Marathi Bible Reading | Thursday 24th March 2022 | 3rd Week of Lent |

गुरुवार २४  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ३रा सप्ताह )

 "आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते

✝️ 

स्वीडनच्या संत कॅथरीन
- कुमारिका (१३३१-१३८१)

स्वीडनचा राजपुत्र गुडमार्सन आणि संत ब्रिजिटा (सण २३ जुलै) 
ह्यांचे चौथे अपत्य कॅथरीन ही राईसबर्ग येथील कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली होती. वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर जर्मन सरदारपुत्र हगार्त वॉन कुऐर्नन ह्याच्याशी तिचे लग्न झाले. हा सरदारपुत्र नपुसंक होता. त्यामुळे कॅथरीन हिला वैवाहिक जीवनातील सुखाला पारखे व्हावे लागले. मात्र ही देवेच्छा मानून तिने आमरण कौमार्यपद हृदयाशी कवटाळले.
त्यांच्या लग्नानंतर अवघ्या तीन चार वर्षांनीच इ. स. १३४९ साली कॅथरीन विधवा झाली. त्यानंतर आपल्या आईला (संत ब्रिजिटा) तिच्या दानधर्माच्या व परोपकाराच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी कॅथरीन रोम येथे निघून गेली. त्याआधी तिची विधवा आई रोममध्ये विरक्तावस्थेत जीवन जगत होती.
इ. स. १३७२ साली ह्या दोन विधवा पवित्र स्त्रियांनी पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. दोनच वर्षांनी ब्रिजीटा रोम येथे मरण पावली. कॅथरीनने आपल्या आईचा मृतदेह स्वीडन येथे आणला आणि वाडस्टेना येथील ब्रिजेटाईन कॉन्व्हेंटमध्ये तिला पुरण्यात आले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर कॅथरीनने त्या कॉन्व्हेंटची धूरा आपल्या खांदयावर घेतली आणि मोठ्या कौशल्याने व कर्तव्यतत्परतेने ही जबाबदारी पेलली.
त्यानंतर रोममधील प्रदीर्घ अशा भेटीनंतर २४ मार्च १३८१ रोजी कॅथरीनला देवाघरचे बोलावणे आले. तिने लिहिलेल्या "मानवी आत्म्याचा जल्लोष" नामक भक्तीमय पुस्तकाची प्रत दुर्दैवाने काळाच्या ओघात नष्ट झाली.

प्रभू येशू ख्रिस्ताला अनुकूल असे जीवन आपल्याला जगता यावे म्हणून त्यावरील दृढविश्वासाने आपण त्याच्या वचनानुसार जीवन जगण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. ज्या कुटुंबात, ज्या गाव परिवारात व समाजात समंजसपणाने, शांतीने, ऐकाने व देवावरील निष्ठेने प्रेरित होऊन जीवन  जगण्याचा प्रयत्न केला जातो तेथे प्रगती होते आणि देवराज्य प्रस्थापित झाल्याचा  अनुभव येतो. प्रभूला अनुकूल असे जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून  अंतर्मूख बनून त्याला शरण जाऊ या.
✝️   

पहिले वाचन यिर्मया   ७:२३-२८
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही ते हेच राष्ट्र आहे. "

परमेश्वर म्हणतो, "मी त्यांना फक्त एवढेच सांगितले होते की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा देव व तुम्ही माझे लोक व्हाल. मी दाखवलेल्या सन्मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुमचे कल्याण होईल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. माझ्या आज्ञांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांचे हट्टी व दुष्ट मन सांगेल त्याप्रमाणे ते स्वैराचार करू लागले. चांगले होण्यापेक्षा ते अधिकच वाईट बनले. इजिप्तमधून तुमचे पूर्वज निघालेल्या दिवसापासून तो आजवर मी त्यांच्याकडे माझ्या सेवकांना व प्रवक्त्यांना पाठवत गेलो. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उलट तुमच्या वाडवडिलांपेक्षाही अधिकच हेकेखोर व बंडखार असे तुम्ही बनत गेला. तेव्हा तू हा संदेश माझ्या लोकांना सांग, पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मार, पण ते तुला ओ देणार नाहीत. त्यांना तू सांग की, आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही आणि शिक्षा भोगूनही सुधारत नाहीत ते हेच राष्ट्र आहे. निष्ठा लोप पावली आहे; आता तिचा उल्लेखदेखील कोणी करत नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ९५: १-२,६-९
प्रतिसाद :  आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.

१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करूया; 
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. 
उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ. 
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार कर.

२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता 
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची भक्ती करू,
 त्याच्यापुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे..
 आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, 
त्याच्या हातचा कळप आहोत.

३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! "
कलहाप्रमाणे, रानातील परीक्षेच्या दिवशी केल्याप्रमाणे
 तुम्ही आपले मन कठीण करू नका.
 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली; 
मला पारखले, माझी कृती पाहिली.

जयघोष   
बी हा देवाचा शब्द आहे. पेरणारा येशू ख्रिस्त आहे.
 ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन लाभेल.



शुभवर्तमालूक ११:१४-२३

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

“जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे."

येशू एकदा एक भूत काढीत होता, ते मुके होते. तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, “भुताचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो" आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, "आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते, सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल ? कारण मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता; पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूत काढीत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या  शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशू हा देवाचा पुत्र, स्वतःच्या दैवी सामर्थ्याने येशू भुते काढत असता लोक येशूच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करतात. तो सैतानाच्या सहाय्याने भुते काढतो, तो सैतानाचा आहे असा आरोप ते येशूवर करतात. येशूने भूत काढून त्या माणसाला नवजीवन दिले इतकेच नव्हे तर त्याला वाचा देऊन त्याचे जीवन बदलून टाकले. येशूने केलेल्या ह्या महान कृत्याबद्दल त्याचा गौरव करण्याचे सोडून काही लोक त्याची निंदा करू लागले. जणूकाही ते देवाचे अस्तित्व, त्याचे सामर्थ्य मान्य करीत नाहीत. जेव्हा आपण देवाचे अस्तित्व, त्याचे सामर्थ्य नाकारतो तेव्हा आपण सैतानाला साथ देत असतो. देव आपल्या जीवनात वेगवेगळ्या घटनांमार्फत, व्यक्तींमार्फत  आपल्याला त्याचे आपल्या जीवनातील स्थान, अस्तित्व प्रकट करीत असतो. आपण ह्या देवाला, त्याच्या आपल्या जीवनातील कार्याला आपण ओळखतो का? की आजच्या शुभवर्तमानातील लोकांप्रमाणे आपण आपल्या जीवनातील अद्भुत गोष्टींचे श्रेय इतरांना, इतर जागतिक शक्तींना देतो ह्यावर मनन करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासाने तुझ्या आज्ञेनुसार व वचनानुसार प्रेमाचे व शांती  समेटाचे जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन..


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या