहोशवाला म्हणाला, “इजिप्तचे लोक तुमचा उपहास करीत असत तो आज मी तुम्हांपासून दूर केला आहे." इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरिहोजवळच्या मैदानात चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण केला. वल्हांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्पन्न झालेल्या धान्याची बेखमीर भाकर आणि हुरडा त्यांनी खाल्ला. ज्या दिवशी त्यांनी त्या देशातील धान्य खाल्ले त्याच दिवशी मान्त्रा बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:२-७
प्रतिसाद : प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.
१) मी सर्वदा परमेश्वराचा धन्यवाद करीन
माझ्या मुखात त्याचे स्तवन सदैव असेल.
माझा आत्मा परमेश्वराच्या ठायी अभिमान बाळगील.
दीन हे ऐकून हर्ष करतील.
२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा.
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला.
त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.
३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले.
त्यांचे चेहरे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला.
त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
दुसरे वाचन २ करिंथ ५:१७-२१
वाचक:पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने विस्ताद्वारे आमचा स्वत:बरोबर समेट केला."
जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नयी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले. पाहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःबरोबर आपला समेट केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली. म्हणजे जगातील लोकांची पापे जमेस न धरता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आम्हांकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आम्हांकडून विनवीत असल्यासारखे आम्ही खिस्ताच्या वतीने वकिली करतो. तुम्ही देवावरोवर समेट केले असे व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने आम्ही सर्वाकरिता पाप असे केले. यासाठी की, आम्ही त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष लुक १५:१८
मी उठून आपल्या पित्याकडे जाईन व त्याला म्हणेन,
"बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
शुभवर्तमान लूक १५:१-३, ११-३२
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे."
सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते, तेव्हा परुशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो." मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला : तो म्हणाला, एका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यापैकी धाकटा पित्याला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या संपत्तीची त्यांच्यात वाटणी केली. थोड्याच दिवसांत धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व मालमत्ता खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाश्याजवळ जाऊन त्याच्या आश्रयाने राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला लावले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी लायक नाही; आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा." मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी लायक नाही. " पण वडिलांनी आपल्या दासांना सांगितले " लवकर उत्तम झगा आणून याच्या अंगात घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण भोजन करून आनंदोत्सव करू कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे." मग आनंदोत्सव करू लागले.
त्याचा थोरला मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्याचा आवाज ऐकला. त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे ? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी भोजन ठरवले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची उपजीविका वेश्यांबरोबर खाऊन टाकली तो तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्यांनी त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे: हरवला होता तो सापडला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रायश्चित्तकाळामध्ये भाविकांच्या चिंतनासाठी ख्रिस्तसभा दरवर्षी उधळ्या पुत्राचा दाखला त्यांच्यासमोर सादर करते. ह्या दाखल्याद्वारे तीन अत्यंत महत्वाची सत्ये त्यांच्या अंतःकरणावर कोरण्याचा ती प्रयत्न करते.
१. मनुष्य आपल्या स्वार्थापायी परमेश्वरापासून दूर जात असतोः आजच्या तिन्ही वाचनांमधून हे सत्य स्पष्टपणे दिसून येते. पहिल्या वाचनात लोक कनान देशातील अन्नावर विसंबून राहताना दिसतात. दुसऱ्या वाचनात देवाशी समेट करण्याऐवजी ते जगाशी मैत्री करण्यात गुंतलेले दिसतात तर शुभवर्तमानामध्ये, “बाबा संपत्तीचा माझा वाटा मला द्या”, असे स्वार्थी विधान करणारा उधळ्या पुत्र आपल्याला भेटतो. केवळ स्वतःच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून माणूस कोणत्याही थराला जातो व परमेश्वरापासून दूर दूर जात राहतो.
२. पश्चात्तापी पाप्याला कोणत्याही क्षणी कवेत घेण्यास परमेश्वर तयार असतो चैनबाजीनंतर दुष्काळ पडला, उपासमार झाली, गुलामगिरी सुरू झाली तेव्हा उधळ्या पुत्राला पश्चात्ताप झाला. अशावेळी तो भानावर येतो आणि आपल्या बापाकडे परततो. बाप त्याच्या परतण्याची वाटच पाहात असतो. तो दूर आहे तोच त्याच्याबापाने त्याला पाहिले. त्याची दुर्दशा झालेली पाहून त्याला त्याचा कळवळा येतो. तो त्याचे पटापट मुके घेतो, त्याला उत्तम झगा देतो, अंगठी व वाहणा देतो, त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापतो. माणसाने एक पाऊल उचलायचा अवकाश परमेश्वर दहा पावले उचलतो.
३. एका पश्चात्तापी पाप्याबद्दल स्वर्गात देवाला अधिक आनंद होतो : हे सत्य ठसठशीत करण्यासाठी येशू लूक शुभवर्तमानात एकूण तीन दाखले देतो. हरवलेले मेंढरू सापडल्याबद्दल, हरवलेले नाणे सापडल्याबद्दल व हरवलेला मुलगा परत मिळाल्याबद्दल मेंढपाळ, स्त्री व बाप ज्याप्रमाणे आनंद साजरा करतात त्याप्रमाणे पश्चात्तापी पापी परतल्याबद्दल देवाला आनंद होतो. पश्चात्ताप, परिवर्तन व नवजीवन हा परमेश्वराला प्रसन्न करण्याचा खात्रीलायक मार्ग आहे असेच येशू सूचित करतो.
आत्मपरीक्षण : माझ्या कोणकोणत्या प्रकारच्या स्वार्थापायी मी देवापासून दूर राहणे पसंत करतो ? परमेश्वराकडे परतण्यासाठी मी कोणकोणती पावले उचलतो? परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मी पश्चात्ताप करण्यास तयार आहे. का ?
प्रार्थना : हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याविरूद्ध व आमच्या स्वकीयांविरूद्ध पाप केले आहे, आम्हावर दया कर, आम्हास पश्चात्तापी अंत:करण दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या