पुनरुत्थान ३ रा सप्ताह
बुधवार ४ मे २०२२
“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही."
मध्य युरोपात संत फ्लोरियन ह्यांची भक्ती खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या मध्यस्थीने बरेच आजार समूळ नाहिसे झाल्याचे आढळते. आजही अग्नी आणि पाणी ह्यांपासून उद्भवणाऱ्या आपत्तीच्या वेळी संत फ्लोरियनचा धावा केला जातो.
देवाचे कार्य पूर्णत्वास येते ह्याची प्रचिती आजच्या पहिल्या वाचनात आली आहे. स्तेफनचा वध झाल्यानंतर प्रभू येशूचा शिष्य व प्रेषित फिलिप ह्याने शोमरोनमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घोषित केली. ख्रिस्ताच्या कृपेने प्रेरित झालेल्या फिलिपच्या प्रार्थनेमुळे आजारग्रस्त व भूतग्रस्त माणसे बरी झाली. ख्रिस्ताचे तारणदायी कार्य सुरु राहिले.
देवाला प्रत्येक माणसाची काळजी आहे कारण तो सर्वांवर प्रेम करतो. सर्वजण त्याचीच लेकरे आहेत. आपण कोणीही बहकून जाऊ नये म्हणून विश्वासाने प्रभूच्या सहवासात जाणे गरजेचे आहे. प्रभू म्हणतो, “जो माझ्याकडे येतो त्याला कधीहि भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीहि तहान लागणार नाही. "
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ८:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्यांची पांगापांग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले."
येरुशलेममधल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया आणि शोमरोन ह्या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्टेफनला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीला हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना आणि स्त्रियांनाही घरून आणून तुरुंगात टाकीत असे.
तेव्हा ज्यांची पांगापाग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले आणि फिलीपने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली, तेव्हा फिलीपचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले, पुष्कळ पक्षपाती आणि पांगळी माणसे बरी झाली. अशा प्रकारे त्या नगरात आनंदीआनंद झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६६:१-७
प्रतिसाद : पृथ्वीवरील समस्त जनहो, देवाचा जयजयकार करा.
१) पृथ्वीवरील समस्त जनहो,
देवाचा जयजयकार करा.
त्याच्या नावाच्या महिम्याचे गुणगान गा.
त्याचे स्तवन करून माहात्म्य वाढवा.
देवाला म्हणा, “तुझी करणी किती अगाध आहे!"
२) "सारे भूमंडळ तुझ्या चरणी लागेल.
तुझे गुणगान गाईल, तुझ्या नावाचा महिमा वर्णील!”
या आणि देवाचे कार्य बघा.
मानवजातीला त्याच्या करणीचा धाक बसतो.
३) त्याने समुद्राच्या जागी कोरडी जमीन केली,
लोक नदीपार गेले.
तेव्हा त्याची करणी पाहून आम्हांला अत्यानंद झाला;
तो आपल्या पराक्रमाने सदासर्वदा राज्य करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:३५-४०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
येशू त्यांना म्हणाला, "मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवला नाही, असे मी तुम्हांला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू स्वतःला जीवनाची भाकर म्हणून का संबोधितो ? यहुदी लोकांना समजले की, देवाने त्यांना सर्वांतून मान्ना देण्याचे वचन पूर्ण केले. भाकर हा जीवनाचा मुख्य भाग आहे. आपण फार दिवस अन्नाशिवाय जगू शकत नाही. भाकरीमुळे आपल्याला शारीरिक पोषण मिळते. ही झाली आपली शारीरिक भूक. परंतु जीवन काय आहे ? प्रभू येशू स्पष्टपणे सांगतो की, जीवन म्हणजे परमेश्वर, जो जीवनदाता आहे त्याच्यासोबत जोडलेले राहणे, म्हणजेच जिवंत देवाबरोबरचे असलेले आपले प्रेमळ नाते. आमचा विश्वास व आज्ञाधारकपणा टिकवणे, आणि हेच आपल्यासाठी येशू शक्य करतो जेव्हा तो म्हणतो, "मीच जीवनाची भाकर आहे.” येशूशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती अशाप्रकारचे जीवन आपल्याला देऊ शकत नाही आणि देवाशी आपले नातेसंबंध टिकविण्यासाठी मदत करू शकत नाही. मी फक्त माझ्या शारीरिक अस्तित्वामुळे समाधानी आहे की, मी सार्वकालिक जीवनाची भूकही भागविण्याचा प्रयत्न करीत आहे ? देवाबरोबरचे माझे नाते आणखी दृढ करण्यासाठी मी नेहमीच त्याच्याशी संपर्क साधते / साधतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील विश्वास दृढकरण्यास आम्हाला धैर्य व कृपा । प्रार्थना: हे प्रभू, तुझ्यावरी विश्वासात दृढ राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या