Marathi Bible Reading |Second Sunday of the Easter | Divine Mercy Sunday 24th April 2022

पुनरुत्थान २रा रविवार 

२४ एप्रिल २०२२ 

दैवी दयेचा रविवार

 जसे पित्याने मला पाठविले तसे मी तुम्हांस पाठवितो.”


 दैवी दयेचा रविवार व सण साजरा करीत आहे

ख्रिस्तसभा आज दैवी दयेचा रविवार व सण साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या अति पवित्र हृदयातून अखंडपणे दयेचा व कृपेचा झरा वाहत असतो.  संत फावस्तीनाला दिलेल्या दर्शनाद्वारे प्रभू येशूने अखिल पापी जनांसाठी दयेचा महासागर मोकळा केला आहे. प्रभू येशूची दया आणि करुणा सर्वांसाठी उपलब्ध आहे. प्रभू येशूवर पूर्ण श्रद्धा ठेवून पश्चात्तापी अंतःकरणाने भक्ती करणाऱ्यांसाठी कृपेचा झरा वाहत आहे. विशेषतः पोप फ्रान्सिस ह्यांनी हे वर्ष दैवी दयेचे महोत्सवी वर्ष म्हणून घोषित केले आहे. प्रभू येशू जो दयाळू, कृपाळू आणि करुणेचा सागर आहे, त्याचा अनुभव घेऊन आपण सुद्धा आपल्या आचरणाद्वारे  इतरांसाठी दयाळू बनावे म्हणून, ख्रिस्तसभा आवाहन करीत आहे.
परमेश्वर पित्याने प्रभू येशूला ह्या जगात पाठविले. प्रभू येशूने आपल्या दैवी करुणेने सर्वांवर प्रेम व माया केली. प्रभू येशूची दया जशी आपण अनुभवली ती आपल्या कृतीद्वारे इतरांना मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील बनले पाहिजे. प्रभू  येशू आज सर्वांना आवाहन करुन त्याच्या दैवी दयेचे सहभागिदार बनण्यास पाचारण करीत आहे.

✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 "पुष्कळ श्रद्धावंत प्रभूला मिळत गेले."

प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत गोष्टी घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानीत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवीत; कारण पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी येरुशलेमच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकऱ्यांना आणि अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:२ - ४, २२-२४,२५-२७
प्रतिसाद :  परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.

१) इस्राएलने म्हणावे, “त्याची दया सनातन आहे."
अहरोनच्या घराण्याने म्हणावे, 
“त्याची दया सनातन आहे." 
देवाला भिणाऱ्यांनी म्हणावे,
 “त्याची दया सनातन आहे."

२) बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड 
कोनशिला झाला आहे, ही परमेश्वराची करणी आहे,
 ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. 
प्रभूचा हा दिवस आहे, 
ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.

३) हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की,
 आमचा उद्धार कर, आम्हांला संपदा दे. 
परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद होवो. 
परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. 
प्रभू देव आहे, त्याने आम्हांला प्रकाश दिला आहे.

दुसरे वाचन प्रकटी १:९-१३.१७-१९

वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “मी मेलो होतो तरी पाहा मी जिवंत आहे."

मी योहान, तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य आणि धीर ह्यांचा तुम्हांबरोबर भागीदार आहे. मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्याखातर पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती अशी : “तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेल्फिया आणि लावदिकीया येथील सात मंडळींकडे पाठव.
माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे, मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. ह्यास्तव जे तू पाहिले, जे आहे "तू आणि ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
येशूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले म्हणून श्रद्धा ठेवलीस. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य." 
आलेलुया !


शुभवर्तमान योहान २०:१९-३१
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"आठ दिवसांनंतर येशू आला."
आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत."
येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, "आम्ही प्रभूला पाहिले." पण त्याने म्हटले, "त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही."
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." नंतर त्याने थोमाला म्हटले, "तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस." थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!" येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य!"
ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही लिहिली आहेत.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : पुनरुत्थानकाळातील दुसरा रविवार हा दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची सर्व वाचने पुनरुत्थित प्रभूची प्रभावी साक्ष देणाऱ्या श्रद्धावंताविषयी आपल्याला विचार करायला लावतात. अशा श्रद्धावंतांच्या जीवनाची एकूण चार गुणवैशिष्ट्ये आहेत : 
१. ख्रिस्ती श्रद्धावंत हा पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याने परिपूर्ण असतो : आजच्या पहिल्या वाचनात प्रेषित अद्भुते करताना आणि लोकांना रोगमुक्त करताना आढळतात. त्यांचे जीवन व कार्य ही पुनरुस्थित प्रभूच्या सामर्थ्याची प्रभावी साक्ष बनताना दिसते. 
२. ख्रिस्ती श्रद्धावंताला आपल्या मर्यादा व दुर्बळता ह्यांची जाणीव असते आजच्या दुसऱ्या वाचनात पात्म बेटावर आपल्या श्रद्धावंत ख्रिस्ती लोकांसह तुरूंगवास भोगत असलेल्या योहानाला झालेला दृष्टांन्त वाचायला मिळतो. एका रविवारच्या दिवशी (प्रभूच्या दिवशी) त्याला वैभवशाली येशूचे दर्शन घडते. त्याला ताबडतोब आपल्या मर्यादाची, नश्वरतेची जाणीव होते (मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो) परंतु पुनरुत्थित येशू मात्र त्याला जे दिसते ते सर्व लिहून काढण्याची (साक्षीदार होण्याची) आज्ञा देतो. 
३. ख्रिस्ती श्रद्धावंत आनंद व शांतीचा पाईक असतो : आजच्या शुभवर्तमानात पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन घडताच शिष्यांना आनंद होतो. तोपर्यंत त्यांचे चेहरे चिंताक्रान्त व भीतीने ग्रासलेले होते. त्यांच्या मनात शंकाकुशंका व गोंधळ नाहीसा होऊन त्या जागी ते शांती अनुभवू लागतात. 
४. ख्रिस्ती श्रद्धावंत येशूचे स्वामीत्व / प्रभुत्व मान्य करतो : थॉमस हा चिकित्सक वृत्तीचा होता. येशूला स्पर्श केल्याशिवाय आपण विश्वास ठेवणारच नाही असा आग्रह त्याने धरला. मात्र एकदा का त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन झाले की, तो येशूचे स्वामीत्व / प्रभुत्व मान्य करीत आपल्या श्रद्धेची कबुली देत म्हणतो, “माझा प्रभूव माझा देव". 
आत्मपरीक्षण : निष्ठावंत ख्रिस्ती श्रद्धावंत या नात्याने वरीलपैकी कोणती गुणवैशिष्ट्ये माझ्या जीवनात व कुटुंबात आढळतात? पुनरुत्थित 
प्रभूचा प्रभावी साक्षी होण्यास मला कुठे कुठे वाव आहे ? त्यात कोणकोणते अडथळे आहेत ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, आमची तुझ्यावर श्रद्धा आहे. आम्हावर व अखिल जगावर  दया कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या