पुनरुत्थान २रा सप्ताह
शनिवार ३० एप्रिल २०२२
“मी आहे, भिऊ नका.”
ख्रिस्त प्रभू आजच्या शुभवर्तमानात पाण्यावरुन चालत येत असतांना पाहून त्याच्या शिष्यांना भीती वाटली. मात्र त्यांना धीर देऊन तो म्हणाला, आहे, भिऊ नका.' ख्रिस्त प्रभू आज आपल्या सर्वांना सांगत आहे, 'भिऊ नका.' | आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू येशू आपले संरक्षण करावयास तयार आहे. मनातील सर्व भीती प्रभू येशूवर सोपवून त्याला सर्वस्वी शरण गेल्यास, प्रभू आपल्याला सर्व प्रकारच्या संकटातून वाचविण्यास समर्थ आहे.
आपण प्रभूवरील विश्वास मजबूत बनवू या. स्वत:वर तसेच परस्परावरील विश्वास वाढवणेसुद्धा गरजेचे आहे, कारण आपले सर्वांचे जीवन परस्परसंबंधाने विणलेले आहे. सर्व प्रकारची भीती बाजूला सारुन देवाला व प्रार्थनेला जीवनात प्रथम स्थान देऊ या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ६:१-७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“त्यांनी पवित्र आत्म्याने परिपूर्ण अशा सात पुरुषांची निवड केली. "
शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, फिलीप, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. येरुशलेममध्ये शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३३:१-२, ४-५,१८-१९
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे !
१) सात्त्विक जनहो, प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.
स्तवन करणे सरळ माणसांना शोभून दिसते.
वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा,
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
२) प्रभूचा शब्द सत्य आहे.
त्याचे सारे कार्य टिकाऊ असते.
त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत.
प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
३) प्रभूचे भय बाळगणारे व त्याच्या प्रेमाचे भुकेले
अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते,
मृत्यूच्या दाढेतून तो त्यांचे प्राण वाचवतो,
दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:१६-२१
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्यांनी येशूला समुद्रावरून चालताना पाहिले. "
संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलिकडे कफर्णहूम येथे जाऊ लागले, एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले, परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली, तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्याला लागला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :'मी आहे भिऊ नका' हे शब्द शिष्यांनी भर समुद्रात वादळ वाऱ्याने तारू हैराण झाले असताना ऐकले. प्रत्यक्ष प्रभू येशू मचव्यापर्यंत चालत येत आहे हे त्यांना दिसले. वादळवारे व अंधार यांनी भयग्रस्त झालेली त्यांची हृदये शांत झाली. जीवनातील असे हेच प्रसंग आम्हाला अनुभवास येत असतात. अशावेळी 'भिऊ नका मी तुम्हांबरोबर आहे' हे प्रभूशब्द आम्हाला धीर देतात. प्रकाशाच्या दिशेने पुन्हा वाटचाल करण्यास आम्ही तयार होतो. हे प्रभू ख्रिस्ता, तुझी सोबत मिळणे याच्याहून मोठा आसरा कुठला असू शकतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व प्रकारच्या भीतीपासून व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर,आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या