Marathi Bible Reading | 4th Sunday of the Easter | 8th May 2022

पुनरुत्थान ४था  सप्ताह 

रविवार ८ मे २०२२ 

"माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 





 संत पौलाने  परराष्ट्रीयांना देवाचे वचन सांगितले आणि परराष्ट्रीयांनी आनंदाने प्रभूची सुवार्ता ऐकून विश्वास ठेवला. जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते  तितक्यांनी विश्वास ठेवला.

 आजच्या  प्रकटीकरणाच्या वाचनात सांगितले आहे की, 'कोकरा (येशू ख्रिस्त) त्यांचा  मेढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल, आणि देव  त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील'.

प्रभूची पवित्र व मधुर वाणी आपण अंतःकरणापासून ऐकू या  सार्वकालिक जीवनासाठी ती वाणी आचरणात आणू या आणि प्रभूची विश्वासू  मेंढरे बनण्यासाठी आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करु या. ! 
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १३:१४,४३-५२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो."

पौल आणि बर्णबा हे पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखिया येथे पोहचले आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. सभास्थानातील सभा संपल्यावर यहुद्यातील आणि भक्तिमान यहुदी मतानुसारी यांच्यातील पुष्कळजण पौल आणि बर्णवा ह्यांच्यामागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.
पुढच्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. पण लोक समुदायास पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्णवा हे निर्भीडपणे म्हणाले : “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते. तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता आणि आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरवता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे. की, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे."
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी श्रद्धा ठेवली आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णवा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्या येथे गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १००:१-३,५
प्रतिसाद :   आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कळपातील मेंढरे आहोत.

१) अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
 गायन करीत त्याच्यापुढे जा.

२ )परमेश्वर हाच देव आहे असे जाणा,
 त्यानेच आम्हांला उत्पन्न केले, 
आम्ही त्याचेच आहो, 
त्याची प्रजा त्याच्या कळपातील मेंढरे आहोत.

३) कारण परमेश्वर चांगला आहे. 
त्याची दया युगानुयुग आणि 
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.


दुसरे वाचन प्रकटीकरण  ७:९,१४-१७
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल."

मी, योहानने पाहिले तो सर्व राष्ट्र, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला आणि हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा वडीलमंडळीपैकी एकाने मला म्हटले, “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, ह्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाहीत आणि तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल आणि ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, 
मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि 
माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १०:२७-३०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "माझ्या मेंढरांना मी सार्वकालिक जीवन देतो."
येशू यहुद्यांना म्हणाला, "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : पुनरुत्थानकाळातील चौथा रविवार हा उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची सर्व वाचने मेंढपाळ ह्या विषयाशी संबंधीत आहेत. शिवाय प्रतिसाद स्तोत्रामध्येही परमेश्वराला मेंढपाळ म्हणूनच संबोधण्यात आलेले आहे. येशू हा उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांना ओळखतो, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांचे पालनपोषण करतो, त्यांचे संरक्षण करतो आणि त्यांच्यासाठी आपला प्राण देतो अशी पाच गुणवैशिष्ट्य अस्सल मेंढपाळाला लागू पडत असतात. 
१. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त ह्याच्या कळपात सर्वांसाठी जागा आहे : येशू हा प्रथमतःइस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठविण्यात आलेला असला तरी त्याच्या पुनरुत्थानानंतर मात्र तो सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याचा आदेश आपल्या प्रेषितांना देतो. आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे यहुद्यांनी सुवार्ता स्वीकारण्याचे नाकारले तेव्हा प्रेषित परराष्ट्रीयांकडे वळले. मात्र त्यानंतरही त्यांनी यहुद्यांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. संत पौल त्यांच्या सभास्थानात जाऊन त्यांच्याशी धार्मिक विषयावर चर्चा करीतच राहिला. 
२. उत्तम मेंढपाळ येशू ह्याची साक्ष देताना जे छळ सहन • करतात ते त्याच्या गौरवात देखील सहभागी होतात : दुसऱ्या वाचनात योहानाला एक दृष्टान्त दिसतो. स्वर्गात सर्व राष्ट्रे, वंश, विविध भाषा बोलणारे लोक ह्यांचा मोठा समुदाय त्याच्या दृष्टीस पडतो. त्यांनी आपले झगे (पावित्र्याचे जीवन) कोकराच्या रक्तात धुवून घेतलेले आहेत. ह्याचाच अर्थ तारणदायी दुःख हे नेहमीच श्रद्धावंताच्या स्वर्गीय वैभवाकडे घेऊन जात असते. 
३. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त ह्याचा कळप कधीही नष्ट होणार नाही खुद्द परमेश्वरामध्ये ख्रिस्ताच्या कळपाचा उगम असल्यामुळे जरी ह्या कळपावर कितीही हल्ले झाले तरी त्यातील मेंढरांची दाणादाण होणार नाही. मात्र त्यासाठी मेंढरांनी (श्रद्धावंतांनी) मेंढपाळाची (येशूची) वाणी ऐकून (देवशब्द) त्याप्रमाणे त्याच्यामागे गेले पाहिजे. (त्याच्या इच्छेप्रमाणे जगले पाहिजे.) ख्रिस्त हा सनातन मेंढपाळ असल्यामुळे त्याचा कळपही शाश्वत व सार्वकालिक स्वरूपाचा आहे.
आत्मपरीक्षण: माझ्या जीवनात सर्वांसाठी जागा आहे का ? छळ आणि गौरव ह्या श्रद्धारूपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा अनुभव मला आलेला आहे का? सर्व प्रकारच्या अडीअडचणीवर मात करून आपली श्रद्धामय परंपरा जपणाऱ्या ख्रिस्ताच्या कळपावर आज कोणकोणते हल्ले होत आहेत? त्याबाबत मी काय करीत आहे ?

प्रार्थना : मेंढपाळ तू माझा प्रभूवर मेंढपाळ तू माझा, राखिशी मजला प्रभूजी मेंढपाळ तू माझा. मला सन्मार्गावर चालण्यास कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या