Marathi Bible Reading | Monday 2nd May 2022 | 3rd Week of the Easter |

पुनरुत्थान ३ रा  सप्ताह 

सोमवार २ मे  २०२२ 

  “ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे."


संत अथनेशियस
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (२९५-३७३)

अथनेशियस हे इजिप्तमधल्या आलेक्झांड्रिया शहराचे रहिवासी होते. आलेक्झांड्रिया हे शहर त्या काळात एक मोठे व्यापारी केंद्र होते. तसेच तत्वज्ञान ईशज्ञानाचे शिक्षणकेंद्र होते. अशा वातावरणात अथनेशियस ह्यांचे बालपण एका उच्चभ्रू ख्रिस्ती कुटुंबात गेले. तरुण असतानाच तो ज्ञानपिपासू बनलेला होता. तसेच त्याला भक्ती-श्रद्धा-देव-धर्म ह्याची विलक्षण आवड होती.
अथनेशियस केवळ उपधर्मगुरू असताना आलेक्झांड्रियाच्या पेट्रिआर्कने त्याला आपला सचीव म्हणून निवडून घेतले. ते त्याच्याकडे धर्माच्याबाबतीत सल्लाही मागत असत. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या परिषदेसाठी त्यांनी अथनेशियस ह्यांना आपणाबरोबर नेले. याच परिषदेत एरियस नावाच्या पाखंडमतवाद्याला धर्मबहिष्कृत केले आणि ख्रिस्ताचे ईश्वरी रुप जगापुढे ठामपणे जाहीर केले. 
संत अथनेशियस हे एक सिद्धहस्त लेखक होते. येशूच्या देहधारणेवर त्यांनी उपधर्मगुरू असतानाच लेखन केले होते. आपल्या तिसऱ्या हद्दपारीच्या वेळी इजिप्तच्या अरण्यातील मठवाश्यांसह राहत असताना त्यांनी “एरियनवादाचा इतिहास” हा ग्रंथ लिहिला. त्यांनी लिहिलेल्या "लाईफ ऑफ सेंट अँथनी" ह्या पुस्तकामुळे सर्वत्र व्रतस्थ व विरक्त जीवनाला उधाण आले होते.
चिंतन : "केवळ पाप टाळण्यात कसली आलीय नीतिमत्ता? उलट चांगले टाळणे हेही पापच नव्हे काय? एकच नियम असता उलट फिरविता येतो.” संत अथनेशियस
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  ६:८-१५
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"स्तेफान ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्याच्याने तोंड देववेना."

स्तेफान कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुतकृत्य व चिन्हे करीत असे. तेव्हा लिविर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर आलेक्झांडेयकर आणि किलिकिया आणि आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध आणि देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले" असे म्हणण्यास पढवले आणि लोकांना, वडिलांना आणि शास्त्रांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, "हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या आणि नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडीत नाही." आम्ही त्याला असे बोलताना ऐकले, "हा नाझरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील." तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११९:२३-२४,२६-२७,२९-३०
प्रतिसाद :  ज्यांचे आचरण शुद्ध आहे ते धन्य होत. 

१) सत्ताधीश जमून माझ्याविरुद्ध मसलत करतात, 
तरी हा तुझा दास तुझ्या नियमांचे चिंतन करतो. 
तुझी शिकवण मला प्रिय आहे. 
ती माझी मार्गदर्शिका आहे.

२) मी केलेले सर्व तुला सांगितले,
तू माझे ऐकलेस; आता तुझे नियम मला शिकव. 
तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते समजावून सांग..
 मग तुझ्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करीन.

३) मला वाममार्गापासून आवर आणि 
तुझे धर्मशास्त्र मला शिकव.
मी निष्ठेचा मार्ग निवडला आहे.
तुझ्या संकेताकडे माझे लक्ष आहे.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे. 
आलेलुया !

शुभवर्तमान योहान ६:२२-२९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा.

जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही आणि त्यांचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्णहूमास आले.
येशू त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, "गुरुजी, येथे कधी आला?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अत्र देईल त्यासाठी श्रम करा." ह्यावर ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे ?" येशूने त्यांना उत्तर दिले, “ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आयुष्यात आपण सर्वात जास्त भूक कशाची बाळगतो? आरोग्य, संपत्ती, प्रेम, सत्य की आनंदी जीवनाची? आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू भाकरीच्या चमत्कारानंतर त्याला जे लोक शोधण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनासुद्धा हाच प्रश्न विचारतो. लोक फक्त येशूला शोधत होते. कारण त्यांना केवळ त्यांच्या शरीराची भूक तृप्त करायची होती आणि त्यांच्या अंतःकरणाला व आत्म्याला समाधान देणारी आध्यात्मिक भूक ते विसरून गेले होते. भूक दोन प्रकारची असते. शारीरिक व आध्यात्मिक. केवळ येशूख्रिस्तच आपल्या अंतःकरणाची आणि आत्म्याची आध्यात्मिक भूक भागवू शकतो. सत्य, क्षमा, सुखी जीवन, न्याय आणि प्रीतीची भूक. परंतु त्यासाठी येशूने सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे व देवाची कार्येदेखील आपण संपूर्ण मनाने केली पाहिजेत. मी येशूचा शोध माझ्या शारीरिक की आध्यात्मिकभुकेसाठी घेत आहे? मला फक्त आरोग्य, संपत्तीची भूक लागलेली आहे की प्रेम, सत्य, क्षमा व सार्वकालिक जीवनाचीसुद्धा भूक लागलेली आहे ? फक्त येशूच माझी आध्यात्मिक भूक भागवू शकतो यावर माझा विश्वास आहे का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, जागतिक व क्षणभंगूर गोष्टींसाठी नव्हे तर स्वर्गीय | जीवनासाठी योग्य अशा गोष्टींसाठी श्रम करण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या