Marathi Bible Reading 3rd Sunday of the Easter | 1st May 2022

पुनरुत्थान ३रा  सप्ताह 

रविवार १ मे २०२२ 

योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस का ?"



  त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” .
त्याने त्याला म्हटले “माझी मेंढरे पाळ.” 
येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार


आपल्यामानवी जीवनातील सर्व घडामोडी विषयी परमेश्वर जो निर्णय देतो किंवा योजना तयार करतो ते सर्व स्वीकारणे म्हणजेच आज्ञापालन होय. आपले जीवन हे परमेश्वराठायी त्यानेच दिलेले सर्वोच्च दान आहे. आपल्या जीवनाचा धनी प्रभू परमेश्वर आहे, म्हणूनच त्याचे आज्ञापालन करुन जीवनात त्याला  प्रथम स्थान देणे रास्त आहे. आपण त्यामुळेच त्याच्या प्रीतित सतत वाढत  राहतो.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  ५:२७-३२,४०-४१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि तसाच पवित्र आत्माही साक्षी आहे."
प्रमुख याजकाने प्रेषितांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांस निक्षून सांगितले होते की नाही ? तरी पाहा तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हांवर आणू पाहात आहा." तेव्हा पेत्रने आणि इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले.
ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. त्यांनी प्रेषितांना येशूच्या नावाने बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३०:२,५-६,११-१३
प्रतिसाद :    प्रभो, मी तुझी थोरवी गाईन.

१) हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. 
कारण तू मला उद्धरिले आहेस. 
तू माझ्या वैऱ्यांना माझ्यावर हर्षू दिले नाहीस. 
हे परमेश्वरा, तू माझा आत्मा मृत लोकांतून वर काढलास.
तू मला जिवंत राखलेस, मला पडू दिले नाही. 

२) अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा. 
त्याची पवित्रता आठवून उपकारस्तुती करा. 
त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, 
रात्रभर विलाप झाला तरी उषःकाली आनंद होईल.

३) प्रभूने माझे ऐकले आणि माझ्यावर दया केली.
 प्रभू माझ्या मदतीला धावला. • 
तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस, 
हे परमेश्वरा, मी सर्वकाळ तुझे उपकार स्मरीन.


दुसरे वाचन प्रकटीकरण  ५:११-१४
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“वधलेले कोकरू, सामर्थ्य आणि धन ही घेण्यास योग्य आहे.'

मी, योहानने पाहिले, तो राजासन, प्राणी आणि वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, “वधलेले कोकरू, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान आणि गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे!"
स्वर्गात, पृथ्वीच्या खाली, आणि समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यांना मी असे म्हणताना ऐकले, "राजासनावर जो बसला आहे त्याला आणि कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव आणि पराक्रम ही युगानुयुगे आहेत!" तेव्हा ते चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन !” आणि वडील मंडळीने पाया पडून नमन केले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
हे प्रभू येशू ख्रिस्ता, शास्त्रवचने आम्हांला शिकव. आम्हांशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान २१:१-१९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. "
*(तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो याप्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघेजण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो." ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबरच येतो" तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीच मिळाले नाही.
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, "बंधूनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय ?" त्यांनी “नाही,” असे त्याला उत्तर दिले. त्याने त्यांना म्हटले, "मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल, म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांच्याने ओढवेना. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्रला म्हणाला, “अरे, हे तर प्रभू आहेत!” प्रभू आहे, हे ऐकून शिमोन पेत्रने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला. कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते तर सुमारे दोनशे हातांवर होते.
मग किनाऱ्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही मासे आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहारी करा.” तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहा हे त्याला विचारायला शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली. तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.)त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्रला म्हटले, योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस का ?" तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस का?" तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले “माझी मेंढरे पाळ.” तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस का?" असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार. मी तुला खात्रीने सांगतो, तू तरूण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल.” (तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला) आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्या मागे ये."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :गेल्या रविवारच्या उपासनेप्रमाणे आजच्या उपासनेतील वाचनेसुद्धा पुनरुत्थित प्रभूच्या सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या ख्रिस्ती श्रद्धावंताला कोणकोणत्या अगिनिदिव्यातून जावे लागते. त्याविषयी आपल्याला चिंतन करायला लावतात : 
१. साक्ष देताना छळ व मानहानी ह्यांना सामोरे जावे लागते : पुनरुत्थित प्रभूचा खरा साक्षीदार हा श्रद्धेसाठी छळ सहन करीत असतो. ग्रीक भाषेत 'रक्तसाक्षी' ह्या शब्दासाठी जो ‘मारतुरिऑन' हा शब्द आहे त्याच्यात साक्ष देताना रक्त सांडणे किंवा रक्त सांडेपर्यंत साक्ष देत राहणे असा अर्थ दडलेला आहे. आजच्या पहिल्या वाचनात येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरलो म्हणून प्रेषित आनंद व्यक्त करीत असल्याचे दिसून येते. 
२. छळ झाल्यामुळे साक्ष देण्याची प्रक्रिया खंडित होत नाही : आजच्या दुसऱ्या वाचनात योहानाला जो दृष्टान्त होतो त्यात आपल्या श्रद्धेसाठी छळ सहन करणारे लोक त्याच्या दृष्टीस पडतात ते राजासनावर बसलेल्या देवाची व वधलेल्या कोकराची आराधना करीत असल्याचे दिसून येते. त्यांना देवाची भक्ती करण्याचे भाग्य मिळालेले आहे. हा दृष्टान्त आता प्रत्यक्ष छळ सहन करणाऱ्या ख्रिस्ती समुदायाला हजार हत्तींचे बळ देऊन जाणारा आहे. 
३. साक्ष देण्यासाठी कोणत्याही विशिष्ट परिस्थितीची गरज नसतेः ज्याला पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याची साक्ष द्यायची आहे ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या श्रद्धेची साक्षीदार बनू शकते. आजच्या शुभवर्तमानात प्रेषित आपले नित्याचे मासेमारीचे काम करीत होते. ते कामात गुंग असतानाच त्यांना पुनरुत्थित प्रभूचे दर्शन घडते. मात्र एकदा का ही त्याच्या उपस्थितीची जाणीव झाली की, सामान्य परिस्थितीदेखील असामान्य, अंतर्मुख करणारी, हृदयस्पर्शी आणि मंतरलेली अशी बनू लागते. येशूचे दर्शन घडेपर्यंत शिष्यांच्या जाळ्यात काहीच सापडलेले नव्हते. येशूच्या आज्ञेवरून जाळे टाकताच माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना अशी असामान्य परिस्थिती निर्माण झाली.
आत्मपरीक्षण : पुनरुत्थित प्रभूच्या उपस्थितीमुळे माझ्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे ? त्याची साक्ष देताना मला कोणत्या प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते? ह्या छळाच्या प्रसंगीदेखील मी साक्ष देऊ शकतो / शकते का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तवठायी समर्पित जीवन जगण्यास व तुझ्या आज्ञा | पाळण्यास मला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या