Marathi Bible Reading |Wednesday 23rd March 2022 | 3rd Week of Lent |

बुधवार २३  मार्च २०२२ 

(उपवासकाळ ३रा सप्ताह )

“नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ पूर्ण करावयास मी आलो आहे.”

✝️ 


संत तुरिबियुस डी मोग्रोवेजो
• महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१६०६)

  इस्त्राएल एक महान राष्ट्र असून त्यातील सर्वांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे  चालण्यास नियम व विधी त्यांना शिकवले गेले. देवाची प्रजा म्हणून त्यांनी सुज्ञतेने चालावे व देवाचा धावा करुन देवाची सहभागिता अनुभवावी ह्यासाठीच नियमशास्त्र अस्तित्वात आले. मोशेद्वारे दिलेले सर्व नियम जनतेने पाळावे अशी देवाची इच्छा होती.
मनुष्याच्या आंतरबाह्य जीवनाला वळण लावण्याकरिता देवाने दिलेल्या सर्व आज्ञा व नियम ह्यालाच नियमशास्त्र म्हणतात. नियमशास्त्रात  नैतिक, सामाजिक आणि उपासनाविधी संबंधीचे नियम ह्यांचा समावेश आहे.  प्रभू येशूने सर्व नियमशास्त्राचे सार देवप्रीति  व परस्परप्रीतिच्या आज्ञेत स्पष्ट करुन दिले आहे. प्रभू येशू स्वतः देवपुत्र होता.  प्रभू येशूच्या सहवासातच आध्यात्मिक जीवनाची पूर्णता प्राप्त होत असते.  म्हणूनच प्रभू येशूची शिकवण त्याकाळच्या यहुदी शास्त्री-परुश्यांनी जरी  नाकारली तरी त्यातूनच खरी मानवी क्रांती घडली.
प्रभू येशूने त्याच्या क्रुसावरील बलिदानाद्वारे अखिल मानवजातीचे तारण केले. सर्व नियम, आज्ञा व उपासनाविधीचा कळस प्रभू येशूने त्याच्या  पुनरुत्थानात गाठला. प्रभू येशूने खऱ्या अर्थाने नियमशास्त्र पूर्णत्वास नेले आहे.  स्वर्गराज्याची सुवार्ता प्रभू येशूने घोषवित असतानाच ती कृतीद्वारे अमलात  आणली. म्हणूनच सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ प्रभू येशूमध्ये पूर्णत्वास  गेले आहेत.
✝️   

पहिले वाचन अनुवाद  ५०:१०-११
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 
" जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते तुम्ही पाळावेत.”

मोशे लोकांना म्हणाला, “आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे, त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहा, त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही चालावे तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशी लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकाचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप. नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्याची माहिती द्यावी. "
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १४८: १२-१३,१५-१६,१९-२०
प्रतिसाद :  येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर !

१) येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर ! 
सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर !
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. 
तुझ्यामधील नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२.) तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. 
त्याचा शब्द वेगाने धावत येतो. 
तो लोकरीसारखी दाट हिमवृष्टी करतो, 
राखेसारखे दव पसरतो.

३) आपला संदेश त्याने याकोबला आणि 
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले.
 कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही.
 त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.


जयघोष      २ करिंथ ६:२
पहा, आताच समय अनुकूल आहे. 
आजच तारणाचा दिवस आहे.



शुभवर्तमामत्तय  ५:१७-१९

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “जो कोणी ह्या आज्ञा पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हांला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आपले कार्य करीत असताना येशूने अनेक वेळेला यहुदी नियम किंवा नियमशास्त्र ह्याचे उल्लंघन केले होते. शब्बाथ दिवशी येशूचे शिष्य शेतातून कणसे तोडून खातात, येशू शब्बाथ दिवशी रोग्यांना बरे करतो, ज्यांना लोक “अशुद्ध” असे समजत त्यांना येशू जवळ करीत होता. येशूचे हे सर्व वागणे पाहून शास्त्री परुशी येशू सर्व धार्मिक नियम मोडीत आहे असा ओराप करीत असत. येशूच्या अशा वागण्यामुळे गरीब, दुर्लक्षित, पापी लोक येशूच्या जवळ येऊ लागले होते, येशू सर्वांवर प्रेम करीत होता. खरे पाहिले असता येशू लोकांवर प्रेम करून, त्यांना देवाच्या दयेचा अनुभव देऊन सर्व नियम पूर्ण करीत होता. देवाने दिलेल्या आज्ञा आपणांस इतरांशी प्रेमाने, न्यायाने, दयेने वागण्यास मदत करीत असतात. तसेच येशू सांगतो ह्या सर्व आज्ञा व नियम व्यवस्थितपणे इतरांना शिकवा, कारण जर त्या बद्दल करून इतरांना शिकविल्या तर त्याच्या आध्यात्मिक जीवनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलताना मी नीट विचर करून माझे मत मांडतो का ? इतरांबरोबर वागताना मी प्रेमापेक्षा नियमांना अधिक प्राधान्य देतो का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, देवप्रीती आणि परस्पर प्रीतिची आज्ञा पाळून स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला धैर्य व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या