Marathi Bible Reading |Easter Sunday |17th April 2022

 रविवार १७ एप्रिल २०२२ 

प्रभू येशूचे पुनरुत्थान -सोहळा 

“त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक होते. "


तो तेथे नाही, तर उठला आहे.


✝️ 
प्रभू येशूचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाच्या विश्वासाचा मूळ पाया आहे. प्रभू येशूच्या पुनरुत्थानामुळे सर्व विश्वासणाऱ्यांच्या पुनरुत्थानाची आशा निर्माण झाली  आहे. म्हणजेच आपण सर्वजण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे सहभागिदार बनलो आहोत. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणत आहे, 'तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहात.' आपल्या जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीस आपण जेव्हा बाहेर पडतो  तेव्हा आपले जणू पुनरुत्थानच होत असते. आपल्या जीवनातील आजार, संकटे,  अपयश, निराशा, वैफल्यग्रस्तता इत्यादी प्रसंगी येशूच्या दुःखसहन मरण व  पुनरुत्थानावर चिंतन करुन धीराने आणि आशेने त्यावर मात करण्यासाठी प्रभूला  शरण गेले पाहिजे. जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमधून पुनरुत्थानाचा अनुभव  मिळत असतो.
संत पेत्राने आणि संत पौलाने ज्याप्रमाणे आपल्या वाणीद्वारे व आचरणाद्वारे पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष जगाला दिली. ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करीत असताना सुवार्ता प्रचाराचे आवाहन करीत आहे. आपल्या शब्दांद्वारे, कृतीद्वारे, आचरणाद्वारे पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या जीवनातून प्रतिबिंबीत व्हावा म्हणून प्रभू कडे कृपा मागू या.

✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये १०:३४अ.३७-४३
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तो मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. "
पेत्रने बोलण्यास आरंभ केला, "योहानने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व येरुशलेममध्ये जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहो. त्यांनी त्याला क्रुसावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांस अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात, "
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११८:१-२,१६-१७,२२-२३
प्रतिसाद :  प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करू या.

१ परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण 
तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.
 आता इस्राएलने म्हणावे की,
 "त्याची दया सनातन आहे."

२ परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे, 
परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. 
मी मरणार नाही, मी जगेन, 
आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन.

३ बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड 
कोनशिला झाला आहे. 
ही परमेश्वराची करणी आहे,
ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.

दुसरे वाचन : कलस्सै ३:१-४
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"जेथे ख्रिस्त आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

पर्यायी दुसरे वाचन
पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन ५:६-८
 "तुम्ही नवा गोळा व्हावे म्हणून जुने खमीर काढून टाका. "

थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही जसे बेखमीर झाला आहा तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, म्हणून जुने खमीर काढून टाका. कारण ख्रिस्त आपला वल्हांडणाचा यज्ञबली समर्पिण्यास आला आहे. ह्यास्तव जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा आणि खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी आपण सण पाळावा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा यज्ञब ली
समर्पिण्यात आला आहे. म्हणून चला, 
आपण उत्सव करू या.
आलेलुया !


शुभवर्तमान योहान  २०:१-९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २०:१-९
“त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक होते. "

आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले, ह्यास्तव शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही." ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रपेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  सर थॉमस एडिसन ह्यांच्या प्रयोगशाळेला आग लागली आणि क्षणार्धात सर्वकाही बेचिराख झाले. लाखोंनी त्याचे नुकसान झाले. त्याच्या पत्नीने ते पाहून तर हंबरडाच फोडला. तिच्याकडे चमकत्या नेत्रांनी आणि शांत चेहऱ्याने बघत ते म्हणाले, “काही हरकत नाही. इथे या आगीत माझ्या सर्व चुकाही बेचिराख झालेल्या आहेत. उद्यापासून एक नवी सुरूवात करूया.” भूतकाळाकडे पाहून कुरकूर व तक्रार करणाऱ्या माणसांपेक्षा भविष्याकडे पाहून स्वप्ने रंगविणारी माणसे कशी थोर असतात त्याचाच हा पुरावा. अगदी थोड्याच दिवसांत त्यांनी विजेचा बल्ब शोधून काढला आणि ते विश्वविख्यात शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. १. इस्टर जागरणविधी : गुडफ्रायडेचे धीरगंभीर वातावरण हळूहळू बदलत जाते. पवित्र शनिवारची निरव शांतता संध्याकाळच्या संधीप्रकाशात विरून जाते. काळोखात जागरणविधीला सुरूवात होते. विश्वाच्या प्रारंभी होता तसा अंधकार सर्वत्र पसरलेला असतो. 'प्रकाश होवो' असे देवाने
म्हणावे तसा अग्नीतून प्रकाश निर्माण होतो. रात्री अग्निस्तंभाच्या रूपाने परमेश्वर इस्राएली लोकांसह त्यांच्यापुढे चालत राहिला तशी पुनरुत्थानाची मेणबत्ती घेऊन धर्मगुरू वेदीच्या (पवित्र भूमिच्या) दिशेने चालत राहतात. आता सर्वत्र प्रकाश होतो. त्या प्रकाशात पुनरुत्थानाची विजयघोषणा होते. प्रभुशब्दाद्वारे तारणाचा इतिहासपट उलगडला जातो. बाप्तिस्म्याच्या वचनाचे नूतनीकरण करून भाविक ख्रिस्तशरीराविधीत मग्न होतात. पुन्हा एकदा नवी सुरुवात. 
. पुनरुत्थानाची पहाट : अंधारात रडत उभ्या असणाऱ्या मरिया माग्दालियाला येशूचे मृत शरीर हवे होते ते उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी. मात्र त्या पुनरुत्थानाच्या पहाटे तिलाही करायची होती एक नवी सुरूवात प्रेषितांची प्रेषिता म्हणून ही अशी एक नवी सुरुवात होती की जिच्यात अनेकांना त्यांच्या जीवनात एक नवी सुरुवात करायला लावणारी धमक व कुवत होती. 
३. नवी सुरुवात एक प्रक्रिया : एखादी नवी सुरूवात करायची म्हणजे जीवनाला कलाटणी देणारा क्षण मूठीत पकडून ठेवण्याचा आटापिटा करणे नव्हे. फुलपाखराला एका प्रक्रियेतून जावे लागते, अंड्याचे कवच भेदून पिल्लाला त्याबाहेर यावे लागते, कळीचे लिली फुलामध्ये रूपांतर व्हावे लागते तेव्हाच अनुक्रमे सौंदर्य, जीवन व सुगंध सर्वत्र पसरू लागतो. गुडफ्रायडेकडून इस्टरकडे संक्रमण केल्याशिवाय आपण पुनरुत्थानाचे साक्षीदार बनू शकत नाही.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात कोणकोणत्या बाबतीत एक नवी सुरुवात करण्याची गरज आहे ? त्यासाठी आजपासून मी कोणती ठोस प्रक्रिया हाती घेणार आहे ?

प्रार्थना :'मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो' हे पुनरुत्थित प्रभू मला नवजीवनाचे वरदान दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या