पुनरुत्थान २रा सप्ताह
मंगळवार २६ एप्रिल २०२२
मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
संत क्लेटस
- पोप, रक्तसाक्षी (... ९१)
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू निकदेमाबरोबर देवावरील विश्वास आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य ह्याबद्दल संभाषण करीत आहे. विशेषतः प्रभू येशू निकदेमला विश्वासात दृढराहण्याचा सल्ला देत असताना पवित्र आत्म्याठायी नवजीवनाचे रहस्य समजावून सांगत आहे. प्रभू म्हणतो, 'जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.' विश्वासात आपण सर्वजण देवासमोर शरणागत होऊन ऐक्यात राहण्याचा प्रयत्न करु या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ४:३२-३७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“एकदिलाचा व एकजिवाचा."
तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा आणि एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतः चे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत, मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.
कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता त्याला प्रेषित बर्णबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९३:१ - २,५
प्रतिसाद : प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे.
१ प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे.
त्याने पराक्रमी वस्त्र धारण केले आहे.
आपली कंबर कसली आहे.
२ पृथ्वी स्थिर आहे, ती ढळविता येत नाही.
पुरातन काळापासून तुझे सिंहासन स्थिर आहे.
तू अनादिसिद्ध आहेस.
३ तुझे निर्बंध शाश्वत टिकणारे आहेत.
हे प्रभू, पावित्र्य हेच तुझ्या मंदिराचे
चिरंतन सौंदर्य आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ३:७-१५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. "
येशू निकदेमला म्हणाला, “तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, आम्हांस ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानीत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांलासांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल ? स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : -आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, पूर्वीचा ख्रिस्ती समाज किती एकजुटीने राहायचा. सर्वांना समान वागणूक उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, असा काहीच भेदभाव नव्हता. कोणालाही जास्त मालमत्तेची, संपत्तीची भूक नव्हती, हाव नव्हती. जे काही आपल्यकडे असेल ते आनंदाने प्रेषितांच्या चरणी ठेवीत असत. आजचा ख्रिस्ती समाज खूप वेगळा आहे. आज आपल्या काही जणांकडे सर्वकाही आहे तर काहींना दोन वेळचे जेवण पण नाही मग अश्यावेळी ख्रिस्ती एक समाज, एक कुटुंब म्हणून मी माझ्या समाजातील इतर भाऊ बहिणींना काही मदत करू शकतो का ? संत मदर तेरेजा म्हणाल्या 'शंभर माणसांना मी जेवण देऊ शकणार नाही. परंतु एका माणसासाठी मी नक्कीच जेवणाची व्यवस्था करू शकते. भोवतालच्या गरिबांना आपलेच भाऊबंद मानण्याचा मनाचा मोठेपणा हवा आहे. 'करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी' हे ख्रिस्ताचे वचन आम्हाला सतत प्रेरणा देत आहे. समाजातील जीवघेणी विषमता दूर करण्यासाठी गोरगरीबांना सन्मानाने जगता येईल असा समाज निर्माण करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. एकजीवाचा व एक दिलाचा ख्रिस्तीसमुदाय निर्माण करण्याचा निर्धार करू या.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, शांतीने, प्रेमाने व ऐक्याने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या