पुनरुत्थान ३ रा सप्ताह
गुरुवार ५ मे २०२२
जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."
खरे पाहता संत आंजेलो ह्यांच्याविषयी विश्वसनीय माहिती अत्यंत त्रोटकपणे उपलब्ध आहे. त्याच्या आईवडिलांना पवित्र मरियेचे दर्शन झाल्यामुळे त्यांनी आपला यहुदी धर्म सोडून ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. ज्या मशिहासाठी यहुदी लोक आजपर्यंत थांबलेले आहेत तो ख्रिस्ताच्या रुपाने आलेला आहे आणि त्याने आपल्या लोकांना त्यांच्या पापांच्या जोखडापासून मुक्त केलेले आहे अशा प्रकारचा संदेश पवित्र मरियेने या दांपत्यांना दिला होता. या दांपत्याला दोन मुलं होतील आणि ती कर्मेल पर्वतावरील ऑलीव्ह वृक्षाप्रमाणे सगळीकडे सुप्रसिद्ध बनतील. एक महागुरूपदापर्यंत पोहोचेल आणि दुसरा गौरवशाली रक्तसाक्षी बनेल असे आश्वासन देखील पवित्र मरियेने या दांपत्याला दिलेले होते.
पवित्र मरियेला सांगितल्याप्रमाणे त्यांना दोन जुळी मुले झाली. बाळपणापासून त्यांच्याठायी मानसिक व आध्यात्मिक सामर्थ्य विशेषरित्या असल्याचे आढळून आले. वयाच्या १८ व्या वर्षी दोघांनी कार्मेलाईट संघामध्ये प्रवेश केला. तत्पूर्वीच त्यांनी ग्रीक लॅटीन आणि हिब्रू भाषेवर प्रभुत्व मिळविलेले होते.
कर्मेल पर्वतावर पाच वर्षे घालविल्यानंतर आंजेलो ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले. येशूने त्यांना सिसिली देशात जाण्याची आज्ञा केली ह्याच ठिकणी श्रद्धेचा प्रसार करता करता त्यांना आपल्या प्राणाचे बलिदान करण्याची स्वर्गीय कृपा मिळणार होती.
प्रभू येशूच्या या आज्ञेचं तात्काळ पालन करून आंजेलो कर्मेल पर्वत ओलांडून इटलीतील सिसिली येथे आले. तेथे जात असताना वाटेवरच त्यांनी आपल्या प्रवचनांनी व केलेल्या चमत्कारांनी अनेकांचे मनपरिवर्तन केले. पोलेर्मा (इटली) येथे पोहोचल्यानंतर त्यांची दिव्य वाणी ऐकून २०० ज्यू लोकांनी एकाच वेळेला बाप्तिस्मा घेण्याची तयारी दर्शविली. लिओकाटा येथे देखील त्याला तसेच यश मिळाले. मात्र येथील बेरेन्गारिकस नामक राज्यकर्त्यांच्या कपटी व क्रूर स्वभावावर त्याने नेमके बोट ठेवल्यामुळे हा सम्राट आंजेलोला पाण्यात पाहू लागला. एकदा एका जमावाला उपदेश करीत असताना काही गुंडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आंजेलो रक्ताच्या धारोळ्यात असतानाही कसेबसे गुडघे टेकून प्रार्थना करू लागले. त्याही अवस्थेत तो आपल्या मारेकऱ्यांच्या परिवर्तनासाठी देवाकडे कळकळीने प्रार्थना करीत होता. शेवटी त्यांनी आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला.
आपले जीवन हे देवाचे दान आहे. मी व माझे असे काहींच नाही तर माझ्या जीवनाचा धनी तोच विधाता आहे. माझा श्वाससुद्धा त्याचाच आहे, अशी भावना ज्या माणसात निर्माण होते तेथे श्रद्धेचा अंकूर वाढत असतो.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ८:२६-४०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जर तू तुझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवलास तर तुला बाप्तिस्मा मिळेल. "
प्रभूच्या दूताने फिलीपला म्हटले, "ऊठ, जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती ओसाड आहे." मग तो उठला व निघाला, तेव्हा पाहा, एक कुशी षंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते, तो येरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा आत्म्याने फिलीपला सांगितले, "तू जाऊन त्याचा रथ गाठ." फिलीप धावत गेला आणि त्याने यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, "आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय ?" त्याने म्हटले, "कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?" मग त्याने फिलीपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा :
त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंढाने फिलीपला म्हटले, "मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वत:विषयी की दुसऱ्या कोणाविषयी ?" तेव्हा फिलीपने बोलायला आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा पंढ म्हणाला, “पाहा, हे पाणी! मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?" तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलीप आणि षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरुन वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलीपला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलीप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६६:८-९,१६-१७,२०
प्रतिसाद : पृथ्वीवरील समस्त जनहो, देवाचा जयजयकार करा.
१) लोकहो, आमच्या देवाचे धन्यवाद गा.
त्याच्या स्तवनाचा गजर ऐकू द्या.
त्याने आमचे प्राण वाचवले आहेत.
आमचे पाय ढळू दिले नाहीत.
२) देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, या व ऐका.
त्याने माझ्यासाठी काय काय केले ते मी तुम्हांला सांगतो.
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.
३) धन्य तो देव !
माझी प्रार्थना त्याने झिडकारली नाही,
आपले प्रेम कमी केले नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
येशूने थोमाला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:४४-५१
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर मीच आहे."
येशूने लोकसमुदायाला म्हटले, “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, 'ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.' जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल, जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू आपल्याला शिकवतो की, देवपिता त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला आकर्षत करत असतो आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशूच्या मते सार्वकालिक जीवन काय आहे? आपण त्याच्याबरोबर जे नातेसंबंध स्थापित केलेले आहेत त्यात प्रगती करणे, मजबूत बनवणे आणि हे नाते आपल्या जीवनाच्या शेवटी परिपूर्ण होईल, जेव्हा आपण परमेश्वराच्या अनुभवाने भरले जाई आणि तीन दैवी व्यक्ती : पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यासह आणि इतरांबरोबर आपण कायमचे राहू. परंतु हे सर्व अनुभवण्यासाठी आपल्याला देवाचे ऐकण्याची व त्याच्याकडून शिकण्याची निवड करावी लागेल. आणि ही आपली सर्वात महत्त्वाची निवड असेल. दररोज आपण योग्य निवडी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला सत्याचा मार्ग दिसेल आणि आपले रूपांतर होऊन, आपल्याला कायमचे देवाबरोबर सार्वकालिक जगायला मिळेल. मला प्रभु येशूकडे येण्याचे आकर्षण आहे का? सार्वकालिक जीवनप्राप्ती करण्यासाठी माझा काय प्रयत्न चालू आहे ?
प्रार्थना : हे परमेश्वरा, पूर्णपणे मी तुजसमोर शरण आलो आहे. समर्पित जीवन जगण्यास मला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या