पुनरुत्थान ३ रा सप्ताह
शुक्रवार ६ मे २०२२
“स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे."
संत डॉमणिक सावियो
- वर्तनसाक्षी (१८४२-१८५७)
९ मार्च १८५७ रोजी मृत्यूशय्येवर खिळलेला असताना डॉमणिकला एक स्वर्गीय दृष्टांत झाला आणि तो हर्षातिशयाने ओरडला, “अरे वा! काय सुंदर दृश्य आहे हे!
डॉमणिकच्या मृत्यूनंतर जवळजवळ शंभर वर्षे त्याच्या जीवनाविषयी सखोल अभ्यास करण्यात आला. शेवटी त्याला संतपद देण्याचे ठरले. १२ जून १९५४ साली आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या भव्य संतीकरण सोहळ्यात पोप पायस बारावे ह्यांनी पुढीलप्रमाणे डॉमणिक सावियो ह्याच्या जीवनाचा आढावा घेतला. “आजच्या युगात युवकांच्या हृदयातून सत्प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना केवळ १५ वर्षीय डॉमणिक सावियो ह्याला आल्ताराचा बहुमान देण्यास आम्हाला विशेष आनंद होत आहे. सर्व युवकांनी डॉमणिक सावियोचे अनुकरण करावे असे आदर्श जीवन तो जगला. • शारीरिकदृष्ट्या जरी तो अशक्त असला तरी ख्रिस्तावरील प्रीतीबाबत तो खंबीर आणि निश्चयी स्वभावाचा होता. त्याचे जीवन हा देवाला वाहिलेला पवित्र आणि सुयोग्य असा यज्ञच मानावा लागेल."
चिंतन : मी मोठमोठ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु जे काही मी करीन ते अगदी लहानातली लहान गोष्टसुद्धा देवाच्या महान गौरवासाठी करीन. संत डॉमणिक सावियो
जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या पहिल्या वाचनात शौलाला दर्शन देऊन त्याचे परिवर्तन घडवून आणले, . ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा शौल प्रभू येशूचा अनुयायी बनला आणि येशूची सुवार्ता त्याने पसरविली.
आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक पोषणासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः भाकरीच्या स्वरुपात आपल्या जीवनात येतो. आपल्या अंतःकरणात त्याला आपण स्वीकारू या. आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या पलिकडे जाऊन भाकरीच्या रुपाने आपल्या जीवनात येत असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारु या. ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण प्रभू येशूबरोबर एकरुप होत असतो.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ९:१-२०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परराष्ट्रीयांसमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता शौल माझे निवडलेले पात्र आहे."
शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेममध्ये आणावे. मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्यावेळी अकस्मात प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, "शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" तेव्हा तो म्हणाला, "प्रभो, तू कोण आहेस?" त्याने म्हटले, तू "ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर ऊठ आणि नगरात जा, म्हणजे तू तेथे काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल." त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलला जमिनीवरून उठवले तेव्हा त्याने डोळे उघडले, पण त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिष्कात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.
इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, "हनन्या!" त्याने म्हटले, "काय प्रभू ?" प्रभू त्याला म्हणाला, "उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने पाहिले आहे." तेव्हा हनन्याने उत्तर दिले, "प्रभो, येरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे हा माणसाने किती वाईट केले आहे हे मो पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, "जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्राएलची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे." आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागले हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौलभाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे." तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली.
ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११७:१-२
प्रतिसाद : सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
१) आलेलुया !
अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा.
साऱ्या मानवांनो, त्याचे गुणगान गा.
२) त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे,
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही..
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:५२-५९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे."
यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, "हा आपला देह आम्हांला खावयाला कसा देऊ शकतो ?" ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य ते सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. पण हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल." कफर्णहूम येथे शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या "देह आणि रक्ताविषयी” बोलतो, तेव्हा त्याची हीच इच्छा असते की, त्याच्या पवित्र शरीर व रक्ताच्या सेवनाने आपण खरोखर त्याच्याशी समरूप व्हावे प्रभु येशूचा देह आणि रक्त स्वीकारणे ही काही ‘जादूची कृती' नाही, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही त्याचा देह खातो व त्याचे रक्त पितो, तेव्हा तेव्हा तो नेहमी आपल्यामध्ये वस्ती करत असतो. आणि म्हणूनच आपण जागृत राहून मिस्सावेळेस कोणाला स्वीकारतो याची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज येशू आपल्याला त्याच्याप्रमाणेच देवाच्या जीवनात पूर्णपणे सामावून घेण्यास त्याच्यामध्ये राहण्यास प्रेरणा देत आहे. तो आपल्याला त्याच्याविषयीचे आपले सर्व गैरसमज दूर करून तोच नवजीवन देतो यावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन देत आहे. परंतु त्याचा देह आणि रक्त स्वीकारण्याने आमच्या जीवनात काय परिवर्तन येते याची आम्हाला जाणीव नसेल तर आम्ही ख्रिस्ताशी एकरूप कसे होणार? ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करण्यास मी किती इच्छुक आहे? त्याच्या शरीर व रक्ताविषयी माझ्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मी काय प्रयत्न करीत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुभवण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण । करण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या