पुनरुत्थान ३ रा सप्ताह
मंगळवार ३ मे २०२२
“ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”
ख्रिस्तसभा आज संत फिलिप व संत जेम्स ह्या येशूंच्या प्रेषितांचा सण साजरा करीत आहे. संत फिलिपने, 'आम्हाला पिता दाखवा' असे प्रभूला सांगितले असताना प्रभूने म्हटले होते 'ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.’ संत फिलिपने येरुशलेम मध्ये आणि कैंसरियाच्या प्रदेशात प्रभू येशूची सुवार्ता पसरविली. संत फिलिपला क्रुसावरील रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. संत जेम्स म्हणजेच याकोब ह्यानेसुध्दा प्रामाणिकपणे ख्रिस्ताची साक्ष दिली. त्याला मंदिराच्या अतिउंच कड्यावरून लोटून ठार मारण्यात आले. ह्या दोन्ही प्रेषितांनी प्रभूला पाहिले, अनुभवले आणि त्याची साक्ष जगाला दिली.
प्रभू येशूने आजच्या शुभवर्तमानात म्हटले आहे, 'मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील' म्हणजेच आपल्या सर्वांना प्रभू येशू आज त्याच्या सुवार्तेची साक्ष देण्यासाठी पाचारण करीत आहे. संत फिलिप व संत जेम्सचा आदर्श समोर ठेवून धैर्याने प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी व साक्ष देण्यासाठी आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेवू या.
✝️
पहिले वाचन १करिंथ १५:१-८
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन १५ : १-८
"प्रभू याकोबला, मग सर्व प्रेषितांना दिसला."
बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहा, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला, तो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले पुरला गेला, आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला, त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि काहीजण महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १९:२-५
प्रतिसाद : त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, किंवा आलेलुया !
१)आकाश देवाचा महिमा वर्णिते,
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.
दिवस दिवसाशी संवाद करतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
२)वाचा नाही, शब्द नाही,
त्यांची वाणी ऐकू येत नाही,
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो,
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १४:६-१४
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ?"
येशूने थोमाला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेले आहे.' "
फिलीप त्याला म्हणाला, "प्रभुजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले, “फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आह त्याने पित्याला पाहिले आहे, तर 'आम्हांला पिता दाखवा' असे तू कसे म्हणतोस ? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रध्दा तू ठेवत नाहीस काय ? ज्या गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.
“मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर श्रध्दा ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, तुम्ही माझ्या नामाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आज देऊळमाता संत फिलीप व संत जेम्स, प्रेषित यांचा सण साजरा करते. ह्या दोन्ही संतांच्या देणगीबद्दल आपण देवाचे आभार मानू या. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा व संधी मिळाली आहे. संत फिलीप व संत जेम्स सुरूवातीला त्यांच्या येशूवरील श्रद्धेत खूपच अशक्त आणि अस्थिर दिसत होते, परंतु नंतर येशूने त्यांनाच त्याची शिकवण सर्व राष्ट्रांपर्यंत नेण्यासाठी निवडले. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचे मिशनकार्य योग्यरित्या पार पाडले आणि विश्वासूपणाने ख्रिस्ताला ओळखून त्यास जगाला प्रकट केले. आजच्या शुभवर्तमानात येशू स्वतःला “मार्ग, सत्य आणि जीवन" म्हणून घोषित करीत आहे. आमल्याकडे येशू असणे म्हणजे जीवन आहे, शांती व आनंदाकडे नेणारा खरा मार्ग शोधणे आहे. येशू जवळ असणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ मिळवणे आहे. तो या जगापेक्षा अगदी वेगळा आहे. आज आपण संत फिलीप व संत जेम्सच्या मध्यस्थीद्वारे येशूबद्दल आपल्याला अधिक ज्ञान मिळण्यासाठी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करू या. प्रभू येशूच मार्ग, सत्य व जीवन आहे हे मी स्वीकारतो / ते का? आणि माझ्या आयुष्यात येशू असणे हे मला किती महत्वाचे आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासात वाढण्यास व जीवनाद्वारे तुझी साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या