Marathi Bible Reading | Friday 25th March 2022 | 3rd Week of Lent |

शुक्रवार २५  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ३रा सप्ताह )

 “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार,
प्रभू तुझ्याबरोबर असो.”
 

✝️ 


दुताचा मरियेला संदेश सोहळा 


ख्रिस्तसभा आज प्रभू ख्रिस्त जगाचा तारणारा जन्मणार असल्याचे शुभवर्तमान सांगणाऱ्या दुताचा मरियेला संदेश हा सण साजरा करीत आहे.
तारणारा जन्माला येणार असल्याचे भाकित अनेक संदेष्ट्यांनी केले मात्र  यशया संदेष्ट्याने ठामपणे सांगितले की परमेश्वर चिन्ह देत आहे की, 'कुमारी  गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव 'इम्मानुएल' (आमच्या सान्निध देव)  असे ठेविल. ' ख्रिस्त जन्माच्या शेकडो वर्षापूर्वी दिलेला हा संदेश ख्रिस्ताच्या आगमनाने पूर्ण झाला.

 अखिल मानवाच्या तारणाची योजना प्रत्यक्ष स्वरुपात उतरविण्यासाठी परमेश्वराने पहिले पाऊल उचलले. परमेश्वराने गाब्रिएल दूताला मरियेकडे पाठवून त्याची योजना कळवली. जन्मापासूनच किंबहूना गर्भधारणेपासूनच निष्कलंक असलेल्या कुमारी मरियेची निवड देवाने केली. देवदुताने मरियेला दिलेला तो संदेश तिच्या आकलनशक्तीच्या पलिकडचा होता. मात्र स्वभावाने नम्र व आज्ञाधारक असलेल्या मरियेने तो स्वीकारला. मरिया देवाला शरण गेली आणि देवाची आज्ञा प्रमाण मानून तिने होकार देत म्हटले, 'पाहा मी प्रभूची  दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.' देवाच्या सामर्थ्याचा अविष्कार धन्य कुमारी मरियेच्या जीवनात घडला आणि तारणारा व शांतीचा  राजपुत्र जगात आला. मरियेद्वारे इम्मानुएल (आमच्या सान्निध्य देव) जन्मला. मरियेप्रमाणे समर्पित जीवन जगण्यासाठी व देवाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
 
✝️   

पहिले वाचन यशया   ७:१०-१४
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल."

परमेश्वर आहाजला म्हणाला, "तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा उर्ध्वलोकात असो.” आहाज म्हणाला, "मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहाणार नाही." तेव्हा तो म्हणाला, "हे दावीदच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक: तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? म्हणून प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल म्हणजे, "आम्हासह देव', असे ठेवील."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ४०: ७-११
प्रतिसाद :   हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.

१.) यज्ञ आणि अर्पणे ही तुला हवीशी नसतात,
 पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेत. 
होमबली आणि पापबली तुला नकोत. 
ह्यावरून मी म्हणालो पाहा, मी तयार आहे !

२.) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे,
माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद
वाटतो, तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.

३. )हे प्रभो महासभेत मी तुझ्या नीतिमत्वाचा पुरस्कार
 केला. मी आपले तोंड बंद ठेवले नाही, 
हे तुला माहीत आहे.

४.) तुझे नीतिमत्व मी माझ्या हृदयात लपवून ठेवले नाही.
तुझी विश्वसनीयता व मुक्तीची योजना मी जाहीर केली.
तुझी दया आणि तुझे सत्य मी महासभेपासून गुप्त ठेवले नाही.

दुसरे वाचन इब्री १०:४-१०
वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.

बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून ख्रिस्त जगात येण्याच्या वेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अनार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, "तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे." 
वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" (ही नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यास येतात ) आणि मग तो म्हणाला, "पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                           योहान १ : १४

आलेलुया, आलेलुया!
 शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली 
आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला.
 आलेलुया!




शुभवर्तमालूक १:२६-३८

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  १:२६-३८

"पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल."

देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल.आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील. व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही."
मरियेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल.आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील. ,पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आज आपण मरियेला दूताचा संदेश हा सण (सोहळा) साजरा करीत आहोत. गॅब्रिएल दूताने मरियेला आणलेला निरोप ही मरियेला दिलेली दैवी हाक होती. मानवाच्या तारणतायी योजनेत महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेले निमंत्रण होते. मरियेने अगदी मोकळ्या मनाने दिलेल्या होकारामुळे देवाच्या पुत्राला ह्या पृथ्वीवर जन्म घेणे शक्य झाले. मरियेचा होकार हा जणू देवाच्या तारणाच्या योजनेस संपूर्ण मानवजातीने दिलेला होकार होता, म्हणूनच तारण प्राप्त झालेली ती पहिली व्यक्ती होती. मरियेच्या होकारात तिचे देवाला संपूर्णतः शरण जाणे आपणांस दिसून येते. अनेक वेळेला देव आपणास त्याचे कार्य करण्यासाठी बोलावित असतो. देवदूताच्या माध्यमातून तो संदेश देणार नाही पण बायबल, जीवनात घडणाऱ्या घटना यातून देव आपणांस देवराज्याच्या कार्यास बोलावीत असतो. अशा वेळी मी मरियेप्रमाणे देवाला होकार देतो की, देवाच्या हाकेपासून दूर जाण्यास पळवाट शोधत असतो ?

प्रार्थना : हे पवित्र मरिये, तुझे अनुकरण करण्यास आम्हाला धैर्य व प्रेरणा दे,आमेन,


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या