शनिवार २६ मार्च २०२२
(उपवासकाळ ३रा सप्ताह )
"जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
संत लुड्जर
- महागुरू, वर्तनसाक्षी (७४४-८०१)
✝️
होशेय संदेष्ट्याने इस्त्राएली जनतेला परमेश्वराच्या चांगुलपणाची ओळख करुन देताना सांगितले की, परमेश्वर म्हणत आहे, ' मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे.' म्हणूनच पश्चात्ताप खऱ्या मनाने व मोकळपणाने करावा, त्यामध्ये खोटेपणा नसावा.
स्वतःला धार्मिक समजणारी माणसे आपली मलिनता झाकण्याचा प्रयत्न करीत असतात, मात्र परमेश्वर आपले अंतःकरण पारखतो व आपले हृदय चाळून पाहतो. जकातदाराने आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन न करता स्वतःचे अपराध स्वीकारून पश्चात्तापी अंत:करणाने देवाकडे दयेची याचना केली. परमेश्वराला पश्चात्तापी अंतःकरण भावले म्हणूनच प्रभू येशू आज म्हणत आहे, “जकातदार नीतिमान बनून आपल्या घरी गेला. " देवासमोर नम्रतेने नतमस्तक बनून आपल्या पापांची क्षमा मागणे किती चांगले आहे.
आपण आज आपले जीवन परुशी व जकातदारांच्या तुलनेत कसे आहे ह्यावर चिंतन करु या. आपल्यातील अहंकार, पोकळ धार्मिकपणा आणि ढोंगीपणा बाजूला सारून नम्रपणे पश्चात्तापी व शुद्ध अंतःकरणाने देवाच्या कृपासनाजवळ जाऊ या. त्याच्याकडे दयेची याचना करु या, कारण प्रभू म्हणतो, “जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”
✝️
पहिले वाचन होशेय ५:१५-६:६
वाचक :होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन ५:१५-६:६
"मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे.'
प्रभू असे म्हणतो, “ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्याने आम्हांला झोडले आहे व तोच आम्हांला बरे करील. त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वराला ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल."
हे एफ्राइम, मी तुझ्यासाठी काय करू ! हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दंहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्हाड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१: ३-४,१८-२१
प्रतिसाद : मला यज्ञ नको तर प्रेम हवे.
१) देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर
तुझ्या महान दयेस अनुसरून
माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक.
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे दूर कर.
माझ्या पापापासून मला शुद्ध कर.
२) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस,
नाही तर तो मी केला असता.
होमार्पणांची देखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ.
भग्न व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.
३) तू प्रसन्न होऊन सियोन नगरावर कृपादृष्टी कर.
येरुशलेमची तटबंदी उभार.
मग यथायोग्य यज्ञ व विविध होमार्पणे
यांनी तू प्रसन्न होशील.
तुझ्या वेदीवर गोऱ्हे बळी दिले जातील.
जयघोष स्तोत्र ९४:७.८
आज तुम्ही आपली मने कठीण करू नका.
तर प्रभूचे म्हणणे ऐका!
शुभवर्तमान लूक १८:९-१४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्या परुश्यापेक्षा तो जकातदार नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. "
आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वतःविषयी भरवंसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानीत होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला: "एक परुशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मांदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर! मी तुम्हांला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात आपण दोन व्यक्तींनी केलेल्या प्रार्थनेविषयी ऐकले. परुशी जो स्वकेंद्रीत वृत्तीचा होता, प्रार्थना करतानासुद्धा तो फक्त स्वतःबद्दल बोलत होता, स्वतःचीच स्तुती करीत होता. जणूकाही तो स्वतःला श्रेष्ठ व देवाला दुय्यम मानीत होता. त्याउलट जकातदार आपण पापी असल्याचे देवासमोर कबूल करतो व देवाकडून क्षमेची याचना करतो, तो स्वतःला नम्र करतो. म्हणूनच देवाला जकातदाराची प्रार्थना आवडते, देव त्याला त्याच्या पापांची क्षमा करतो व जकातदार परुश्यापेक्षा नीतिमान ठरतो. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण कोणासारखी प्रार्थना करतो ह्यावर विचार करू या. फक्त प्रार्थना करतानाच नव्हे तर समाजात वावरताना सुद्धा अनेक वेळेला आपण परुश्याप्रमाणे स्वतःला धार्मिक व इतरांना पापी मानत असतो. जग जरी माणसाचे बाह्य रूप पाहून त्याची श्रेष्ठता ठरवत असले तरी देव अंतरंग पाहतो हे विसरता कामा नये.
प्रार्थना : हे प्रभू येशू, नम्रपणे तुला शरण येण्यास व दयेची याचना करुन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या