Marathi Bible Reading |Easter Week Wednesday |20th April 2022

पुनरुत्थान सप्ताह 

बुधवार  २० एप्रिल २०२२ 

"प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनच्या दृष्टीस पडला आहे!


मॉन्तेपुल्शिआनोची संत आग्नेस  

- कुमारिका (१२६८-१३१७)

इटलीतील तुस्कानी येथल्या एका सरदारपुत्राच्या घराण्यात आग्नेस हिचा जन्म झाला. आध्यात्मिक बाबतीत ती बालपणापासूनच चारचौघींमध्ये उठून दिसे. वयाच्या केवळ ९व्या वर्षीच ती फ्रान्सिस्कन सिस्टरांच्या कडक शिस्तीच्या संघामध्ये दाखल झाली. प्रोसेनो येथल्या नवीन डॉमिनिकन कॉन्व्हेंटची प्रमुख अधिकारी म्हणून तिची निवड ती फक्त १५ वर्षाची असतानाच झालेली होती. ह्यावरून तिच्या धार्मिक जीवनाच्या उंचीची कल्पना येईल. ह्याच कॉन्व्हेंटच्या पायाभरणीत पोप निकोलस पाचवे ह्यांच्या आज्ञेवरून तिने दोन वर्षे अथक परिश्रम घेतले होते.
तिचे हे नेत्रदीपक यश पाहून मॉन्टेपुल्शियानोच्या स्थानिक रहिवाश्यांनी आपल्याही गावात डॉमनिकन संघाचे एखादे कॉन्व्हेंट सुरू करावे म्हणून तिच्याकडे तगादा लावला. त्यांच्या प्रेमाखातर व आग्रहास्तव इ.स १२९८ साली तिने एक कॉन्व्हेंट तिथे सुरू केले व तिच्या मृत्यूपर्यंत १९ वर्षे ह्या कॉन्व्हेंटमधून परमेश्वराचे प्रेषितकार्य सुरू ठेवले.
संत आग्रेस हिला अनेक रहस्यमय वरदाने लाभलेली होती. तिला अद्भुत चमत्कारांचेही दान प्राप्त झालेले होते. प्रार्थना, शुद्धता याव्यतिरिक्त देवावरील पूर्ण भरवसा हा तिच्यामधील बालसद्दश सद्गुण होता. ह्याच श्रद्धेपायी तिच्याद्वारे अनेक प्रार्थनांची उत्तरे मिळत गेली.


 प्रभू येशूचा वधस्तंभावरील मृत्यु पाहून गोंधळलेले सर्व शिष्य भीती  ग्रस्त झालेले होते. जो तो आपापल्या जीवनातील येशू बरोबरच्या सहवासाची  स्मृति उजाळत असेल, आजच्या शुभवर्तमानातील अम्माऊसच्या वाटेवरील घटना खूप चिंतनात्मक आहे. 

आपण आपल्या जीवनात नैराश्य व अपयश आल्यावर गोंधळून  जातो. मात्र अशावेळी अदृश्य रुपात प्रभू येशू आपल्या सोबत असतो ह्याची जाणीव आपण ठेवायला हवी. आपण अशावेळी आपल्या देवावरील श्रद्धेचे डोळे उघडे ठेवू या आणि प्रभूच्या कृपेचा प्रवाह आपल्या जीवनात स्वीकारु या.

✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ३:१-१०
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 "माझ्याजवळ जे आहे ते मी तुला देतो, नाझरेथकर येशूच्या नावाने चालू लाग."
 पेत्र व योहान तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आम्हांकडे पाहा." तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्यांने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, "माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो, नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग" आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ "आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत, उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या • बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १०५:१-४,६-९
प्रतिसाद :   प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते आलेलुया !

१) प्रभूला धन्यवाद द्या,
 त्याच्या नावाचा धावा करा. 
राष्ट्रांमध्ये त्याचे कार्य जाहीर करा !
 त्याचे गीत गा, त्याचे कीर्तन करा, 
त्याच्या सगळ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करा!

२ ) त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा,
 प्रभूला शरण जाऊ पहाणारांचे मन आनंदित होवो. 
प्रभूचा व त्याच्या सामर्थ्याचा शोध करा,
 त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा.

३)त्याचा सेवक आब्राहाम याचे वंशजहो, 
त्याने निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो प्रभूच आमचा देव,
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.

४) तो आपला करार आठवतो, 
हजारो पिढ्यांसाठी दिलेले अभिवचन पाळतो.
 हा करार त्याने आब्राहामशी केला,
तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया. 
आलेलुया !


शुभवर्तमान लूक   २४:१३-३५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २४:१३-३५
“त्याने भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्याला ओळखले."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शिष्यगणातील दोघेजण येरुशलेमपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. त्यांनी येशूला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, "तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहा त्या कोणत्या ?" तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे येरुशलेममध्ये घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय ?" तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी ?" त्यांनी त्याला म्हटले, "नाझरेथकर येशूविषयीच्या." तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहान्तशिक्षेसाठी पकडून क्रुसावर खिळले. परंतु इस्राएलची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला 
आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरीकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही." मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय ?" मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणांविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला.
मग ज्या गावात ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे." तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. मग तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्याआत उकळी येत नव्हती काय ?" मग त्याच घटकेला ते उठून येरुशलेममध्ये माघारे गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनच्या दृष्टीस पडला आहे!" मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : 'प्रभू येशूने भाकर घेऊन आशीर्वाद दिला, ती मोडून दोघा शिष्यांना दिली' या कृतीवरून शिष्यांना येशूची ओळख पटली. तीन वर्षे येशूच्या सहवासात असताना अनेकदा त्यांनी ही कृती पाहिली होती. आम्ही देखील पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार साजरा होताना हीच कृती धर्मगुरुद्वारे घडत असलेली पाहातो. तेव्हा प्रभू येशू प्रत्यक्ष पुन्हा जिवंत उठलेला असल्याचे दर्शन आम्हाला होत असते. अम्माऊसचा प्रसंग म्हणजे पवित्र मिस्साबलिदान. प्रभूने शास्त्रातील घटना दोन शिष्यांना कथन केल्या. त्याचे डोळे उघडले. त्यांनी भाकर सेवन केली व साक्षात प्रभूचे दर्शन घडले. अम्माऊसच्या वाटेवर अनोखा वाटसरू हा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे याची जाणीव होताच शिष्यांचे दुःखी अंतःकरण आनंदाने भरले जाते. ही वार्ता ऐकून आम्ही देखील आनंदी होऊ या.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा स्पर्श जाणण्यास व तुला ओळखण्यास  आमचे अंतर्चक्षू उघड, आमेन. 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या