Marathi Bible Reading | Friday 29th April 2022 | Second Week of the Easter |

पुनरुत्थान २रा  सप्ताह 

शुक्रवार २९ एप्रिल २०२२ 

येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतूनसुद्धा त्यांना पाहिजे तितके दिले. 

सिएनाची संत कॅथरीन
- कुमारिका व धर्मपंडित

ख्रिस्तसभेच्या नूतनीकरणासाठी आणि ऐक्यासाठी आपला देह झिजविणाऱ्या या ख्रिस्तसभेच्या युवराज्ञीला आयुष्यातील अखेरचे तीन महिने महाभयंकर अशा यातनांना सामोरे जावे लागले. तरी हे दुःखसहन तिने मोठ्या धैर्याने, सहनशिलतेने आणि प्रेमाने स्वीकारले आणि शेवटी वयाच्या ३३ व्या वर्षी आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला.
“सुसंवाद” साहित्यकृतीत तिने देवपित्याने तिला आध्यात्मिक क्षेत्रात दाखविलेल्या प्रकाशाचे वर्णन केले आहे.
कॅथरीन ३० एप्रिल १३८० साली मरण पावली व पोप पायस दुसरे ह्यांनी तिला १४६१ साली संत पदाचा नजराणा बहाल केला. पुढे इ. स. १९७० साली पोप पॉल सहावे ह्यांनी तिला ख्रिस्तसभेची धर्मपंडिता म्हणून सन्मानीत केले. ती इटलीची आश्रयदाती संत आहे. अग्नी, मरी आणि डोकेदुःखी ह्याविरूद्ध तिचा धावा केला जातो.
चिंतन : भूतकाळातील आपल्या पातकांची आठवण करू नका आणि जर ती करायचीच असेल तर देवाच्या क्षमाशीलतेच्या प्रकाशात ती होऊ द्या. सिएनाची संत कॅथरीन.


आपल्या सहकार्याशिवाय म्हणजेच विश्वास व कृती ह्याशिवाय चमत्कार घडणे  अशक्य आहे. परमेश्वर सदैव आपल्या सर्वांसाठी चमत्कार करु शकतो. आपण मनापासून ख्रिस्ताचे अनुकरण करतो का? हे तपासून पाहू या.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  ५:३४-४२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
   "येशूच्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो, म्हणून ते आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले. "

सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परुशी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून प्रेषितांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणी तरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानीत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला आणि जितके त्याला मानीत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा आणि त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल."
तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात आणि घरोघर शिकवण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २७:१, ४,१३-१४
प्रतिसाद :  संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे.

१ प्रभू माझा दीपक व उद्धारक आहे, 
मी कुणाला भिऊ ? प्रभू माझ्या जिवाची संरक्षक
 तटबंदी आहे. मला कुणाची भिती ?

२ मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली 
आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन
 ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे, 
प्रभूचे सुंदर ध्यान पहात राहावे 
आणि मंदिरात त्याचे मनन करावे.

३ माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा
 अनुभव घडेल अशी मला खात्री आहे. 
प्रभूची प्रतीक्षा कर, हिंमत बाळग, 
धीर धर. प्रभूचीच प्रतीक्षा कर !

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान ६:१-१५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्याने बसलेल्यांना पाहिजे तितके वाटून दिले. "
येशू गालिलीच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलीपला म्हणाला, “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या ?" हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहो हे त्याला ठाऊक होते. फिलीपने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील प्रत्येकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत." त्याच्या शिष्यांपैकी एकजण म्हणजे शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. त्यावर सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतूनसुद्धा त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा." मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, "जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय!”
मग ते येऊन आपणांस राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : प्रेषितांची कृत्ये या ग्रंथात एक महत्वाचे सत्य केले आहे. यहुदी धार्मिक पुढारी येशूचे नाव कुणी घेऊ नये, त्याच्या नावे बोलू नये अशी ताकीद सर्व लोकांना देत होते. त्यामुळे गामालिएल या शास्त्राध्यापकाने हे सर्वोत्तम सत्य सर्वांसमोर व्यक्त केले की, जी प्रेषितांची येशूसंबंधी शिकवण ही देवाकडून असेल तर ते कार्य कुणीही थांबवू शकणार नाही. परंतु हे केवळ मानवी कार्य असेल तर ते आपणहून नष्ट होईल. इतिहास साक्ष देत आहे की, येशूच्या नावे प्रेषितांनी दिलेली शिकवण हे देवाचे कार्य असून अजूनही चालू आहे. हे प्रभू येशू, तुझा गौरव असो.

प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्ही सर्वस्वी तुला शरण आलो आहोत. आम्हाला तुझी कृपा  बहाल कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या