Marathi Bible Reading |Easter Week Friday |22nd April 2022

पुनरुत्थान सप्ताह 

शुक्रवार २२ एप्रिल २०२२ 

 “मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हांला भरपूर सापडेल.

संत सौतेर•

- परमगुरू, रक्तसाक्षी (१७५)


 रात्रभर कष्ट करुन पेत्र व त्याच्या सहकाऱ्यांना काहींच मासे मिळाले नव्हते. निराश झालेल्या शिष्यांना येशूने मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाकण्यास सांगितले व  मोठे मासे जाळ्याला लागले. प्रभू येशूला तोपर्यंत शिष्यांनी ओळखले  नव्हते कारण प्रभू येशू किनाऱ्यावर उभा होता. मात्र पेत्राने प्रभूला ओळखले व त्याच्या  नावाचा धावा केला. प्रभू येशूच्या वाचनावर शिष्यांनी विश्वास ठेवला व जाळे उजव्या बाजूस टाकले. आपल्या जीवनात देखिल आपण अपयशी, निराश व कष्टी झालो  असताना प्रभू येशूची वाणी ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अति पवित्र संस्कारातील भाकरीत व सर्व पवित्र संस्काराद्वारे प्रभू येशू आपल्याला कृपादान देत असतो. 
प्रभू येशूच्या वचनात, वाणीत, नावात आणि कृपासंस्कारात सामर्थ्य व सार्वकालिक जीवन आहे. आज सुद्धा प्रभू येशूचे दर्शन आपल्याला होऊ शकते.  आपले जीवन सुखकर व सुंदर बनू शकते.

 
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ४:१-१२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
   "तारण दुसऱ्या कोणाकडून नाही."
पेत्र आणि योहान लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांमधून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली आणि संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.
दुसऱ्या दिवशी यहुद्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री, हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके येरुशलेममध्ये एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, "तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले ?" तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, "अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्या विषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२.४,२२-२४, २५-२७अ
प्रतिसाद :   बाधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.

१) प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे.
 त्याचे वात्सल्य अनंत आहे. 
आता इस्राएलच्या घराण्याने म्हणावे, 
“त्याचे वात्सल्य अनंत आहे."
प्रभूला भिणाऱ्यांनी म्हणावे,
"त्याचे वात्सल्य अनंत आहे."

२) बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. 
ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
 प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.
प्रभो, आमची भरभराट कर.

३) प्रभो, आम्हाला वाचव. 
प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. 
प्रभू सदनातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. 
प्रभू परमेश्वर आमचा प्रकाश आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया. 
आलेलुया !


शुभवर्तमान योहान २१:१-१४
वाचक :योहानालिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २१:१-१४
“येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली."

तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघेजण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास जातो," ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो." तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही." त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हांला भरपूर सापडेल." म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्रला म्हणाला, “अरे, हा तर प्रभू आहे!" हे ऐकून शिमोन पेत्रने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते.
मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा." तेव्हा शिमोन पेत्रने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले, तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहारी करा." तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून “आपण कोण आहा?" हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : मरणातून जिवंत उठल्यावर प्रभू येशू शिष्यांना निरनिराळ्या वेळी व ठिकाणी भेटला. आजच्या शुभवर्तमानात वर्णन केलेले हे प्रभूचे दर्शन तिबिर्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घडले. मासेमारीत तरबेज असूनही मासळी पकडण्यात अपयशी झालेल्या शिष्यांना येशू सहाय्य करीत आहे. त्याच्या मार्गदर्शनानुसार जाळी टाकल्यावर त्यांना भरपूर यश मिळते. शुभवर्तमान घोषीत करताना प्रभू येशू आपल्या सोबत आहे याची आम्ही सतत जाणीव ठेवावी. स्वतःच्या हिमतीवर नव्हे तर प्रभू येशूच्या सामर्थ्याने आम्हा प्रेषितकार्यात यश आलेला हा आत्मविश्वास बाळगू या.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या सत्याचे दर्शन आम्हाला घडव व तुझ्या पुनरुत्थानाचे  साक्षीदार बनण्यास प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या