पुनरुत्थान सप्ताह
शनिवार २३ एप्रिल २०२२
“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
संत जॉर्ज
रक्तसाक्षी (४ थे शतक)
ह्या सुप्रसिद्ध संताविषयी आपल्याला केवळ इतकेच ठाऊक आहे की, डायोक्लेशियन ह्यांच्या छळवादी कारकीर्दीमध्ये पॅलेस्टाईनमधल्या डायस्पोलिस ( लिडीया) येथे त्यांना रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. गालील समुद्राच्या पूर्वेकडे असलेल्या त्राकोनिरीस जिल्ह्यात त्याची भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे. इ. स. ३६७ सालचा एक शिलालेख त्यांच्या रक्तसाक्षीत्वाचा मुख्य पुरावा मानला जातो. त्यात लिडियाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे.
सहाव्या शतकाच्या प्रारंभीस बरेच यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी जात असत. त्याच ठिकाणी इ. स. १८६८ साली त्यांची खाच पुन्हा एकदा नव्याने उकरून काढण्यात आली. ग्रीक लोकांनी त्यांना सैनिकांचा आश्रयदाता म्हणून गौरविले आहे. त्या ठिकाणी तो एक महान रक्तसाक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.
श्चात्य ख्रिस्तसभेत संत जॉर्ज हे सेनापती हुतात्मा म्हणून सर्वपरिचित आहेत. सेनापतींचा आदर्श आणि स्त्रियांचा कैवारी म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आलेले आहे. इ. स. ४९५ साली पोप जेलाशियस हे संत जॉर्जची महत्कृत्ये ह्यांचा उल्लेख करताना आढळतात. परंतु ही त्यांची महत्कृत्ये केवळ देवालाच ठाऊक असे त्यांचे म्हणणे होते. अजगराला ठार मारणाऱ्या संत जॉर्जचे चित्र अगदी अलिकडचे आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की अगदी प्रारंभापासून ख्रिस्तसभेत मानाचे स्थान मिळविलेल्या रक्तसाक्षी संतांमध्ये संत स्तेफानच्या पाठोपाठ संत जॉर्ज ह्यांचे नाव घेतले जाते.
ख्रिस्तसभेने गौरविलेल्या १४ पवित्र मदतनीसांच्या यादीमध्ये संत जॉर्जचा समावेश केला जातो. तो इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल ह्या देशांचा आणि व्हेनिस व जिन्हेवा ह्या शहरांचा आश्रयदाता संत मानला जातो. पोप बेनेडिक्ट १४ वे ह्यांनीच त्याला इंग्लंडचा आश्रयदाता हा किताब बहाल केलेला होता. स्काऊट्सची मुले, शेतकरी ह्यांचाही तो आश्रयदाता होय. तापाने फणफणणाऱ्या लोकांसाठी संत जॉर्जचा धावा केला जातो.
ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सर्वांसाठी तारणदाता व जीवनदाता आहे ह्यावर आपली श्रद्धा आहे. प्रभू येशूने जाहीर केलेली सुवार्ता व प्रेषितांनी घोषविलेली सुवार्ता ह्यांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आपल्याला मिळालेला ख्रिस्त आपण इतरांना द्यायचा आहे. प्रभू येशू त्यासाठी आपल्याला आज बोलवित आहे.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ४:१३-२१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही."
पेत्रचे व योहानचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून याजक, वडीलजन व शास्त्री आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, “ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखरच अलौकिक चमत्कार घडला आहे, हे सर्व येरुशलेमकरांना कळून चुकले आहे, तेव्हा आपणाला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये." मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करीत होते.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११८:१,१४-२१
प्रतिसाद : प्रभो, तू माझे ऐकलेस.
१) प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे.
त्याचे वात्सल्य अनंत आहे.
प्रभू माझा सामर्थ्यदाता आणि गीत आहे,
तो माझा उद्धारकर्ता झाला आहे.
नीतिमानांच्या तंबूतून आनंदाचा व
विजयाचा जयघोष होत आहे.
२) प्रभूचा उजवा हात उंचावला आहे.
प्रभूने उजव्या हाताने महान पराक्रम केला आहे.
मी मरणार नाही, मी जगेन आणि
परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन.
प्रभूने मला जबर शिक्षा केली आहे,
तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.
३) माझ्याकरिता नीतिमंदिराची दारे उघडा.
मग आत जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन.
प्रभूकडे जायचे हे दार आहे.
यातून सज्जन प्रवेश करील.
प्रभू, तू माझे ऐकलेस, माझा उद्धारकर्ता झालास
म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.
आलेलुया !
शुभवर्तमान मार्क १६:९-१५
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सर्व जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा."
आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरिया हिला दर्शन दिले, हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघेजण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी माघारी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही.
नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा ह्याविषयी त्यांना दोष लावला. मग त्याने त्यांना सांगितले की, "सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : - पेत्र व योहान हे सतत येशूच्या सहवासात होते. म्हणूनच त्यांना आजारी व अपंग माणसांना बरे करण्याचे सामर्थ मिळाले होते. आपल्याद्वारे पुनरुत्थित येशू कार्य करीत आहे. याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणूनच त्यांनी या पहिल्या चमत्काराचे श्रेय स्वतःकडे घेण्याचे नाकारले. जे काही अद्भूत घडत आहे ते, जिवंत उठलेल्या प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने होत आहे हे सत्य त्यांनी ठामपणे सांगितले. आम्हाला ही येशूचा प्रभावी सहवास हवा आहे. प्रभू वचनावर मनन-चिंतन करून हा सहवास घेऊ या.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या