Marathi Bible Reading | Monday 9th May 2022 |4th Week of the Easter |

पुनरुत्थान ४था   सप्ताह 

सोमवार ९ मे  २०२२ 

“मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत येईल तर त्याला तारणप्राप्ति होईल.'


संत पीटर नोलास्कोस 
वार्तांसाक्षी (११८२-१२५६)
 


 पेत्राने लोकांना पश्चात्ताप करण्याचे आवाहन करुन बाप्तिस्मा स्वीकारण्यास सांगितले. बाप्तिस्मा स्वीकारलेल्यांना पवित्र आत्म्याच्या दानाचे आश्वासन दिले. प्रभू येशू अशा सर्व  लोकांसाठी तारणप्राप्तिचे दार बनला. प्रभू येशू म्हणत आहे, “मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत योईल तर त्याला तारण प्राप्ति होईल."  प्रभूवर विश्वास ठेवून त्याची वचने आणि आज्ञा पाळणाऱ्यांना प्रभू येशूद्वारे तारणाची कृपा मिळणार आहे. त्याच्या कृपेच्या अखंडित झऱ्यांमध्ये आपण स्वतःला झोकून देऊ या.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ११:१-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."

प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे ग्रहण केले. मग पेत्र येरुशलेमला गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलात ? तेव्हा पेत्रने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली, "मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो. तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, "पेत्र, ऊठ, मारून खा, " परंतु मी म्हणालो, "नको, प्रभू ! कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, "देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको." असे तीनदा झाले. नंतर ते अवघे सारे पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहीली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, "मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला." तो म्हणाला, "यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनाला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबांचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल." मी बोलू लागलो तो, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांला तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडवणारा असा मी कोण ?" हे ऐकून ते गप्प राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले, "तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४२:२,३,४३:३-४
प्रतिसाद :  माझा जीव देवाकरिता तान्हेला आहे.

१) पाण्याच्या प्रवाहासाठी एखादी हरिणी धापा टाकते 
तसाच माझा जीव हे देवा, तुझ्यासाठी धापा टाकीत आहे.

२) माझा जीव देवाकरिता, 
जिवंत देवाकरिता तान्हेला झाला आहे. 

३) तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर. 
ते मला मार्गदर्शन करोत.
तुझ्या पवित्र डोंगरावर, 
तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.

४) मग मी देवाच्या वेदीजवळ देव 
जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन 
माझ्या उद्धारका, हे देवा, माझ्या देवा,
वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
हे येशूखिस्ता, तू विश्वसनीय साक्षी व मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आहेस. तू आम्हांवर प्रीती करतोस आणि आपल्या रक्ताने आम्हांला पापांपासून मुक्त करतोस. 
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १०:१-१०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी मेंढरांचे दार आहे."
येशू म्हणाला, "मी तुम्हांला खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दाराने जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून दूर पळतील. कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत." हा दृष्टान्त येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हांला सत्य सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणाप्राप्ती होईल, तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :तुमच्या जीवनाची अवस्था काय आहे असे तुम्हाला विचारले तर तुमचे उत्तर काय असेल? मस्त ? कंटाळवाणे? आनंदी ? रोमांचक ? अस्वस्थ ? रिक्त ? गोंधळलेले ? समाधान - कारक? आज आपल्या सर्वांना जीवनात निराशा, अपयश, दुःखांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपले जीवन नीरस आणि कंटाळवाणे झाले आहे. मग आपल्याला या जीवनात आनंद आणि सुख कुठे मिळू शकते? अर्थातच, येशू ख्रिस्ताकडे, तो आपला उत्तम मेंढपाळ आहे व आपण त्याची मेंढरे आहोत आणि तो आपल्याला आजच्या शुभवर्तमानात शाश्वती देत आहे की, “मी तर जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” परंतु, आज आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास कठीण जात आहे. कारण आपण ख्रिस्ताची वाणी त्याच्या पवित्र शब्दांद्वारे आणि देऊळमातेच्या शिकवणुकीद्वारे ऐकण्याऐवजी या जगाच्या ऐहिक गोष्टींच्या आवाजाकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहोत आणि म्हणूनच जीवनाचा खरा आनंद आपण गमावून बसलेलो आहोत. तर आपण तो परत मिळविण्यासाठी प्रभू येशू, आपल्या चांगल्या मेंढपाळाशी जवळीक साधलेली बरी नाहीतर या पापी जगामुळे आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनाचा मेंढपाळ कोण आहे आणि मी कोणाची वाणी ऐकते / ऐकतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच आमचे तारणप्राप्तिचे दार आहेस. तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या