पुनरुत्थान २रा सप्ताह
बुधवार २७ एप्रिल २०२२
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला,
संत झिटा
“मोलकरीण जर उद्योगी नसेल तर ती काय कामाची? कामाविना पावित्र्य हे केवळ ढोंग आणि पोकळ डामडौल आहे." - संत झिटा
सत्य हे प्रकाशात येत असते, ते जास्त काळ अंधारात राहू शकत नाही. प्रभूवरील विश्वासात आणि त्याच्या प्रेमात एकरुप झालेल्या प्रेषितांनी सर्वांना ख्रिस्ताची साक्ष दिली.
प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील प्रकटणे म्हणजे परमेश्वर पित्याच्या मानवावरील प्रेमाचा दिव्य साक्षात्कार आहे. प्रभू येशू स्वतःच प्रेम, सत्य आणि प्रकाश आहे. प्रकाश हे पवित्रतेचे, आनंदाचे आणि शुद्धतेचे प्रतिक आहे. प्रकाशाच्या विरुद्ध अंधार आहे. अंधाराची आवड असलेली माणसे सार्वकालिक नाशाला कारणीभूत होतात. परंतु सत्याचा आणि प्रकाशाचा मार्ग अवलंबिलेल्या माणसांना परमेश्वराच्या प्रीतिचा व कृपेचा अनुभव प्राप्त होत असतो. प्रेषितांप्रमाणे आपल्या सर्वांना प्रकाशाची आणि परमेश्वराचा सुवार्ताची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. आपण प्रभूच्या| सत्यात स्वतःला समर्पित करु या आणि श्रद्धेने त्याच्या प्रीतित वाढण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ५:१७-२६
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत. "
प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर सर्व सदूकपंथी मत्सरग्रस्त होऊन उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले, परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा संदेश सर्व लोकांना सांगा." हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले.
इकडे, प्रमुख याजक आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा आणि इस्राएल लोकांचे संबंध वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणायला बंदिशाळेकडे पाठविले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, “बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही." हे वर्तमान ऐकून ह्याचा परिणाम काय होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार आणि मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांस जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:१ - ९
प्रतिसाद : मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.
१) प्रभूचे धन्यवाद मी सदासर्वदा गाईन,
त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल.
प्रभूविषयीचाच अभिमान माझ्या मनी वसेल.
हे ऐकून दीनांना आनंद होईल.
२) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा.
त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊया.
मी प्रभूला शरण गेलो, त्याने माझे ऐकले.
माझी सगळी भीती घालवली.
३) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते.
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही.
मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला
आणि माझी संकटे हरण केली.
४) प्रभूचे भय बाळगणाऱ्यांभोवती
त्याचा दूत ठाण मांडून बसतो आणि
त्यांचे संरक्षण करतो.
प्रभू किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पाहा.
त्याच्यावर भाव ठेवणारा माणूस धन्य!
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ३:१६-१५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून देवाने आपला पुत्र जगात पाठवला.
येशूने निकदेमला म्हटले, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रंसग येत नाही; जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : -प्रेषित योहानाच्या शुभवर्तमानात एक सर्वांगसुंदर ओवी ३:१६ असून त्यामध्ये संपूर्ण बायबलचा सारांश आढळतो. 'देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या उद्धारासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.' या शब्दातून स्पष्ट होतो की, देवपित्याचे आम्हा पापी माणसांवर अपार प्रेम आहे. आमच्या पापरूपी अंधारातून मार्ग काढण्यासाठी त्याने ख्रिस्ताच्या रूपाने प्रकाशाची बरसात केली. या ख्रिस्तरूपी प्रकाशात आम्ही सदैव राहावे. त्याद्वारे आमचे जीवन सन्मार्गाने चालत राहावे हीच प्रभूचरणी प्रार्थना.
प्रार्थना :-प्रभू येशू, तुझे सत्यवचन आचरण्यास व तुझ्या प्रकाशात मार्गक्रमण करण्यास आम्हांला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या