Marathi Bible Reading | Saturday 7th May 2022 | 3rd Week of the Easter |

पुनरुत्थान ३ रा  सप्ताह 

शनिवार ७ मे  २०२२ 

“प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार ? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत 

बेवर्लेचे संत जॉन
महागुरू, वर्तनसाक्षी (७२१)
 

प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे की, “मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.” देवाच्या गहन व रहस्यमय ज्ञानाचा उलगडा पवित्र आत्म्याच्या कृपेने होत असतो. सर्व श्रद्धावंतांना बाप्तिस्मा व दृढीकरण संस्काराद्वारे हा पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रभू येशूची जीवनदायी वचने आपल्या प्रत्येकासाठी आहेत, मात्र पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय वचनांचे आकलन आणि उलगडा होणे अशक्य असते. पवित्र आत्माच आपल्याला देवाच्या वचनाचे महत्त्व आणि सामर्थ्य समजावून सांगत असतो. आपण जेव्हा बायबलचे वाचन करतो तेव्हा त्याची गहनता बौद्धिक पातळीवरून समजत नाही तर पवित्र आत्म्याचे दान आणि कृपा मिळाल्यावर त्या  वचनांचा उलगडा होतो.
प्रभू येशूने म्हटले आहे, “पित्याने कोणाहि मनुष्याला तशी देणगी दिल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही." म्हणूनच आपण त्यासाठी पवित्र आत्म्याठायी प्रार्थना करणे गरजेचे आहे. 
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ९:३१-४२
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"ख्रिस्तमंडळाची उन्नती होऊन ती पवित्र आत्म्याच्या समाधानात परिपूर्ण झाली." 
सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात आणि पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्रने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, ऊठ आणि स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर." तेव्हा तो तात्काळ उठला. त्याला पाहून लोद आणि शारोन येथील सर्व रहिवाशी प्रभूकडे वळले.

आणखी यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणीएक शिष्या होती, ती सत्कृत्ये आणि दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आम्हाकडे यावयाला उशीर करू नका." तेव्हा पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता ती जे अंगरखे आणि जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग प्रेताकडे वळून म्हटले, "टबीथ, ऊठ" तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. मग सर्व यापोमध्ये हे माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१७
प्रतिसाद :  प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?

१)  प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?
माझ्या उद्धाराचे पेयार्पण घेऊन मी येईन 
आणि प्रभूच्या नावाने धावा करीन.

२) प्रभूला केलेले नवस मी त्याच्या साऱ्या प्रजेसमक्ष फेडीन. 
प्रभूच्या भक्तांचे मरण त्याच्या दृष्टीने अमोल आहे.

३) मी तर तुझा दास आहे प्रभू ! 
मी तुझ्या सेविकेचा पुत्र आहे.
 तू माझी बंधने सोडली आहेत. 
प्रभूच्या नावाने धावा करीन.
मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ करीन,

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान ६:६०-६९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“आम्ही कोणाकडे जाऊ? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत."

येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, "हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?" आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, "ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरीही विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही."
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. येशू बारा शिष्यांना म्हणाला, "तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय ?" शिमोन पेत्रने उत्तर दिले “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार ? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपण आहा.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :“तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” प्रभु येशूने बारा प्रेषितांना विचारलेला हा मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना येशूच्या शिकवणुकीचे पालन करणे खरोखर कठीण जाते. उदाहरणार्थ, त्याची नम्रतेची शिकवण. आपण किती जण “जर कोणी आमच्या एका गालावर मारल्यावर त्यांच्यासमोर दुसराही गाल पुढे करायला तयार आहोत ?”विवाह संस्काराची त्याची विश्वासूपणाबद्दलची शिकवण. आपण किती जण आपल्या जोडादाराशी विश्वासू राहिलो आहोत? आणि अशी येशूची आणखी बऱ्याच प्रकारची शिकवण आहे, परंतु आपल्या ऐहिक इच्छा, गरजांअभावी आपण त्या पाळायला मागेपुढे करत असतो. केवळ येशूद्वारेच आपल्याला शांती मिळते. ती ह्या जगाकडून आपल्याला कधीच मिळू शकत नाही. त्याच्याद्वारेच आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आता आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व तात्पुरत्या आहेत. त्या आपण सोडलेल्याच बऱ्या नाहीतर आपणसुद्धा त्यासाठी प्रभु येशूला सोडून जाण्यास मागेपुढे बघणार नाही. येशूच्या शिकवणूकीचे पालन करण्यास मला का कठीण जाते? माझीसुद्धा या जगाच्या अनेक मोहापायी येशूला सोडण्याची इच्छा आहे का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझे वचन आत्मसात करण्यास व त्यानुसार जीवन
जगण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे वरदान दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या