पुनरुत्थान २रा सप्ताह
गुरुवार २८ एप्रिल २०२२
“जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; ,
- वर्तनसाक्षी (१६७३-१७१६)
फ्रान्समधल्या ब्रिटानी येथे जन्मलेल्या लुईस मॉन्टफोर्ट ह्याने फ्रान्सच्या ईशान्येकडील भागात ख्रिस्ताचे प्रेषितकार्य पसरविण्याची कामगिरी पार पाडली. तो स्वतः खूप दारिद्र्यात जीवन जगत असे. मात्र पवित्र मरिया आणि पवित्र जपमाळ ह्या विषयावरील साध्या सोप्या भाषेतील त्यांची प्रवचने लोकांना खूप खूप आवडत.
संध्याकाळची वेळ झाली की ते आपल्या हातात बायबल आणि पवित्र जपमाळ घेऊन धावत जात. रोझरीच्या पंधरा रहस्यांपैकी एखादे रहस्य लोकांना समजावून सांगत. त्या रहस्यावर आधारित पवित्र शास्त्रवाचन करीत. नंतर “आमच्या יי स्वर्गीय बापा” व “नमो कृपापूर्ण ” ह्या प्रार्थना म्हणत. अशा प्रकारे पंधरा दिवस एकाच गावात जाऊन प्रभूच्या जन्म, दुःखसहन, मरण पुनरुत्थान आणि गौरव इत्यादीवर प्रबोधन करीत. 'चिंतन न करता केवळ ओठाने पुटपुटलेली रोझरीची प्रार्थना ही आत्मा नसलेल्या देहासारखी कशी अचेतन असते' ते त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना समजावून सांगितले. त्यांच्या ह्या उपदेशामुळे जॅन्सनिसम ह्या पाखंड- वादापासून बरेच लोक दूर राहिले आणि ते अधिक प्रभावी व श्रद्धावान ख्रिस्ती जीवन जगू लागले.
त्यांनी दिलेले मिशन व तपसाधना समाप्त करताना अनेक पश्चात्तापी पापी देवाला शरण येत. मग लुईस त्यांना पवित्र देवमाता मरियेच्या संरक्षणाखाली सोपवित असे. अनेक वेळा तिथे रोझरी संघ उदयास आले.
उपदेशाव्यतिरिक्त लुईस ह्याने बरेच धार्मिक व आध्यात्मिक लेखनही केले. “धन्य कुमारी मरियेची सार्थ भक्ती” या विषयावर त्यांनी केलेले लिखाण आजही आपल्यामध्ये उपलब्ध आहे व ते मरियाभक्तांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. सिस्टर्स ऑफ डिव्हाईन विज्डम आणि कंपनी ऑफ मेरी किंवा मॉन्टफोर्ट फादर्स ह्या संस्था त्यांनीच स्थापन केल्या.
चिंतन : संतांची जडणघडण आणि प्रशिक्षण करण्याचे कार्य परमेश्वराने पवित्र मरियेवर सोपविलेले आहे. • संत लुईस मॉन्टफोर्ट
प्रेषितांनी आणि ख्रिस्तसभेतील संतांनी प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याची साक्ष जगाला दिली. साक्ष देण्याची आणि सुवार्ता पसरविण्याची हीच जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. प्रभू येशूला आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारू | या आणि धैर्याने त्याचे खरे अनुयायी बनण्यासाठी कृपा मागू या..
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ५:२७-३३
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मापण साक्षी आहे."
जेव्हा सरदाराने आणि वडीलमंडळाने प्रेषितांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांस निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हांवर आणू पाहत आहा." परंतु पेत्रने आणि इतर प्रेषितांनी उत्तर केले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहीजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे."
हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांस जिवे मारण्याचा विचार करू लागले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:२, ९,१७-२०
प्रतिसाद : मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.
१) प्रभूचे धन्यवाद मी सदासर्वदा गाईन,
त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल.
प्रभू किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पाहा.
त्याच्यावर भाव ठेवणारा माणूस धन्य!
२ )प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते,
त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात.
सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो.
तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.
३) ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो.
ज्यांचे अवसान गाळले आहे अशांचा तो उद्धार करतो.
सात्त्विकांवर अनेक आपत्ती ओढवतात,
पण प्रभू त्या सर्वांतून त्याला सोडवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे.
पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य."
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ३:३१-३६
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे."
येशू निकदेमला म्हणाला, “जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो, जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानीत नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, तो आत्मा मोजून मापून देत नाहीन. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : -आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकले की, पेत्र आणि येशूचे इतर शिष्य ह्यांनी प्रमुख याजकांना ठामपणे सांगितले की, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे आणि देवाची आज्ञा मानण्यातच आपल्याला खरा तो आनंद मिळत असतो. परमेश्वर देव आपल्या जीवनातील वेगवेगळे अनुभव, घटना, प्रसंग, प्रार्थना, मनन-चिंतन ह्याद्वारे त्याच्या आज्ञा आपल्याला प्रकट करीत असतो. काहीवेळा आज्ञा फार कठीण असतात. आपल्याला खूप त्रास होतो. परंतु देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या वचनाचा स्वीकार करण्यातच आमच्या जीवाचा आनंद भरून राहिला आहे. ख्रिस्तप्रेमाने भरलेले जीवन त्याच्या सेवेमध्ये व भक्तीमध्ये अर्पण करण्यातच जीवनाचे सार्थक होत असते. 'जीवन हे माझे सारे प्रभू अर्पिले तवपदी रे' या गीतामधून आपले जीवन प्रभूचरणी अर्पण करण्यात धन्यता मानूया. तसे खऱ्या अर्थाने घडेल तेव्हा पेत्र व इतर प्रेषित याप्रमाणे ख्रिस्तप्रेमाची साक्ष आमच्या जीवनातून प्रकट होईल. यामुळे जीवनातील सुख-दुःखाच्या सर्व प्रसंगी खऱ्या आनंदाचा अनुभव आम्हाला येत राहील.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या