Marathi Bible Reading |Easter Week Tuesday |19th April 2022

पुनरुत्थान सप्ताह 

मंगळवार १९ एप्रिल २०२२ 

जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे

 मी वर जातो."


✝️ 
संत लिओ नववे
पोप, वर्तनसाक्षी (१००२-१०५४)

 मरियेने प्रभू येशूला सर्वस्वी आपल्या जीवनाचा  स्वामी म्हणून स्वीकारले होते. तिने जणू ख्रिस्ताला परिधान केले होते, म्हणूनच  कबरेजवळ प्रभूचे दर्शन तिला लाभले आणि प्रभूच्या पुनरुत्थानाची साक्ष देण्यास ती त्वरेने शिष्यापर्यंत पोहोचली. मरियेप्रमाणे आपल्या सर्वांना पुनरूत्थित प्रभूच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. प्रभू येशूच्या नावाने आपल्या सर्वांचा बाप्तिमा झाला आहे. पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सर्वांना अभिषिक्त करण्यात आले आहे. आपल्याला प्राप्त पवित्र दानाबद्दल आपण  देवाला धन्यवाद देऊ या. 
पवित्र आत्म्याठायी प्रभूला शरण जाऊ या. आपले जीवन प्रभूठायी  समर्पित करुन प्रभूची साक्ष इतरांना देण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा मागू या. 
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये २:३६-४०
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या."
पेत्र यहुद्यांना म्हणाला, "ह्यास्तव इस्राएलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे."
हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, "बंधुजनहो, आम्ही काय करावे?" पेत्र त्यांना म्हणाला, "पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलांबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना दिले आहे." आणखी त्याने दुसन्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले, "ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या." तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३३:४-५,१८-२०,२२
प्रतिसाद :   प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.

१) प्रभूचा शब्द सत्य आहे त्याचे सारे कार्य टिकाऊ असते.
त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत.
प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. 

२) प्रभूचे भय बाळगणारे, त्याच्या प्रेमाचे भुकेले
अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते. 
मृत्यूच्या दाढेतून तो त्यांचे प्राण वाचवतो.
दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.

३)आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे.
 तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल आहे.
 तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे,
 हे प्रभो, कारण आम्ही तुझ्याच आशेवर आहोत.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.
आलेलुया !


शुभवर्तमान योहान  २०:११-१८
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“मी प्रभूला पाहिले आहे व त्याने मला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत."

मरिया बाहेर कबरीजवळ रडत उभी राहिली होती रडता रडता तिने ओणवून कबरीत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, "त्यांनी माझ्या प्रभूला नेले व कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून." असे म्हणून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन." येशूने तिला म्हटले, “मरिये,” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!" (म्हणजे गुरुजी). येशूने तिला म्हटले, "मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो." मरिया मग्दालिया गेली आणि “आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : ‘द्या शुभवार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला असे प्रभू शिष्या वदला!’ मरीया
माग्दालेना हिने पुनरुत्थानाची प्रथम साक्ष दिली. ती या शुभवार्तेची पहिली शिष्या बनली. हे सर्व घडून आले कारण तिचे प्रभु येशूवर अपार प्रेम होते. ती प्रभूमध्ये इतकी विलीन झाली होती की त्याचा मृतदेह ती एकटी नेऊ शकणार नाही हे देखील ती विसरली होती. प्रभू येशूवरील तिचे प्रेम व निष्ठा यामुळे तिला काहीच अशक्य वाटले नाही. आज आम्हाला देखील पुनरुत्थित ख्रिस्त आदेश देत आहे. धैर्याने आम्ही शुभवार्ता सांगावी व या शुभसंदेशाचे साक्षी बनावे म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना :हे पवित्र आत्म्या ये आणि तुझ्या प्रेमळ दानांचा आम्हांवर वर्षाव कर व  आम्हांला प्रेरण दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या